'रुह की गिजा'; जाणून घ्या अत्तराचा इतिहास आणि महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Perfume

'रुह की गिजा'; जाणून घ्या अत्तराचा इतिहास आणि महत्त्व

अत्तराचे नाव घेताच सगळीकडे सुगंध दरवळायला लागतो. डोळयासमोर रंगीत काचेच्या छोट्या छोट्या विविध आकर्षक येतात.हाच अत्तराविषयी सविस्तर माहिती आपण समजुन घेऊ या...

अत्तर हे झाडांच्या विविध स्त्रोतांमधून मिळविलेले एक सुगंधी तेल आहे. गुलाबाच्या फुलांपासून अत्तर काढण्याची पद्धत तर मोगल सम्राट जहांगीरची पट्टराणी नूरजहाँने शोधून काढली. अत्तर हे सुगंधासाठी शरीरावर तसेच कपड्यावर लावले जातेच, पण त्याचा सुगंध जसे वासाचे सुख देतात, तसाच ते मनावर आणि शरीरावर इष्ट परिणाम घडवून रोगनिवारणालाही मदत करतो. एक सकारात्मक उर्जा अत्तराचा सुगंध निर्माण करतो.

सुगंधित फुलांच्या रसापासून तयार केले जाणारे अत्तर हा निर्मितीचा सर्वात जुना अन प्राचीन प्रकार आहे. पुरातन काळात अनेक प्रकारची फुले एकत्रित करून त्याचे विविध सुगंध तयार केले जात होते. यामध्ये फक्त फुलांचा रस आणि गुलाब पाणी असायचे. अत्तराचे एक वेगळे महत्त्व आहे. अत्तर हे नुसते सुगंधी द्रव्यच नाही तर अत्तर म्हणजे भावना, परंपरा, एक आपुलकीचा आनंद वाटणारा अनमोल घटक आहे.

अत्तर शब्दाचा इतिहास

अत्तर' हा शब्द पारशी भाषेतील 'इतिर' या शब्दापासून आला आहे 'इतिर' याचा अर्थ सुगंधी द्रव्य असा होतो. पैगंबर मोहंमद यांना अत्तर खूप आवडत असे त्यामुळे त्यांचे अनुयायी लोक मोठया प्रमाणात अत्तर लावू लागले अन बघता बघता अत्तराला धार्मिक महत्त्व आले. इस्लाम धर्मात अत्तराला रुह की गिजा म्हणतात.

अत्तर तयार कसे होते?

उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये मोठा रांजण आणि वाफ यांचा वापर करत पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने अत्तर तयार केले जाते. कोणत्याही यंत्राचा वगैरे वापर त्यासाठी केला जात नाही. एका मोठ्या रांजणात पाणी आणि ज्यांच्यापासून अत्तर तयार करायचे आहे त्या वस्तू एकत्र ठेवून रांजणाला विशिष्ट तापमानावर गरम केले जाते. त्यातून तयार होणारे बाष्प एका हवाबंद नळीत जमा केले जाते. त्याच्यापासून पुढे अत्तर तयार केले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असली तरी त्याचे अंतिम निष्कर्ष ‘सुगंधी’ असतात, हे नक्की. विशेष म्हणजे अत्तर तयार करताना कोणत्याही प्रकारच्या मद्यार्कांचा वापर कटाक्षाने टाळला जातो, ही कन्नौजच्या अत्तराची खासियत. या संपूर्ण प्रक्रियेत नैसर्गिक साधनांचाच वापर केला जातो. अत्तर निर्मितीदरम्यान निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचाही वापर केला जातो. जसे की, गुलाबाच्या पाकळ्या किंवा चंदनाच्या पाकळ्यांचा वापर अगरबत्ती तयार करण्यासाठी तर उरलेल्या सांडपाण्याचा वापर अंघोळीसाठी केला जातो.

अत्तर लावण्याची पद्धत

अत्तर लावण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे. जुने लोक सांगतात की, अत्तर कपड्यावर नाही तर ते थेट शरीरावर लावायचे असते. शरीराच्या ज्या भागांवरील नसा त्वचेपासून जवळ असतात, उदाहरणार्थ मनगट, कानाच्या खालच्या बाजुला, मानेच्या दोन्ही बाजुला अत्तर लावले जाते. तसेच अत्तर लावताना हा देखील सांगितल जात की, अत्तर लावण्यापूर्वी तळहाताच्या मागील बाजूस ते थोडेसे लावावे आणि दुसऱ्या हाताच्या पाठीमागे घासून घ्यावे. याच्या मदतीने तुम्ही त्याचा सुंदर सुगंध अनुभवू शकाल.

अत्तर लावताना नेमकी कोणती काळजी घ्यावी

अत्तर लावतांना जर कपड्याला लागले तर, कपड्याला त्याचे डाग पडू शकतात. त्यामुळे कपडे घालताना थेट रोलरमधून अत्तर लावणे टाळावे. एकतर कपडे घालण्यापूर्वी अत्तर लावणे चांगले किंवा कपडे घातल्यानंतर बोटावर अत्तर घेऊन ते थेट अंगावर घासावे. अत्तरांची ठराविक मात्रेच लावावे. अत्तरात खूप तीव्र सुगंध असतो जो थोडासा लावल्यानंतरही बराच काळ टिकतो.

अत्तराची लोकप्रियता

अत्तराचा एकूण प्रवास पाहिला तर नामांकित कंपन्यांच्या डिओ आणि परफ्युमची स्पर्धात नवाबी अत्तर हा शिरोमणी असल्याची भूमिका बजावत आहे. यावरून हेच लक्षात येते की लोकांचा पारंपरिक अत्तर वापरण्याचे प्रमाण वाढतच आहे हे अत्तर तर आता कॉलेजकुमाराच्या मनावरही अधिराज्य करु लागले आहे. अत्तर हा नवाबी शौक आहे असे एक अत्तर प्रेमी सांगतात. आज घडीला पारंपरिक अत्तरा मध्ये गुलाब, मोगरा, चंदन, कस्तुरी, अंबर तर अरेबिक प्रकारात अरेबियन मस्क, सऊतुल अरब, मुश्क अंबर यांना मागणी आहे. वेस्टर्न प्रकारात बॉडी कोरस, कॉपर फ्रेंच असे प्रकार आहेत. विशेषतः मजमुआ, कस्तुरी, बॉडी कोरस, जोवन मस्क व ब्लू स्टोन हे अत्तरांचा ग्राहक कायम आग्रह धरुन असतात.ज्येष्ठ नागरिकांचा ओढा शाही दरबार, गुलाब मजमुआ, महेफिल या अत्तराकडे आहे.

औरंगाबाद आणि अत्तर हे समीकरण खुप जुणे आहे

दिवाळी, ईद, रमजान मध्ये औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात अत्तराची विक्री होतो. काही शौकीन लोक तर विदर्भातुन अत्तर खरेदी औरंगाबादला येते असते अत्तर विक्रते सांगतात. औरंगाबाद शहराला अत्तराची खुप मोठी जुनी ऐतिहासिक परंपरा आहे. आजच्या घडीला औरंगाबादमध्ये खास करुन सिटी चौक आणि चंपा चौकात तसेच इत्र गल्ली इथे अत्तराची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. तिथे सगळया प्रकारची अत्तरे मिळतात.

Web Title: What Is The History And Importance Of Perfume

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestylePerfume
go to top