गुगल ग्लास (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले
रविवार, 20 जानेवारी 2019

गुगल ग्लास म्हणजे डोळ्यांवर घालायचा एक खास तऱ्हेचा चष्मा; पण या चष्म्यात एक कॅमेरा, एक मायक्रोफोन, स्पीकर, सेन्सर, एक पडदा, १६ जीबी मेमरी असलेला, जीपीएसची चिप, गुगल मॅप, भाषांतराचं सॉफ्टवेअर, ब्लुटूथ आणि वाय-फायची सोय असलेला एक अतिशय लहान कॉम्प्युटर अशा गोष्टी असतील. थोडक्‍यात त्या चष्म्यातच एक स्मार्टफोन बसवल्यासारखं असेल. हे एक भन्नाट उपकरण २०१३ मध्ये बाजारात आलं. त्याच्या फायद्या-तोट्यांवर २०१३ पासूनच प्रचंड वादळ सुरू झालंय, तर पुढच्या काळात काय होईल याची कल्पनाच केलेली बरी!

गुगल ग्लास म्हणजे डोळ्यांवर घालायचा एक खास तऱ्हेचा चष्मा; पण या चष्म्यात एक कॅमेरा, एक मायक्रोफोन, स्पीकर, सेन्सर, एक पडदा, १६ जीबी मेमरी असलेला, जीपीएसची चिप, गुगल मॅप, भाषांतराचं सॉफ्टवेअर, ब्लुटूथ आणि वाय-फायची सोय असलेला एक अतिशय लहान कॉम्प्युटर अशा गोष्टी असतील. थोडक्‍यात त्या चष्म्यातच एक स्मार्टफोन बसवल्यासारखं असेल. हे एक भन्नाट उपकरण २०१३ मध्ये बाजारात आलं. त्याच्या फायद्या-तोट्यांवर २०१३ पासूनच प्रचंड वादळ सुरू झालंय, तर पुढच्या काळात काय होईल याची कल्पनाच केलेली बरी!

गुगल ग्लास हे एक भन्नाट उपकरण सन २०१३ मध्ये बाजारात आलं. यानं कॉम्प्युटर विश्‍वातच नव्हे, तर एकंदरीतच समाजामध्ये खूप धूम माजण्याची शक्‍यता आहे. त्याच्या फायद्या-तोट्यांवर २०१३ पासूनच प्रचंड वादळ सुरू झालंय, तर पुढच्या काळात काय होईल याची कल्पनाच केलेली बरी! यातून असंख्य खटले, वाद, मारामाऱ्या, संशय अशा अनेक गोष्टी उद्‌भवणार असल्यामुळे प्रचंडच खळबळ माजणार आहे.

या संकल्पनेचा पहिला सनसनाटी प्रयोग सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज या गुगलच्या सहसंस्थापकांनी २७ जून २०१२ ला गुगलच्या एका इव्हेंटमध्ये सॅनफ्रान्सिस्कोला मॉस्कॉन सेंटरमध्ये केला. त्यात गुगल ग्लास घातलेल्या काही स्काय डायव्हर्सनी या सेंटरच्या छतावरून उतरून अनेक कसरती करून दाखवल्या. त्यानंतर काही सायकलस्वारांनीही गुगल ग्लास लावून तिथंच अनेक प्रकारच्या चित्तथरारक ट्रिक्‍स करून दाखवल्या. या सगळ्या कसरती त्यांच्या गुगल ग्लासमधल्या कॅमेऱ्यानं टिपून आतल्या हॉलमधल्या पडद्यावर दाखवल्या जात होत्या आणि हॉलमधले अनेक प्रेक्षक आश्‍चर्यचकित होऊन त्या कसरती पाहत होते. त्यानंतर त्यातल्याच एका माणसानं इमारतीच्या बाजूला उभ्या असलेल्या सायकलस्वाराला एक वस्तू दिली. त्या सायकलस्वारानं तीच वस्तू कॉन्फरन्स सेंटरभोवती चक्कर मारत व्यासपीठावर असलेल्या सर्गी ब्रिनच्या हातात दिली. अखेर ब्रिन यानं ती वस्तू २०१३ मध्ये बाजारात उपलब्ध होणार असल्याचं जाहीर केलं. सायकलस्वारानं ब्रिनच्या हाती दिलेली वस्तू म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून गुगल ग्लासच होता.

