स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

सर, माझ्या चष्म्यातून

सर, माझ्या चष्म्यातून
सिंबायोसिस शिक्षणसमूहाचे प्रमुख डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं हे पुस्तक. अनेक वर्षं डॉ. मुजुमदार यांच्याबरोबर काम करणारे डॉ. सतीश ठिगळे यांनी ते लिहिलं आहे. केवळ लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक नाही, तर एखादी शिक्षण संस्था, या संस्थेतले दिग्गज कसे तयार होतात, या प्रवासाचं वर्णन आहे. ठिगळे यांनी तटस्थपणानं आणि प्रांजळपणानं अनेक गोष्टी मांडल्या आहेत. कोणतीही संस्था एका रात्रीत तयार होत नाही, तिला अनेक दिव्यातून जावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून उलगडतात. मुजुमदार यांचे वेगवेगळे पैलू ठिगळे यांनी तटस्थपणे मांडले आहेत. त्यातून अनेक प्रकारच्या माहितीची भर पडते, वेगळा दृष्टिकोन तयार होतो.
प्रकाशक - अभिजित प्रकाशन, पुणे (०२०-२४४९७७४८)/ पृष्ठं - १९२ / मूल्य - २५० रुपये

निर्णयशक्ती
ओरिसन स्वेट मार्डन यांच्या निर्णयशक्ती या विषयावरच्या विचारांचं हे संकलन. ह. अ. भावे यांनी भावानुवाद केला आहे. प्रत्येकाला रोज छोटे-मोठे निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा फक्त आपल्याच नव्हे, तर इतर अनेकांवर परिणाम करू शकणारे हे निर्णय असतात. हे निर्णय कसे घ्यायचे हे कुठं शिकवलं जात नाही. ही निर्णयशक्ती कशी मिळवायची हे समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल. त्यासाठी सोपे कानमंत्र देण्यात आले आहेत.
प्रकाशक - सरिता प्रकाशन, पुणे (०२०-२५६५५६५४)/ पृष्ठं - ८० / मूल्य - ६० रुपये

गावाकडच्या आठवणी
शशिकांत देशपांडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक. पुणे जिल्ह्यात राजगुरूनगरजवळचं वाडं हे त्यांचं गाव. सध्या चासकमान धरणामध्ये हे गाव बुडून गेलं आहे. या गावातल्या आठवणी देशपांडे यांनी लिहिल्या आहेत. त्यांचा चिरेबंदी वाडा, लहानपणाच्या आठवणी, गावातले सण-उत्सव, त्यावेळचं वातावरण, प्लेगचे दिवस, शनिवारचा बाजार अशा सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत. आठवणीतल्या माणसांविषयीही त्यांनी लिहिल्या आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी नांदत्या असलेल्या चैतन्यमयी गावाचा भग्नावशेष होण्यापर्यंतचा प्रवास हेलावून टाकतो.
प्रकाशक - अमोल प्रकाशन, पुणे (०२०-२४४३३९९०)/ पृष्ठं - ११२ / मूल्य - १२५ रुपये

कलाकार
रा. अ. कुंभोजकर यांनी वेगवेगळ्या कलाकारांविषयी केलेलं हे लेखन. जुन्या काळातले अनेक कलाकार या पुस्तकातून भेटतात, नवी माहिती मिळते. प्रभात फिल्म कंपनी, बाबूराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा अशा कलाकारांविषयी कुंभोजकर यांनी लिहिलं आहे. उषा चव्हाण, आरती अंकलीकर-टिकेकर अशा कलाकारांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या आहेत. केवळ जंत्री न मांडता त्या त्या कलाकाराचं सामर्थ्य, त्याचं वैशिष्ट्य, त्याच्यासंबंधीचे किस्से, त्या काळचं वातावरण अशा गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. नाटक, मराठी-हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ या लेखनातून उभा राहतो.
प्रकाशक - मेहता प्रकाशन, पुणे (०२०-२४४७६९२४)/ पृष्ठं - १०२ / मूल्य - १४० रुपये

महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक अधिनियम
अनेक कंपन्या आणि गृहनिर्माण संस्थांना सुरक्षारक्षक नेमावे लागतात. मात्र, या संदर्भातले कायदे, नियम या गोष्टींची माहिती नसल्यामुळे नंतर अडचणी येतात. त्यामुळंच ॲड. सुधीर बिरजे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. महाराष्ट्र खासगी सुरक्षा अधिनियम, १९८१ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा संस्था अधिनियम, २००५ आणि नियम २००७ यांच्याविषयी; तसंच खासगी सुरक्षारक्षकांशी संबंधित इतर नियमावली, योजना यांच्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. काही व्याख्याही त्यांनी दिल्या आहेत. सुरक्षारक्षकांचं प्रशिक्षण, पोलिस पडताळणी इत्यादींबाबत काही अर्जही त्यांनी दिले आहेत.  काही न्यायालयीन निवाडेही त्यांनी समाविष्ट केले आहेत.
प्रकाशक - अजित प्रकाशन, पुणे (१८००३०७०२१०१)/ पृष्ठं - १७६ / मूल्य - २६५ रुपये

चिंतेचा अस्त, चित्‌शक्तीचा उदय
वेगवेगळ्या गोष्टींमुळे येणारे तणाव कसे कमी करावेत, याविषयी किंकर विठ्ठल रामानुज यांनी लिहिलं आहे. तणावांचे वेगवेगळे प्रकार, ऐहिक, शारीरिक, बौद्धिक पातळीवरून येणारे तणाव यांविषयी त्यांनी लिहिलं आहे. चिंता आणि तणाव कमी कसे करायचे यासाठी त्यांनी आध्यात्मिक दृष्टीनं काही उपायही सुचवले आहेत. शशांक आठल्ये यांनी अनुवाद केला आहे.
प्रकाशक - प्रसाद प्रकाशन, पुणे (०२०-२४४७१४३७)/ पृष्ठं - ९६ / मूल्य - ८० रुपये

अल्याड-पल्याड
सुषमा पेंढरकर यांनी लिहिलेल्या कथांचा आणि कवितांचा हा संग्रह. एक कथा आणि तिच्यानंतर तिला पूरक कविता असा एक वेगळा प्रयोग त्यांनी या पुस्तकात केला आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांच्या कुटुंबांतला संघर्ष हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. मूळचे भारतीय संस्कार, पाश्‍चात्त्य संस्कृतीशी जुळवून घेण्याची धडपड, त्यातून निर्माण होणारे प्रश्‍न, कुटुंबामध्ये-नात्यामध्ये तयार होणारे ताण-तणाव अशा गोष्टी पेंढरकर यांनी लेखनातून मांडल्या आहेत. काही कथा भारतीय वातावरणातल्या असल्या, तरी त्यातही नात्यांमधले कंगोरे हाच विषय आहे. सुजाता गोडबोले यांनी संपादन केलं आहे.
प्रकाशक - विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४४४८९८९)/ पृष्ठं - २१६ / मूल्य - २८० रुपये

रस्किन बाँड यांच्या भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता
रस्किन बाँड हे अतिशय प्रतिभावंत लेखक. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या डेहराडूनसारख्या शहरात ते राहिले आणि त्यातून त्यांच्या कथांमध्येही अतिशय सुरम्य असं निसर्गचित्रण, लोकजीवन, वेगळी माणसं यांचा गोफ विणत गेला. लहान, किशोरवयीन मुलांना आवडतील, अशा त्यांच्या किती तरी कथा. त्यातल्याच वेगवेगळ्या कथा निवडून तयार केलेला हा सहा पुस्तकांचा हा संच. अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या कथा त्यातून वाचायला मिळतात. छोटंसं कथाबीज हळूहळू विस्तारत जातं आणि मनापर्यंत पोचतं. एकूण ३९ कथा या संचात वाचायला मिळतील. रमा हर्डिकर-सखदेव आणि नीलिमा भावे यांनी अनुवाद केला आहे. वेगवेगळ्या व्यक्तींचं अतिशय सुरेख भावविश्‍व चितारणाऱ्या या कथा सगळ्याच वयोगटांतल्या वाचकांना आवडतील. ‘टेकड्यांच्या पलीकडे आणि मेहमूदचा पतंग’, ‘वावटळ’, ‘चेरीचं झाड’, ‘जावाहून सुटका’, ‘शहामृगाच्या तावडीत’ आणि ‘बोगद्यातला वाघ’ अशा सहा पुस्तकांच्या या संचात समावेश आहे.
प्रकाशक - रोहन प्रकाशन, पुणे (०२०-२४४८०६८६)/ पृष्ठं - (अनुक्रमे) १४२, ११६, १०६, १०४, १००, १०२ / मूल्य - ९०० रुपये (सहा पुस्तकं मिळून) (मर्यादित कालावधीसाठी सवलत मूल्य)

