esakal | पत्नी मानसिक रुग्ण असल्याचा संशय? काय करू?
sakal

बोलून बातमी शोधा

mental-iilnes.jpg

मी ३२ वर्षांचा विवाहित आहे. माझ्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. माझी पत्नी एम. बी. ए.पर्यंत शिकली आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आमचा विवाह ठरवून झाला. लग्न झाल्यानंतर मराठवाड्यातून ती पुण्यामध्ये आली. तिला काही तरी मानसिक समस्या आहे.

पत्नी मानसिक रुग्ण असल्याचा संशय? काय करू?

sakal_logo
By
डॉ.सुनीता एन. जंगम

पत्नीला संसारात रस नाही 

 मी ३५ वर्षांचा विवाहित आहे. माझा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. माझी पत्नी खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करते. मीसुद्धा खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. माझी पत्नी लग्नापूर्वी माझ्याबरोबर खूप व्यवस्थित वागायची. परंतु, लग्न झाल्यानंतर कळले की ती अजिबात सांसारिक नाही. घरकाम कोणतेही करण्यामध्ये तिची इच्छा नाही. रोज बाहेरचे खाणे, फिरणे, मौजमजा, पिक्‍चर बघणे, फिरायला जाणे, पार्ट्या करणे, पार्ट्यांमध्ये दारू पिणे, सिगारेट ओढणे अशा गोष्टी करते. हे सर्व प्रकार स्त्री करते, याचा मला त्रास होतो. मी तिला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नाही. तिला आयुष्य फक्त मजेत जगायचे आहे. कोणत्याही सांसारिक जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत. सध्या ती घरात कमी आणि बाहेरच जास्त असते. नोकरी, कंपनीमध्येच ती रमून गेली आहे. गृहिणी या नात्याने तिला घरातील कोणतीही जबाबदारी नको आहे. एवढेच नाही, तर तिला मूलही नको आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये मला तिच्यासोबत राहणे शक्‍य नाही. मला वयोवृद्ध आई-वडील आहेत. ती त्यांचे कोणतेही काम करीत नाही. त्यामुळे तेदेखील तिच्यावर नाराज आहेत. वास्तविक, मला घराकडे लक्ष देणारी मुलगी हवी होती. परंतु, हिचे वागणे बघता मला नाही वाटत, की ती माझ्याबरोबर व्यवस्थित संसार करेल. मला तिच्यापासून विभक्त व्हायचे आहे. मला घटस्फोट हवा आहे. 
- तुमचा प्रेमविवाह आहे. लग्नापूर्वी दोघांनीही काही गोष्टींवर चर्चा करायला हव्या होत्या. उदा. ः पत्नीकडून तुमच्या असणाऱ्या अपेक्षा, तिच्या पतीकडून असणाऱ्या अपेक्षा. तुम्ही तिला स्पष्टपणे कल्पना द्यायला हवी होती, की मला संसारात रमणारी मुलगी हवी आहे. म्हणजे, काही गोष्टी लग्नापूर्वी स्पष्ट झाल्या असत्या. प्रत्येक व्यक्तीचे संगोपन हे वेगवेगळ्या वातावरणात झालेले असते. त्या त्या वातावरणाप्रमाणे माणूस घडतो, त्याचे व्यक्तिमत्त्व तयार होते. तुमची पत्नी अशाच अत्यंत मोकळ्या, स्त्री-पुरुष भेद नसणाऱ्या वातावरणात तयार झालेली दिसते. कधी-कधी काही घरांमध्ये अत्यंत मोकळे वातावरण असते, तर काही घरांमध्ये बाळबोधपणाचे वातावरण असते. लग्नापूर्वी वेगळ्या वातावरणामध्ये वाढलेली मुले-मुली जेव्हा पती-पत्नी म्हणून एकत्र राहण्यास येतात, तेव्हा त्यांना जोडीदाराच्या आवडीनिवडी, स्वभाव स्वीकारण्यास वेळ लागतो. प्रत्येकाची एक जीवनशैली असते. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर सर्वच बदलत असते. या बदलांचा स्वीकार करण्यास एका सक्षम विचाराची जोड असणे गरजेचे असते. जोडीदाराला त्याच्या गुणदोषासकट स्वीकारणे हीच खरी परिपक्वता असते. कारण, कोणीही व्यक्ती परिपूर्ण नसते. खूप टोकाचे स्वभाव, अजिबात न जुळणाऱ्या आवडीनिवडी असतील; तर अशा परिस्थितीमध्ये जोडीदाराला समुपदेशन करून घेणे हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या पत्नीला समुपदेशनाची गरज आहे. तिला लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये या गोष्टी समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी समुपदेशन करून घ्या. लगेचच घटस्फोटासाठी विचार करू नका. समुपदेशन करूनही काही फरक पडला नाही, तरच पुढील गोष्टींचा विचार करा. संधी देणे, यासारखा पर्याय नसतो. त्यामुळे निश्‍चितपणे समुपदेशकाची मदत घ्या. 