गुगल ग्लासची त्या वेळी किंमत १५०० डॉलर ठरवण्यात आली होती; पण कालांतरानं यात काही सुधारणा करण्याची आवश्‍यकता असून, त्या झाल्यावरच सुधारित गुगल ग्लास आम्ही बाजारात आणू, असं गुगलनं जाहीर केल्याचं फेब्रुवारी २०१५ च्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये छापून आलं. सन २०१७ च्या जुलै महिन्यात गुगलनं बोइंगसारख्या कंपन्यांसाठी गुगल ग्लासचं एन्टरप्राइज व्हर्जन बाहेर काढत असल्याची घोषणा केली. याचा ॲटिस्टिक मुलांनाही फायदा होत असल्याचा दावा करण्यात आला.

गुगल ग्लास ही अशी विलक्षण गोष्ट आहे तरी काय?
खरं म्हणजे गुगल ग्लास म्हणजे डोळ्यांवर घालायचा एक खास तऱ्हेचा चष्मा; पण फरक हा, की या चष्म्यातच एक कॅमेरा, एक मायक्रोफोन, स्पीकर, सेन्सर, एक पडदा, १६ जीबी मेमरी असलेला, जीपीएसची चिप, गुगल मॅप, भाषांतराचं सॉफ्टवेअर, ब्लुटूथ आणि वाय-फायची सोय असलेला एक अतिशय लहान कॉम्प्युटर अशा गोष्टी असतील. थोडक्‍यात त्या चष्म्यातच एक स्मार्टफोन बसवल्यासारखं असेल. हा चष्मा घातला, की आपल्याला समोर जे दिसेल, त्याचे तो फोटो आणि व्हिडिओ बनवू शकेल. फक्त त्या चष्म्याला ‘हा फोटो काढ’ अशी सूचना तोंडानं द्यावी लागेल.  त्यामुळे समोरच्या माणसाला आपलं शूटिंग चाललंय आणि ते चक्क गुगल ग्लासच्या कॉम्प्युटरमध्ये साठवलं जातंय याची कल्पनाही येणार नाही. 

खरी गंमत तर पुढंच आहे. ज्या व्यक्तीचा किंवा ज्या वस्तूचा फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग चालू असेल त्या वेळी त्या व्यक्तीची किंवा वस्तूची माहिती तात्काळ म्हणजे त्याच क्षणी (रिअल टाइममध्ये) इंटरनेटवरून मिळू शकेल आणि गुगल ग्लासच्या स्क्रीनवर तो दिसेल. कित्येक वेळेला आपण आपल्याला भेटलेल्या माणसांची नावं विसरतो. ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटल्यावर यामुळे खूप ऑकवर्ड प्रसंग येतात. आता मात्र ती व्यक्ती समोर येताच आपण त्याच्याशी हस्तांदोलन करताना ‘‘अरे रमेश, तू मित्रांबरोबर इथं येणार होतास ना?’’ असं म्हणू शकू. समोरची व्यक्ती रमेशच आहे आणि तो मित्रांबरोबर या ठिकाणी येणार होता ही माहिती आपल्याला रमेशच्या सोशल मीडियाच्या साइटवरच्या अपडेट्‌सवरून कळेल आणि ती गुगल ग्लास आपल्याला दाखवेल. याचं कारण गुगल ग्लासमधल्या कॅमेऱ्यानं टिपलेला फोटो आणि फेस रेकग्निशन सॉफ्टवेअर वापरून तो माणूस कोण आहे हे ओळखता येईल आणि मग त्याच्या फेसबुक किंवा अन्य ठिकाणी जाऊन गुगल ग्लास आपल्याला हवी ती माहिती आपल्या पडद्यावर दाखवू शकेल. तसंच एखादी नदी समोर असेल, तर जीपीएसचा वापर करून आपण कुठं आहोत आणि ती नदी कोणती आहे हे शोधून मग विकीपीडियामधून त्या नदीचा पूर्ण इतिहाससुद्धा आपल्याला समोर पडद्यावर दाखवता येईल आणि ती नदी बघताबघता एकीकडे आपण त्या नदीविषयीची माहितीसुद्धा वाचू शकू. समजा आपण एखाद्या मॉलकडे बघत असलो, तर त्याच वेळेला जीपीएससारख्या तंत्राचा वापर करून आपण कुठं आहोत हे कॉम्प्युटरला कळेल आणि त्यावरून इंटरनेटचा वापर करून समोरचा मॉल कुठला आहे, त्यात कुठली-कुठली दुकानं आहेत, त्यात कुठल्या-कुठल्या वस्तू किती किमतीला विकल्या जाताहेत, त्यात कुठली रेस्टॉरंट आहेत, त्यात कुठले-कुठले पदार्थ किती किमतीला मिळताहेत तसंच आत चाललेल्या सिनेमांविषयीची माहिती, त्यांच्या खेळांच्या वेळा, त्यांची तिकिटं, ती उपलब्ध आहेत की नाहीत, एवढंच नव्हे, तर त्या सिनेमांची परीक्षणं हेही सगळं आपल्याला कळू शकेल.

