विधानात्मकता वा वक्‍तृत्वपूर्णता हा कवितेचा दोषच

poem.
poem.

गेल्या काही लेखांत मांडलेले मुद्दे आणि त्यांची मांडणी यासंदर्भात काही कवी/अभ्यासक/वाचक मित्र, मैत्रिणींनी चर्चा करताना काही नवीन मुद्दे उपस्थित केले ज्यांचा परामर्श घेऊनच पुढे जावे असे वाटले. पहिला मुद्दा होता काव्यभाषा किंवा सामान्यतः जिला काव्यात्म भाषा म्हटले जाते तिच्या गुण-लक्षणांचा आणि तिच्या कवितेसोबतच्या आंतरसंबंधांचा.

कवितेत शब्द असतात, वाक्‍य असतात, अगदी गद्यसदृश्‍य वाक्‍य असतात पण हे सगळे तर कथा, कादंबरी, वैचारिक लेख, शास्त्रीय प्रबंधांतही असतात. मग कवितेची म्हणून काही विशिष्ट भाषा असते काय? असल्यास तिचे गुण आणि लक्षणे कोणती? हा अत्यंत वैध प्रश्न उपस्थित केला पाहिजे आणि त्याचे उत्तरही दिले पाहीजे. आपण भाषेची विविध रूपे समजून घेण्यासाठी तिच्या चार ढोबळ रूपांची कल्पना करू शकतो 1) आपल्या बोलण्यातील भाषा, 2) काव्याची भाषा, 3) कथा-कादंबरी-नाटकातील भाषा आणि शास्त्रीय लेखनातील भाषा. सोबतच आपण ढोबळमानाने कवितेचे जे पाच प्रकार कल्पिले जातात तेही इथेच नोंदवून घेऊ 1) भावकविता, 2) चिंतनगर्भ कविता, 3) कथाकविता, 4) नाट्यकविता आणि 5) गीत (मला व्यक्तीशः या प्रकाराला गीतकाव्य म्हणायला आवडते.)

वर कल्पना केलेल्या चार भाषारुपांकडे बारकाईने पाहिले तर असे दिसून येते की कथा-कादंबरी-नाटकातली भाषा ही आपल्या बोलण्यातील भाषेच्या जवळ जाणारी भाषा असते तर शास्त्रीय आणि वैचारिक लेखनाची भाषा ही बोलण्याच्या भाषेपेक्षा खूपच वेगळी, काटेकोर भाषा असते तीत प्रमाणभाषेचा सर्वाधिक वापर होतो. तर काव्याची भाषा ही बोलण्याच्या जवळ जाणारी भाषा असली तरी ती कवीने प्रयत्नपूर्वक "घडवलेली'भाषा असते. कवी आपली भाषा घडविताना काही गोष्टींपासून मुक्त करून घेत असतो आणि काही गोष्टी नव्याने निर्माण करत असतो.

या वळणावर एक सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला पाहिजे तो हा की या पूर्वीही म्हटल्याप्रमाणे कविता हा अनेकार्थाच्या शक्‍यता निर्माण करणारा साहित्यप्रकार आहे. (अनेकार्थता ही संकल्पना समजून घेताना पाश्‍चात्य काव्यशास्त्र परंपरेतील ambiguity ही संज्ञा समजून घेणे गरजेचे आहे पण ते नंतर बघू. जिज्ञासूंनी यासाठी Willian Empson यांचा Seven Types of Ambiguity हा ग्रंथ अवश्‍य वाचवा.) तसेच कवितेत वाच्य अर्थापेक्षा लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ यांनाच अधिक महत्त्व असते याची खुणगाठ बांधून घेतली पाहीजे आणि म्हणूनच वाच्य अर्थावर थांबणारी काव्य किंवा काव्यसदृष्य रचना ही नि:संकोचपणे वाईट काव्य या श्रेणीत टाकली पाहिजे.