मन-पूर्वक
मन या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंची अभिव्यक्ती करणारं, जगणं आनंददायी करण्यासाठी वेगवेगळे कानमंत्र देणारं हे पुस्तक. चिकित्सक मानसशास्त्रज्ञ ऊर्मिला सावंत यांनी ते लिहिलं आहे. एका रुग्णालयात भित्तीपत्रकं लिहिण्याचा उपक्रम सावंत यांनी सुरू केला आणि हळूहळू त्याला व्यापक स्वरूप येत गेलं. हे केवळ प्रचारात्मक, प्रबोधनपर साहित्य नाही, तर वाचकांच्या जीवनात थेट परिणाम करू शकतील, अशा गोष्टी सावंत यांनी दिल्या आहेत. किती तरी गोष्टींचा मूलगामी विचार करून सावंत यांनी केलेलं हे लेखन वाचकांशी मैत्री करतं. सलग नऊ वर्षं हा उपक्रम सुरू असल्यामुळे सावंत यांना अनेक गोष्टी हळूहळू सापडत गेल्या आहेत. त्या साऱ्यांचं हे संकलन प्रेरक, उपयुक्त आहे.
प्रकाशक - ग्रंथाली, मुंबई  (०२२-२४२१६०५०)/ पृष्ठं - २७२ / मूल्य - ३०० रुपये

सुपर ३०
बिहारमधील प्रतिभाशाली गणितज्ञ आणि शिक्षक आनंदकुमार यांची ही कहाणी. केंब्रिजमध्ये प्रवेशाची संधी मिळूनसुद्धा गरिबीमुळं ते शक्‍य न झालेल्या आनंदकुमार यांनी नंतर गणिताच्या प्रेमापोटी शिक्षण वर्ग सुरू केले. हळूहळू गुरुकुलासारखी शाळा त्यांनी सुरू केली आणि आयआयटी जेईई प्रवेश परीक्षेत दर वर्षी त्यांच्या तीस विद्यार्थ्यांपैकी २७ ते २८ विद्यार्थी निवडले जाऊ लागले. हेच आनंदकुमार यांचे ‘सुपर ३०.’ इथपर्यंत पोचण्याचा आनंदकुमार यांचा प्रेरक प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. आनंदकुमार यांची जिद्द, द्रष्टेपणा, त्यांचा संघर्ष, बिहारसारख्या राज्यात काम करताना आलेले अनुभव या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून उभ्या राहतात. बिजू मॅथ्यू यांनी हे पुस्तक लिहिलं असून, डॉ. कमलेश सोमण यांनी अनुवाद केला आहे.
प्रकाशक - गोयल प्रकाशन, पुणे  (०२०-२४४५३२६७)/ पृष्ठं - २२४ / मूल्य - १९९ रुपये

------------------------------------------------------------------------------
प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शन

दहावी-बारावीनंतर काय करावं, कोणकोणते मार्ग असतात, याच्याविषयी विद्यार्थ्यांना खूप उत्सुकता असते. अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती नसल्यामुळं अनेकांची महत्त्वाची संधीही हातची जाण्याची शक्‍यता असते. या सर्व गोष्टींचा विचार करून तयार केलेलं हे पुस्तक. हेमचंद्र शिंदे यांनी अतिशय तपशीलानं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेशप्रक्रियांची ही माहिती संकलित केली आहे. नीट, जेईई, एमएचटी-सीईटी, आर्किटेक्‍चर, एनआयडी, नेस्ट अशा किती तरी क्षेत्रांतील प्रवेश प्रक्रियांची त्यांनी विस्तारानं माहिती दिली आहे. प्रवेशप्रक्रिया देण्यापूर्वी काय काय गोष्टींची तयारी आवश्‍यक आहे, संगणकाचं ज्ञान कसं गरजेचं आहे, दहावी-बारावी परीक्षा किती गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत, कोणत्या सीईटी परीक्षा द्यायला पाहिजेत, अशा वेगवेगळ्या गोष्टींबाबत त्यांनी उपयुक्त मार्गदर्शनही केलं आहे. वेगवेगळे अर्ज भरताना काय काळजी घ्यायची, राज्य सरकारच्या प्रवेश परीक्षांचे अर्ज कसे भरायचे, कोणत्या सीईटी परीक्षा निवडल्या पाहिजेत, अशा गोष्टींबाबतही त्यांनी विवेचन केलं आहे. पर्सेंटाइल मेथड, आरक्षण, कोटा अशा गोष्टींचीही माहिती आहे. वेगवेगळे तक्ते, चौकटी, वेबसाइट्‌स, पत्ते, पसंतीक्रम, दाखले, शैक्षणिक सवलती अशा गोष्टीही विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील. अनेक संस्थांच्या याद्याही त्यांनी दिल्या आहेत. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांत माहिती देण्यात आली आहे.
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८/ पृष्ठं - २१४ / मूल्य - २५० रुपये