पत्नी मानसिक रुग्ण असल्याचा संशय 
मी ३२ वर्षांचा विवाहित आहे. माझ्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. माझी पत्नी एम. बी. ए.पर्यंत शिकली आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आमचा विवाह ठरवून झाला. लग्न झाल्यानंतर मराठवाड्यातून ती पुण्यामध्ये आली. तिला काही तरी मानसिक समस्या आहे. ती बाहेर कोणातही मिसळत नाही. तिला मित्र-मैत्रिणी नाहीत. घरामध्ये एकटी राहते. मी तिला नोकरीचा प्रयत्न कर म्हटले, तर नाही म्हणते. उच्च शिक्षण असूनही ती विमनस्क अवस्थेमध्ये घरातच राहते. त्यामुळे मी नोकरीवर कामात असल्यावर मला सतत फोन करून कामामध्ये व्यत्यय आणते. घरी बसून माझ्यावर संशय घेते. मला विनाकारण आत्महत्या करण्याची धमकी देते. याबाबत मी तिच्या माहेरी कळविले असता तिचे आई-वडील तिची समजूत काढतो एवढेच म्हणतात. परंतु, प्रत्यक्षात मात्र काहीही करीत नाहीत. तिच्या भावाकडून मात्र तिने लग्नापूर्वी २ ते ३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजले. त्यामुळे मला खूप भीती वाटू लागली आहे. तिला खरोखरीच काही मानसिक आजार असेल आणि तिने काही जिवाचे करून घेतले तर विनाकारण मला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. माझे आयुष्यच बरबाद होईल. त्यापेक्षा वेगळे होणे केव्हाही चांगले, असे मला वाटत आहे. 
- तुमच्या पत्नीचा स्वभाव अंतर्मुख आहे. त्यामुळे ती कोणातही रमत नाही. आता यामध्ये तिचा हा स्वभाव मानसिक आरोग्याशी निगडित आहे, की तिला इतर काही समस्या आहे, हे पडताळून पाहणे गरजेचे आहे. जसे की बालपणामध्ये संगोपनात काही त्रुटी आहेत का? काही मानसिक आघात झालेला आहे का? इतर काही गोष्टी त्यामुळे प्रथमतः तिच्या या वागण्याचे कारण शोधून काढा. तुम्ही तिच्यासोबत दैनंदिन विषयांवर संवाद साधा. हळूहळू तिची बौद्धिक पातळी तुमच्या लक्षात येईल. ती एवढी शिकलेली आहे; म्हणजे बौद्धिक पातळी सामान्य व्यक्तीप्रमाणे असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तुम्ही तिला तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा. तेथे समुपदेशनावर जास्त भर दिला जातो. त्यातून तिच्या स्वभावाचे मूळ कारण तपासले जाईल. त्यावहोण्याचा सल्ला मिळारून तुम्हाला त्या तज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. तज्ज्ञांकडून विभक्त ल्यास तुमच्याकडे तो महत्त्वपूर्ण पुरावा असणार आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय मानसिक समस्या या कारणावरून विभक्त होण्याची मागणी कायदेशीर मार्गाने टिकाव धरू शकणार नाही. वारंवार आत्महत्येच्या धमक्‍या हे क्रूरतेचे एक कारण होऊ शकते. परंतु, त्यासाठी मजबूत पुरावा असणे गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे तुम्ही अशा प्रकारे जोडीदाराला योग्य प्रकारे संधी देऊन निर्णय घेतल्याचे आत्मिक समाधान तुम्हाला आयुष्यभरासाठी मिळेल. मी कुणावरही अन्याय केला नाही, मी खूप संसार वाचविण्याचे प्रयत्न केले, हे समाधान तुमच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असेल, हे लक्षात घ्या. 

