कवितेची श्रेष्ठ कलाकृती घडते कशी?

poem.
poem.

कवीने वास्तवाचे वाचन करावे, वास्तववादी असावे, असे मानण्याच्या काळात आज जी चर्चा उपस्थित करत आहे ती फारशी रुचणारी नाही; पण ती मूलभूत स्वरूपाची असल्याने केलीच पाहिजे. वाचकाला कविता कळली पाहिजे, वाचताक्षणी अर्थनिष्पत्ती झाली पाहिजे, असेही सामान्यतः मानण्याचा हा काळ आहे. परंतु, या गृहीतकांच्या मागे कला व काव्य या दोन्ही संज्ञा आणि संकल्पनांच्या बाबतीतला आकलनाचा घोळ आहे असे म्हणता येईल, अशी मराठी व हिंदी काव्यविश्वातील परिस्थिती आहे.

या आकलनाच्या संदिग्धतेमुळे काव्यालंकार (Poetic Devices) अनुपस्थित असलेली, व्यवहारातली भाषाच (Functional Language) काव्यभाषा म्हणून वापरणारी कविता मोठ्या प्रमाणावर लिहिली जात आहे. या पार्श्वभूमीवर काव्यालंकारांचा वापर करणारे, उत्तम काव्य भाषा वापरणारे व कवितेत तत्त्वज्ञानातला तर्क न वापरता काव्य-तर्क (Poetic Logic) वापरणारे काही कवी, त्यांच्या कविता आपले वेगळे स्थान निर्माण करतात.

कला आणि काव्य यांच्या समीक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या सौंदर्यशास्त्राच्या व्याख्येतच असे म्हटले आहे की, हे शास्त्र कला व सौंदर्य या दोन गोष्टींचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे. कला व सौंदर्य या दोन्ही संज्ञा स्वतंत्र आहेत, असे गृहीत धरूनच हे शास्त्र अभ्यास करत असते. एका मूलभूत गोष्टीचा कलावंताने व कलेचा आस्वाद घेणाऱ्यानेही विचार करायला हवा ती गोष्ट म्हणजे कलाकृतीतील सौंदर्य म्हणजे नेमके काय आणि ते निसर्गातल्या सौंदर्यापेक्षा वेगळे कसे असते? या संदर्भातील गेल्या दोन-एक शतकांतील चर्चेने हे लक्षात आणून दिले आहे की, निसर्गातल्या अनेक गोष्टींचा आपल्याला विविध इंद्रियांच्या माध्यमातून सौंदर्यबोध होत असतो. उदाहरणार्थ सूर्योदय-सूर्यास्ताचे दृश्‍य, फूल, फळ, झाड, नदी, समुद्र, पहाड यांच्या दर्शनाने माणसाच्या तोंडून निघणारे "व्वा' हा सौंदर्यबोध आहे. परंतु, त्याच सूर्योदयाचे, सूर्यास्ताचे एखाद्या चित्रकाराने काढलेले चित्र किंवा वर उल्लेख केलेल्या फूल, फळ, झाड आदी नैसर्गिक गोष्टींचे चित्रकाराने चित्र काढल्यास ते चित्र बघतानाही आस्वादक "व्वा' असे म्हणतोच. मग त्याच्या या दोन वरवर एकच वाटणाऱ्या सौंदर्यबोधाच्या प्रतिक्रियांमध्ये फरक तो काय?

या ठिकाणी त्या चित्रकाराने काढलेले चित्र ही कलाकृती ठरते आणि निसर्गातल्या सुंदर घटीतांत अंगभूत सौंदर्य असले तरी त्यांना आपण कलाकृती म्हणत नाही. हा मूलभूत फरक प्रत्येक कलावंताने कवितेच्या बाबतीत कवीने मुळातून समजून घेतला पाहिजे.