गुगल ग्लासमध्ये आपल्या अपॉइंटमेंट लक्षात ठेवण्याची सोय असेल, आपल्याला व्हिडिओ चॅट करता येतील, तसंच सोशल नेटवर्किंग साइटवरच्या मेसेजेसचे आपल्याला लगेच ॲलर्ट मिळतील. आपल्याला कुठंही जाताना दिशा कळेल आणि कुठं आणि केव्हा वळायचं हेही समजेल, हवामानाची आणि ट्रॅफिकची माहिती कळेल, फोटो आणि व्हिडिओ काढून शेअर करता येतील आणि मेमरीत साठवूनही ठेवता येतील. ‘न्यूयॉर्क टाइम्स’सारख्या अनेक वर्तमानपत्रांतल्या हव्या त्या बातम्या आणि त्यातली चित्रं दिसू शकतील. व्हॉइस रेकग्निशन सॉफ्टवेअर वापरून आपण बोलू त्याचं क्षणार्धात भाषांतर होऊन तो मेसेज दुसऱ्याकडे जाऊ शकेल. तसंच ऐकलेले शब्द दुसऱ्या भाषेत असतील, तरी आपल्या भाषेत अनुवाद होऊन ते ऐकू येऊ शकतील. गुगल या ग्लासवरून जाहिरातबाजी करू शकेल. उदाहरणार्थ, गुगल ग्लास वापरणारी व्यक्ती जिथं जाईल, जे पाहील ती माहिती गोळा करून गुगल त्या अनुषंगानं यूजरला जाहिराती दाखवेल.

गुगल ग्लासची ठळक अशी काही वैशिष्ट्यं सांगता येतील. एक म्हणजे तो सहजपणे डोळ्यांवर वापरता येईल असा आहे. सध्याचा अँड्रॉइड स्मार्टफोन आणि टॅब्लेट यांचं ते पुढचं विस्तारित रूप आहे. गुगल ग्लासची आणखी एक गंमत म्हणजे आपण त्यावर आपल्याला आलेले एसएमएस किंवा ई-मेल आपण पाहू शकतो आणि आपल्या आवाजात त्यांचं उत्तरही देऊ शकतो आणि हे उत्तर गुगल ग्लास आवाजातून मजकुरात (टेक्‍स्ट) रूपांतर करून ई-मेल किंवा एसएमएसद्वारे दुसऱ्यांना पाठवू शकतो. आपण गुगल ग्लासला समजा एखादा प्रश्‍न तोंडी विचारला, की गुगल ग्लास इंटरनेटवर त्या प्रश्‍नाचं उत्तर शोधून आपल्याला त्या ग्लासवरच्याच पडद्यावर उमटवून देईल. उदाहरणार्थ, आपण शनिवारवाड्यासमोर उभं असताना प्रश्‍न केला, की ‘शनिवारवाडा कधी बांधला होता?’ तर आपल्याला शनिवारवाड्याचा संपूर्ण इतिहास गुगल ग्लास देईल. आपलं रोजचं रूटिन पाहून तोच रोजच्या प्रवासापासून ते ऑफिसमधल्या अनेक कामांत गुगल ग्लास आपल्याला मदत करेल. म्हणजे वाहतूक किती आहे, कुठल्या मार्गानं जाणं सोपं असेल, एखादा मार्ग गर्दीनं जाम  झालेला असेल, तर दुसऱ्या कुठल्या मार्गानं जाता येईल वगैरे अनेक गोष्टींत तो मार्गदर्शन करेल. अर्थातच या सगळ्या गोष्टी चांगल्या तऱ्हेनं यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञानात बरीच प्रगती व्हावी लागेल आणि त्यासाठी अजून काही वेळ जावा लागेल; पण भविष्यात यातल्या अनेक गोष्टी घडतील यात शंकाच नाही.