काव्यभाषेचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे तिचे गद्यात विघटन शक्‍य न होणे. हा मुद्दा खरे म्हणजे पहिल्या मुद्द्याचाच विस्तार आहे पण तो स्वतंत्रपणेही तितकाच महत्त्वाचा आहे. काव्यसमीक्षेच्या अभ्यासात वाच्य अर्थाला मुख्यार्थ म्हणण्याची परंपरा आहे. ही मोडीत काढायला हवी. कारण असे गृहीत धरल्याने वाच्यार्थ हाच काव्याचा प्रमुख अर्थ आहे, असे ध्वनित होते, जे चूक आहे. याचे कारण काव्यात केवळ शब्दांचे किंवा शब्दसमूहाचे अर्थ निहित असतात असे नाही तर त्यात ध्वनी, रस, लय आदी अनेक गुणांचा समुच्चय उपस्थित असतो, जो इतर साहित्यप्रकारांत असेलच असे नाही. यामुळे जेव्हा "अरसिक वाचक' जेव्हा कवितेचा अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत कवितेचे गद्यात रुपांतर करायला लागतो तेव्हा तो काव्यात उपस्थित असलेला संवेदनात्मक, भावनात्मक अनुभव एकतर क्षीण करतो किंवा मारूनच टाकतो. म्हणून कवितेचे गद्यात विघटन शक्‍य नसणे हा कवितेचा अत्यंत महत्त्वाचा गुण मनाला पाहीजे. हे मत अत्यंत आग्रहाने प्रतिपादित करण्याची व ते प्रतिष्ठित करण्याची आज गरज आहे. यासाठी "प्रस्तुत कवितेत कवीला असे म्हणायचे आहे की' या वाक्‍याने सुरु होणारे रसग्रहण म्हणजे कवितेचा अपमान आहे, हे सर्व कवी व रसिकांच्या मनावर बिंबवले पाहिजे.

याच कारणास्तव वर भाषेची विविध रूपे सांगतांनाच कवितेचे पाच ढोबळ प्रकार कोणते हेही सांगितले. पैकी भावकविता आणि गीतकाव्य या दोन प्रकारांत कवितांचे गद्यात विघटना होण्याची किंवा करण्याची शक्‍यता फारच कमी असते आणि नाट्यकविता हा प्रकार आजकाल कुणी फारसा हाताळताना दिसत नाही. गेल्या तीन-चार दशकांतली मराठी कविता ही प्रामुख्याने चिंतनगर्भ कविता आणि कथाकविता या दोन प्रकारांत मोडते. या दोन काव्यप्रकारांपैकी चिंतनगर्भ कवितेला एक सामाजिक प्रतिष्ठाही प्राप्त झालेली दिसते. परंतु, याचमुळे की काय याप्रकारची कविता लिहिण्याची एक "फॅशन' निर्माण झाली आहे. ती होण्यात काही हरकत नव्हती पण या प्रकारची कविता लिहिताना सरळ सरळ विधानात्मक आणि वक्तृत्वपूर्ण गद्य लिहिले जात आहे, हे अनेक कवींच्या आणि कविता वाचणाऱ्यांच्या ध्यानात येत नाही, असे दिसते.

एक उदाहरण देतो. गुरुनाथ धुरी यांचा एक कवितासंग्रह आहे "लालकोवळा काळोख' (नावच किती विलक्षण आहे!) या कवितासंग्रहातली पहिलीच कविता आहे "आरंभ'. या कवितेत अनुभवाची चित्रात्मकता अतिशय प्रत्ययकारी शब्द्‌कळेसह जिवंत होते. या कवितेतील बहुतेक काव्यवाक्‍ये ही गद्यसदृश्‍य आहेत पण त्या प्रत्येक वाक्‍यात काव्यगुण ठासून भरलेला आहे, असेच जाणवत राहते. याच संग्रहातली पाचवी कविता आहे "राणाजी आणि भगवानजी'. ही थेट कथाकविता आहे. पण याही कवितेतली काव्यभाषा तिचे गद्यात विघटन होऊ देत नाही. धुरींच्या कविता आज चिंतनगर्भ आणि कथाकविता लिहिणाऱ्या कवींनी अवश्‍य वाचाव्या अशा कविता आहेत कारण स्मृतिशेष ज्येष्ठ काव्यसमीक्षक म. सु. पाटील एकदा म्हणले होते की, आडवं गद्य उभं लिहून त्यात काव्यगुण आणणे, हे प्रतिभेचे काम आहे जे बहुसंख्य कवींना जमत नाही.

पुढील लेखात आपण प्रतिभा या संज्ञेविषयी थोडी चर्चा करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com