निसर्गातील, अवतीभोवतीच्या जगातील, जगतो त्या समाजातील सर्व वास्तवांचे कवी एका विशिष्ट जीवनदृष्टीने वाचन करत असतो. त्या वाचनातून त्या वास्तवाचा जीवनदृष्टीच्या मदतीने एक अन्वय लावत असतो. त्यातून एक आशय घडवत असतो आणि पुढे जाऊन स्वतःच्या कळतनकळत जाणिवेच्या, नेणिवेच्या, मेंदूत घडत असलेल्या अनेक प्रक्रियांच्या मदतीने तो हा आशय भाषेत आणत असतो. ही प्रक्रिया व अनुभवाचे शब्दांच्या मदतीने भाषेत येणे ही वरील वाक्‍यात मांडली आहे तशी एकरेषीय प्रक्रिया नसते; ती गुंतागुंतीची असते. या प्रक्रियेत अनुभवाची अनेक परिष्करणे होत असतात व शेवटी भाषेत आल्यावर एक कविता आकारास येत असते. या प्रक्रियेत कवी जीवनदृष्टी, जीवनानुभव घेण्याची क्षमता आणि तीव्रता, भाषिक समज, उत्तम काव्याची काव्य-स्मृती हे सारे त्या अनुभवात जोडत असतो किंबहुना पणाला लावत असतो.

इथे विस्ताराने मांडण्याचा तो विषय नव्हे. परंतु, मेंदू विज्ञान (Neurology) व मानसशास्त्र या दोन विद्याशाखांमध्ये गेल्या 50-60 वर्षांत झालेल्या संशोधनामुळे ज्याला आपण बाह्य किंवा आंतरिकवास्तव म्हणतो त्या वास्तवाचे स्वरूप, माणसाला इंद्रियांच्या माध्यमातून होत असलेला वास्तवाचा बोध आणि त्या बोधातून जन्म घेणारे आकलन, या संबंधी अनेक नव्या गोष्टी पुढे येत आहेत. यामुळे आजवर ज्याला वास्तव म्हटले त्याचे एकुणात संकल्पनेच्या पातळीवरचे स्वरूप बदलून जाणार आहे.

यामुळे आपण कवितेत वास्तव मांडत असतो, असे कुणाला वाटत असेल, तर ते चूक ठरण्याची मोठीच शक्‍यता आहे. तसेही वर जसा नैसर्गिक घटितांतील सौंदर्य व कलाकृतींतील सौंदर्य यात भेद केलेला आहे तसाच भेद बाह्यवास्तव व त्या वास्तवाचे कवितेतील आविष्करण यात भेद मानला पाहिजे. तो भेद कुठून येतो? हा प्रश्न कवीने काळजीपूर्वक विचारला पाहिजे. त्यावर चिंतन केले पाहिजे.

उदाहरणार्थ विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट मानल्या गेलेल्या ज्या निवडक काव्यकृती आहेत त्यात फेदेरिको गार्सिया लोर्का (Federico Garcia Lorca) याचा Poet In New York हा संग्रह सर्वोत्तम संग्रह मानला जातो. स्पॅनिश लोर्काला त्याच्या कुटुंबीयांनी इंग्रजी शिकायला न्यूयॉर्कला पाठवले. साधारण वर्षभरच लोर्का न्यूयॉर्कमध्ये राहिला. त्या काळात ते प्रचंड मोठे शहर, तिथली गर्दी, गगनचुंबी इमारती, सामान्य माणसाच्या जीवनातील क्रूरता, शहरवासीयांच्या जगण्यात शिरलेली परात्मता इत्यादी त्याला हादरवून टाकणाऱ्या वास्तवातल्या घटितांचा अनुभव घेतला व तो अनुभव त्याच्या Poet In New York या संग्रहातील कवितांतून मांडला. या कविता एका अर्थाने एका कवीने केलेल्या न्यूयॉर्कच्या तत्कालीन वास्तवाचे वाचनच आहे. पण, त्या वाचनाची कविता होत असताना नेमके काय घडत असते, हे लोर्काने जी काव्यभाषा वापरली आहे, ज्याप्रकारे प्रतिमा, प्रतीके, व्यंजना, रूपके, पुनरुक्ती आदी काव्यालंकारांचा वापर केला आहे तो थक्क करून टाकणारा आहे. पण, त्याचमुळे ही कविता श्रेष्ठ कलाकृती मानली जाते.

After a Walk या कवितेतील काही ओळी बघा.

With the amputated tree that doesn`t sing
And the child with the blank face of an egg.

With the little animals whose skulls are cracked
and the water, dressed in rags, but with dry feet.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com