आमचे योगदान काय?

contribution
contribution


आपल्यापैकी अनेकांना स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीत अमेरिकेत घडलेला हा प्रसंग ऐकून माहीत असतो. स्वामीजी अमेरिकेत रस्त्यावरून फिरत होते. त्यांच्या अंगावर असलेली भगवी कफनी, फेटा बघून, बाजूने जाणारी तरुणी आपल्या नवऱ्याला म्हणते, हा माणूस त्याच्या कपड्यांवरून तरी सभ्य वाटत नाही. हा गावंढळ कुठून आला कुणास ठाऊक?
तिचे हे शब्द स्वामीजींच्या कानावर पडतात आणि स्वामीजी म्हणतात, हा गावंढळ माणूस भारतातून आला आहे, आणि हो...तुमच्या देशात शिंपी माणसाला सभ्य किंवा असभ्य ठरवत असेल; पण माझ्या देशात माणूस हा त्याच्या कपड्यावरून नव्हे तर चारित्र्यावरून सुसंस्कृत आणि सभ्य ठरवला जातो.
In my country character makes a man gentleman. हा प्रसंग मुस्लिम धर्मगुरू आणि विचारवंत मौलाना वाहिदुद्दीन खान यांनी आपल्या अमेरिकन मित्राला सांगितला आणि त्यांना वाटले की आपला मित्र या प्रसंगाने प्रभावित होईल, सुखावेल. पण, झालं मात्र त्याच्या अगदी उलट. तो मित्र उत्तरादाखल म्हणाला, कदाचित स्वामी विवेकानंद यांच्या काळात ते खरे असेलही पण वर्तमानात मात्र भारताला चारित्र्य हे आयात करावी लागणारी गोष्ट ठरते आहे. मित्राच्या या उत्तराने मौलाना अंतर्मुख झाले.
त्या अमेरिकन माणसाची ही टिप्पणी आपल्याला विचार करायला बाध्य करते. प्रत्येक देशाकडे जगाला द्यायला काहीतरी असते. त्याला अलीकडे युनिक सेल्लिंग प्रॉडक्‍ट असे म्हणतात. जपान आणि जर्मनी या देशांकडे युनिक सेल्लिंग प्रॉडक्‍ट काय आहे? तर त्यांचे तंत्रज्ञान. होंडा, टोयोटो, मर्सडीज, जगवार या गाड्यांनी जगाच्या बाजारावर कब्जा केला आहे तो केवळ तंत्रज्ञानामुळे. मध्यपूर्वेतील देशांकडे आहे निसर्गाने दिलेलं तेल. अमेरिकेकडे अमर्याद स्वातंत्र्य. ज्याची भुरळ आपल्या सगळ्यांना पडते. आणि मग प्रश्न पडतो; भारताचे युनिक सेल्लिंग प्रॉडक्‍ट काय आहे? भारताचे अध्यात्म, संस्कृती, सभ्यता आणि चारित्र्य हे आजवर एक्‍सपोर्ट मटेरियल राहिलेले आहे. आम्ही जगाला बुद्ध दिला, विवेकानंद दिले, सर्वेपि सुखीन: संतू हा बीजमंत्र दिला. 2010 मध्ये बराक ओबामा भारतात आलेले असताना भारतीय संसदेत ते म्हणाले होते. विवेकानंदांनी आमच्यावर नैतिकतेचे संस्कार केले. तीच नैतिकता आणि चारित्र्य भारतीय समाज गमावून बसणार असेल तर वर्तमान जागतिक व्यवहारात आमचे योगदान ते काय? स्वामीजी अमेरिकेत सांगत असत; आम्हाला तुमचा धर्म नकोय. धर्म आणि अध्यात्म हे भारताच्या भूमीत भरपूर आहेत. आम्हाला द्या तुमच्यातली शिस्त, विज्ञान आणि आधुनिक शिक्षण. भारताचे अध्यात्म आणि युरोपचे विज्ञान या बळावर जगाला सुखी करण्याची मनीषा ते बोलून जातात. त्या स्वप्नाचा पाठलाग करणे म्हणजेच जगाच्या कल्याणात आम्ही आमचे योगदान देण्यासारखे आहे.
मागील आठवड्यात वर्तमानपत्रातून आलेल्या दोन घटना कोणत्याही सामान्य माणसाला सुन्न करणाऱ्या आहेत. एक तिशीतील विवाहित शिक्षिका शाळेतील नवव्या वर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षाच्या मुलासोबत पळून जाते. याला काय म्हणावे? आणि दुसऱ्या एका घटनेत एक पन्नाशीतला माणूस ज्याच्या मुलीचे लग्न अगदी तोंडावर आहे. त्याचे आपल्याच विहीणबाईसोबत प्रेमसंबंध निर्माण होतात आणि आपल्या मुलांचे लग्न टाकून हे दोघे स्व सुखासाठी पळून जातात. ही संस्कृतीहीनतेची लक्षणे आहेत.
काही वर्षांपूर्वी मी "टू इज कंपनी' या नाटकात काम करत होतो. त्यातील एक पात्र आपल्या एन. आर. आय. मैत्रिणीला भारत आणि अमेरिकेतील फरक विचारतो. ती सांगते, समजा एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्री सोबत शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा झालीच तर तो तिला स्पष्टपणे विचारतो; अर्थात तिचा नकार देण्याचा अधिकार गृहीत धरून. तिने घातलेल्या तोकड्या कपड्यावर कुणी तिथे दूषणे देत नाहीत. पण, तीच स्त्री जेव्हा भारतात अंगभर कपडे घालून बाजारात फिरत असते. तेव्हा तिच्या शरीराला भेदून जाणाऱ्या वखवखलेल्या नजरा बघून आपण कपडे घातलेत की नाही असा प्रश्न तिला पडावा. कुठून आले हे आमच्या समाजात? सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांना या प्रश्नांची उत्तरे शोधायला लागतील.
उपभोगिता आणि संस्कृतीहीनतेची ही लक्षणे बघितली की, अरे ! आम्ही अमृताचे पुत्र आहोत. हे सांगणारे स्वामीजी आठवतात. सोनागाछीत देहविक्रय करणाऱ्या महिलांची अवस्था बघून हळहळणारे स्वामीजी आठवतात. कल्याणच्या सुभेदारची सून भेट म्हणून आणल्यावर, तिची खणा-नारळाने ओटी भरून आपल्या भगिनीप्रमाणे पाठराखण करणारे महाराज आठवतात. आम्ही त्यांचे वारसदार आहोत ज्यांनी या जगाला भरभरून दिले. आमच्या आजच्या पिढीला ठरवावे लागेल की आमचे युनिक सेल्लिंग प्रॉडक्‍ट नेमके काय आहे? अर्थव्यवस्थेला गती द्यायची म्हणजे भौतिक उत्पादन जगाच्या बाजारात अधिकाधिक गेले पाहिजे हे खरे आहे; पण हे करीत असताना आम्हाला आमचं मूळ आणि मूल्ये वारंवार तपासून पाहावी लागतील. म्हणजे चारित्र्य ही आयात करावी लागणारी गोष्ट ठरणार नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com