गुगल ग्लास घातल्यावर काही उद्योगांवर मात्र खूप वाईट परिणाम होणार आहेत. उदाहरणार्थ, कॅसिनोमध्ये ते वापरून आपण दुसऱ्यांचे पत्ते ओळखू शकू किंवा सिनेमा थिएटरवर तो पूर्ण सिनेमा रेकॉर्ड करू शकू. अनेक नृत्यांच्या ठिकाणी आपण त्याचं व्हिडिओ शूटिंग करू शकू. तसंच लष्कराच्या आणि गुप्त ठिकाणांचे आपण फोटो काढू शकू. गुन्हेगार अनेक गोष्टींचं व्हिडिओ शूटिंग करून किंवा फोटो काढून इतरांना ब्लॅकमेल करू शकतील. कारखान्यांना भेट देणारी मंडळी आतल्या काही गुप्त गोष्टींची माहिती मिळवून ती स्पर्धकांना देऊ शकतील. अशा असंख्य गोष्टींमुळे एकंदरीतच कंपन्यांच्या आणि लोकांच्या खासगी आयुष्यावर, सुरक्षिततेवर आणि त्यांच्या प्रायव्हसीवर गदा येईल म्हणून अनेक कंपन्यांनी गुगल ग्लासच्या कल्पनेला आतापासूनच विरोध करायला सुरवात केली. याच चिंतेपोटी अमेरिकन काँग्रेसमधील आठ सदस्यांनी गुगलला पत्र लिहून आपली भीती व्यक्त केली आहे. ‘स्टॉप द सायबोर्ग’सारख्या चळवळी गुगल ग्लासवर बंदी आणायचा प्रचार करतायत, तर अमेरिकेत काही कंपन्यांनी ‘अँटी गुगल ग्लास’ बोर्ड लावलेत. रशिया, युक्रेन अशा देशांत असलेल्या कायद्यांनुसार तिथं गुगल ग्लास वापरणंच बेकायदा ठरेल, असंही काही जणांचं म्हणणं आहे.

गुगल ग्लासमार्फत टेक्‍स्ट, ऑडिओज, व्हिडिओज आणि फोटोज या सगळ्या स्वरूपात गोळा केलेली माहिती गुगल ड्राइव्हवर क्‍लाउड वापरून स्टोअर केली जाते. ती वेगवेगळ्या स्वरूपात योग्य तऱ्हेनं दाखवता यावी यासाठी गुगलनं या माहितीवरचे अधिकार गुगलकडे राहतील, असं प्रतिज्ञापत्र गुगल ग्लास खरेदी करणाऱ्यानं लिहून द्यावं, अशी अट घातली. डेव्हिड ॲस्प्रे या इंटरनेट सिक्‍युरिटी तज्ज्ञानं याबद्दल नाराजी व्यक्त केली. हा आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे, असं मत त्यानं मांडलं. फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेअरमुळे आपल्याला माहिती नसणाऱ्या लोकांची गर्दीतदेखील सोशल साइट वापरून ओळख काढता येईल. लोकांचं संभाषण त्यांच्या मर्जीविरुद्ध रेकॉर्ड करता येईल. या सगळ्यामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे गुगल ग्लास या क्षणाला जरी सामान्य जनतेत लोकप्रिय नसला, तरी पुढच्या काही वर्षांत जेव्हा हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित आणि लोकमान्य होईल तेव्हा जगात काय धूम माजवेल याची कल्पनाच केलेली बरी.

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is Google glass, explains Achyut Godbole