सद्‌संगती सुखाची प्रचिती

डॉ. अनुपमा साठे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

तापलेल्या लोखंडावर पडलेला पाण्याचा थेंब नामशेष होतो. तोच कमळाच्या पानावर पडला की मोत्यासारखा चमकतो. परंतु, स्वाती नक्षत्रात जर तो शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. अर्थात अधम, मध्यम किंवा उत्तम गुण प्रकट होणार हे प्रायः संगतीवर अवलंबून असतं.

मुलं लहान असतात तोपर्यंत आई किंवा वडील सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. ते कुणाशी बोलतात, कुणाबरोबर खेळतात इ. मोठे झाल्यावर मुलं थोडे स्वतंत्र होतात व त्यांच्यावर पूर्णवेळ लक्ष ठेवणं सोपं नसतं. तरी पण एक गोष्ट आवर्जून बघितली जाते, ती म्हणजे मुलांचे मित्र-मैत्रिणी कसे आहेत? ते कुणाबरोबर जास्त वेळ घालवतात, त्यांचं कुणाबरोबर जास्त उठणं-बसणं आहे. त्यांचे मित्र-मैत्रिणी अभ्यासात कसे आहेत. त्यांच्यामध्ये इतर काही दुर्गुण दिसून येतात का? इत्यादी. मुलांना अर्थातच अशा चौकशांचा राग येतो आणि या गोष्टी त्यांना बंधनकारक वाटतात. परंतु, पालक एवढे का सजग असतात? का त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी चांगल्या संगतीत ररहावं? फक्त मुलांनीच नव्हे तर मोठ्यांनीसुद्धा एकवेळा स्वतःची संगती तपासून बघावी. आपण ज्यांच्या सहवासात सतत राहत असतो ते लोक कसे आहेत? सद्‌प्रवृत्तीचे की दुर्वृत्तीचे? राजा भर्तृहरी यांचा नीतिशतकातला एक प्रसिद्ध श्‍लोक आहे..

सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामामि ना ज्ञायते
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते।
स्वात्यां सागरशुक्तिमध्य पतितं तन्मौक्तिकं जायते
प्रायेणाधममध्योत्मगुण: संसर्गतो जायते ×

तापलेल्या लोखंडावर पडलेला पाण्याचा थेंब नामशेष होतो. तोच कमळाच्या पानावर पडला की मोत्यासारखा चमकतो. परंतु, स्वाती नक्षत्रात जर तो शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. अर्थात अधम, मध्यम किंवा उत्तम गुण प्रकट होणार हे प्रायः संगतीवर अवलंबून असतं.

A man is known by the company he keeps. इंग्रजीतल्या या सुप्रसिद्ध वाक्‍याचा अर्थ आहे, कुणाही व्यक्तीची पारख ती कुणाच्या संगतीत राहते यावरून होते. खरंच आहे, लहान मुलं काय व मोठे काय, आपण सर्वजण निरीक्षणानेच शिकतो. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आपली एक आठवण सांगतात. "जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा खेळत असताना वडिलांचे एक शिष्य चुकीचा रियाज करताहेत असे माझ्या लक्षात आले. मी लगेच आत जाऊन त्यांची चूक दुरुस्त करून दिली.' (हे शिष्य होते चंद्रकांत गोखले, जे पुढे जाऊन मराठीतले सुप्रसिद्ध नट झाले.) वडील दीनानाथ मंगेशकर दारातून हे दृश्‍य बघत होते. त्यांनी दुसऱ्याच दिवशीपासून लताजींची संगीत शिकवणी सुरू केली. त्यांच्याकडे संगीताशी निगडित लोकांचा अहर्निश राबता असे. त्यामुळे सततच्या निरीक्षणातून फार लहान वयापासून त्यांच्यात संगीताची जाण निर्माण झाली.