रामायण - वनवास रहस्य
श्रीरामांचं जीवन कथन करणारा रामायण हा ग्रंथ शतकानुशतकं लोकांसाठी आदर, भक्ती आणि आदर्श जीवनमूल्यं यांचा वस्तुपाठ ठरला आहे. त्याची भाषा, दृष्टिकोन आणि समज यांच्या अनुषंगानं अनेक रचनाकारांनी तो पुन-पुन: सादर केला आहे. तेजज्ञानाच्या दृष्टिकोनातून रामायण सादर करण्याचा विशेष प्रयत्न या ‘रामायण-वनवास रहस्य’ या ग्रंथात करण्यात आला आहे. रामायण ही पौराणिक कथा नसून आपल्यामध्ये सतत चालू असलेल्या मनोभावांची गाथा आहे, असा दृष्टिकोन सरश्री या पुस्तकात मांडतात. आजच्या प्रश्‍नांनाही आपल्या परंपरांमधून उत्तर कसं शोधता येतं, याचं मार्गदर्शन सरश्री या पुस्तकातून करतात. ‘पूर्वलीला’, ‘बाललीला’, ‘स्वयंवर युद्धलीला’, ‘महालापासून दूर’, ‘राम वनवास लक्ष्य’ असे भाग करून मार्गदर्शन करण्यात आलं आहे. रामनाम रहस्य, आपल्या जीवनातला अल्प वनवास, लक्ष्यावर दृढ कसं राहावं याविषयीही विवेचन आहे.
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे  (०२०-२४४०५६७८)/ पृष्ठं - २५६ / मूल्य - १९५ रुपये

मेरी क्‍युरी
विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारी एकमेव शास्त्रज्ञ म्हणून ज्या महान स्त्रीचं नाव कायमस्वरुपी कोरलं गेलं आहे तिचं हे प्रेरणादायी चरित्र. पोलंडसारख्या देशात ज्या वेळी नागरिक संघर्षातून जात होते, त्या काळात मेरी क्‍युरीचं आयुष्य फुलत गेलं. अनेक संघर्षांतून, वेदनांतून, अप्रिय घटनांतून जात असतानासुद्धा मेरी क्‍युरीनं विज्ञानावरची निष्ठा कायम ठेवली, सतत कार्यरत राहिली. तिची कौटुंबिक पार्श्‍वभूमीही खूप महत्त्वाची. तिचे पती पिअरे, मुलगी इरिन आणि जावई फ्रेडरिक यांनाही नोबेल पुरस्कार मिळाले. स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अतिशय संकुचित असण्याच्या काळात मेरीनं बुद्धिवैभवानं स्वत-साठी आणि सगळ्याच स्त्री वर्गासाठी एक अतिशय मानाचं स्थान निर्माण केलं. केवळ उपयोजित विज्ञान हे महत्त्वाचं मानलं जात होतं, तेव्हा तिनं मूलभूत आणि तत्त्वचिंतन करणाऱ्या विज्ञानवृत्तीचा ध्यास घेतला. तिच्या या जीवन प्रवासाची ही कहाणी डाॅ. संजय कप्तान यांनी सुरसपणे मांडली आहे.
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे  (०२०-२४४०५६७८)/ पृष्ठं - १२८ / मूल्य - १४० रुपये
------------------------------------------------------------------------------

साभार पोच

  •      वैद्यांचे ऐतिहासिक निबंध-छत्रपती शिवाजी महाराज / निबंधसंग्रह / लेखक - चिं. वि. वैद्य / वरदा प्रकाशन, पुणे (०२०-२५६५५६५४) / पृष्ठं - १४४ / मूल्य - १४० रुपये
  •      माझे गाणे / कवितासंग्रह / कवी - चंद्रकांत वानखेडे / काषाय प्रकाशन, पुणे (९०११३७२०२३) / पृष्ठं - ९६ / मूल्य - १२० रुपये
  •      आर. एस. एस.चा राष्ट्रविघातक प्रवास / वैचारिक / लेखक - शमसूल इस्लाम / अनुवाद - डॉ. मीना शेटे-संभू / सुगावा प्रकाशन, पुणे (०२०-२४४७८२६३) / पृष्ठं - ६८ / मूल्य - ६० रुपये
  •      सूर अंतरीचा / कवितासंग्रह / कवयित्री - देवयानी द्रविड / नीहारा प्रकाशन, पुणे (०२०-२४४९१२९२) / पृष्ठं - ९६ / मूल्य - १०० रुपये

------------------------------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: welcome new books