नवऱ्याच्या जाचातून मुक्त व्हायचेय 
मी ४० वर्षांची उच्चशिक्षित विवाहिता आहे. परंतु, नोकरी करीत नाही. कारण, पतीने कधीही नोकरी करू दिली नाही. माझे पती खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत आहेत. त्यांना १ लाखाच्या वर पगार आहे. मला १५ वर्षांची मुलगी आहे. पतीला दारू पिण्याचे व इतर व्यसने आहेत. ते दारू पिऊन मला पहिल्यापासून त्रास देत आले आहेत. माझा प्रेमविवाह आहे. माझ्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. मी पहिल्यापासून पतीची सर्व व्यसने मुलीकडे बघून सहन केली. परंतु, आता मला काही गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. सध्या माझी मुलगी वयात येत आहे. तिलासुद्धा पती शिवीगाळ करतात. ते तिला सहन होत नाही. त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत आहे. मी त्यांना खूप समजावले, दारू सुटण्यासाठी वेगवेगळे औषधोपचार, समुपदेशन केले. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये घातले, तरीदेखील फरक पडला नाही. मला उत्पन्नाचे काहीही साधन नाही. पती आम्हाला दैनंदिन आयुष्य नीट जगू देत नाही. मला विभक्त राहायचे असल्यास उत्पन्नाचे साधन नसल्याने माझे व मुलीचे भविष्यात काय होईल, याची चिंता वाटते. इकडे नवऱ्याच्या जाचातून सुटण्याची इच्छा नाही. मला घटस्फोट घ्यायचा नाही. पण, त्यांच्याजवळ राहायचे नाही. कारण, रोज दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण मला सहन होत नाही. याबाबत पोलिस तक्रारीही केल्या आहेत. पण, काहीही उपयोग झाला नाही. 
- तुमच्या प्रश्‍नातून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पतीच्या दारू पिण्यामुळे तुम्हाला दैनंदिन आयुष्य त्यांच्यासोबत व्यतित करणे कठीण झाले आहे. मुलीच्याही मनावर, तब्येतीवर परिणाम झाला. तुम्ही व्यसन सोडविण्यासाठी सर्व प्रयत्न करून थकला आहात. पोलिस तक्रारीही केल्या आहेत. म्हणजेच, आपले सर्व प्राथमिक उपचार करून झाले आहेत. घरामध्ये रोजच्या रोज हिंसाचार होत आहे. तुमचे दैनंदिन आयुष्य सुखाने, आनंदाने, शांतीने जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही पतीच्या विरोधात घरगुती हिंसाचार कायदा २००५ अन्वये अर्ज दाखल करू शकता. त्यामध्ये पतीने तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी येऊ नये, असा मनाई हुकूम घेऊ शकता. पतीला स्वतःची वेगळी राहण्याची सोय करावी लागेल. तुम्हाला घटस्फोट नको आहे. त्यामुळे सदरील मनाई हुकूम तुम्ही योग्य तो पुरावा, पोलिस तक्रारीच्या कॉपीज, व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्याची कागदपत्रे, काही साक्षीदार यांच्या आधारे घेऊ शकता. सदरील अर्जाचे कामकाज कोर्टामध्ये चालू असताना तुमच्यासाठी संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. समुपदेशनदेखील केले जाते. पतीच्या वागण्यात, व्यसनात बदल झाल्यास तुम्ही कोणत्याही क्षणी समजुतीने तडजोडही करू शकता. मुलीच्या भवितव्यासाठी पुन्हा एकत्रही येऊ शकता. त्यामुळे योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन सदरील कायद्याबाबत अजून सविस्तर माहिती घेऊ शकता. 
 

loading image
go to top