आपल्या आजूबाजूचे लोक कोण आहेत, कसे आहेत, यावर आपली ओळख निर्माण होते. जर आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलो तर नकळत त्यांचे चांगले गुण, चांगल्या सवयी आपण आत्मसात करतो. रोज रोज एकाच जागेवर दोर घासल्यामुळे विहिरीच्या दगडावरही चिन्ह अंकित होत जातं तर आपल्या मनावर, स्वभावावर व वर्तणुकीवर परिणाम नक्कीच होणार. गुलाबाच्या पाकळ्यादेखील जरा जास्त वेळ हातात धरून ठेवल्या तर बोटांना गुलाबाचा सुगंध येतो. मग सज्जन व्यक्तींच्या तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वालाच अलौकिक सुगंध असतो. त्यांच्या सहवासात आपलं व्यक्तिमत्त्व उजळून निघू शकतं.
कबीरजी म्हणतात-
कबीर संगत साधू की, ज्यो गंधी की बास।
जो गंधी कुछ दे नहीं, तो भी बास सुबास ×
गंधीचा अर्थ अत्तर विकणारा. जरी अत्तर विकणाऱ्याकडून काही घेतलं नाही, तरी त्याच्या जवळ बसल्याने आपल्याही अंगाला सुवास येतो, तसेच सज्जन व्यक्तींच्या सहवासात आपली प्रवृत्तीही सज्जन होऊ लागते.

सज्जनांचे सद्गुण आत्मसात करणं जेवढं सहज आहे, त्यापेक्षाही सोपं आहे दुर्जनांचे अवगुण उचलणं. म्हणून वाईट संगती टाळायला हवी. चांगल्या सवयी लावायला प्रयत्न करावा लागतो. वाईट सवयी मात्र पटकन आपल्या व्यक्तिमत्त्वात घर करून बसतात. स्वामी विवेकानंद आपल्या प्रवचनांमधे एक गोष्ट अनेक वेळा सांगायचे. एक गर्भवती सिंहीण अन्नाच्या शोधात हिंडत होती. तिला एक मेंढरांचा कळप दिसला. जेव्हा तिने शिकारीसाठी झेप घेतली त्याच वेळी ती प्रसूत झाली. ते पिल्लू मेंढरांच्या कळपात जाऊन पडलं. त्यातच ते मोठं झालं व मेंढरांसारखंच वागू लागलं. त्याची आपल्या स्वतःच्या क्षमतेशी कधी ओळख झालीच नाही. आपण मेंढी नसून सिंह आहोत या गोष्टीचा आणि म्हणूनच आपल्या ताकदीचा प्रत्यय आलाच नाही. एकदा एका म्हाताऱ्या सिंहाच्या तो दृष्टीस पडला व त्याला बघून त्या म्हाताऱ्या सिंहाला फार आश्‍चर्य वाटले. त्याने हळूच त्या तरुण सिंहाला एका बाजूस नेले व त्याची छवी तलावाच्या पाण्यात दाखवली. आपलं प्रतिबिंब बघून सिंहाला आपली खरी ओळख पटली व आपल्या ताकदीची जाणीव झाली. कबीरजी म्हणतात...
ऐक घड़ी आधो घड़ी, आधो हुं सो आध।
कबीर संगति साधु की, कटै कोटी अपराध।।
अज्ञानाचा नाश करायला संत संगतीचा एक किंवा त्याचाही अर्धा क्षण पुरेसा असतो. त्या उलट दुर्जनांच्या संगतीत चांगल्या वृत्तीचा पण विनाश होतो. केळीचे झाड जर बोराच्या वृक्षाजवळ लावले, तर त्याच्या काट्यांनी केळीची सर्व पानं फाटून जातात. साधारणपणे स्वभाव ओळखण्याची क्षमता आपणा सर्वांमधेच असते. बरेचदा आपण त्या सद्विवेकबुद्धीचा वापर करत नाही. कधी अजाणतेपणाने तर कधी जाणूनसुद्धा आपण दुर्वृत्तीच्या लोकांची साथ सोडत नाही. कळत नकळत आपण पण त्यांचे गुण उचलतो. त्यापेक्षा वेळेतच माणसांची पारख करून अशा लोकांपासून दूर असलेलं बरं! सज्जनांच्या संगतीचे फायदे सांगताना महाराज भर्तृहरी सांगतात...

जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्य
मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति ।
चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्ति
सत्संगतिः कथय किन्न करोति पुंसाम्‌ ×

बुद्धीची मंदता हरते, अर्थात बुद्धी तेज करते, वाणीस सत्य बोलणं शिकविते, मानसन्मान व उन्नती दाखवते, नीच कर्मांपासून परावृत करते, चित्तास प्रसन्नता देते, सर्व दिशांमधे कीर्ती पसरविते. सज्जनांची संगती काय नाही करत!

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is happiness