मुलांना स्वत:चा फोन कधी द्यावा?

कोरोनामुळे ‘ऑनलाईन शाळा’ हा प्रकार सुरू झाला आणि मुलांचे बहुतेक सगळे क्लासेस ऑनलाईन झाले. ज्या मुलांच्या हातात फोन नव्हते त्या मुलांच्या हातातही त्यामुळे फोन्स आले.
phone
phonesakal

- मुक्‍ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com

कोरोनामुळे ‘ऑनलाईन शाळा’ हा प्रकार सुरू झाला आणि मुलांचे बहुतेक सगळे क्लासेस ऑनलाईन झाले. ज्या मुलांच्या हातात फोन नव्हते त्या मुलांच्या हातातही त्यामुळे फोन्स आले. आई-बाबांचे किंवा आजी-आजोबांचे फोन वापरण्याऐवजी पालकांनी मुलांना त्यांचे स्वतःचे फोन, टॅब आणि लॅपटॉप घेऊन दिले आणि ज्या मुलांच्या हातात फोन नव्हते त्याही मुलांच्या हातात बघता बघता फोन आले.

‘हॉलमार्क २००९’ च्या अभ्यासानुसार, कुठलीही सवय जडण्यासाठी १९ ते २५४ दिवसांचा कालावधी लागू शकतो. मोबाईलचा विचार करता कोरोनाच्या महामारीची दोन वर्षं, म्हणजे ७३० दिवस, सतत मुलांच्या हातात फोन होते. अर्थातच त्यांना त्याची सवय जडली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत मोबाईल वापरणं; मग ते अभ्यासासाठी असो नाहीतर अवांतर क्लासेससाठी असो, नाहीतर मनोरंजनासाठी असो...ही बाब सर्वमान्य होती.

मुलांनी सतत मोबाईल वापरणंही तेव्हा बऱ्यापैकी सर्वमान्य होतं. त्यामुळं मुलांच्या सवयी वाढत गेल्या आणि त्यांचं रूपांतर अवलंबित्वात झालं. कालांतरानं कोरोनाची स्थिती संपली...लॉकडाऊन राहिला नाही व शाळा-क्लासेस ऑफलाईन सुरू झाले आणि अचानक मुलांच्या हातातल्या मोबाईलची आणि त्याच्या अतिवापराची जाणीव अलीकडं होऊ लागली आहे. मात्र, ज्या गोष्टी सतत ७३० दिवस सुरू होत्या त्या अचानक फिरून मागं येणार नाहीत, त्या सवयी एका रात्रीत बदलणार नाहीत हे समजून घेतलं पाहिजे.

‘सामूहिक विचार’ अत्यावश्यक

पालक म्हणून मुलांना मोबाईल कधी द्यावा हा ज्या त्या पालकांचा वैयक्तिक निर्णय आहे; पण या विषयातली एक अभ्यासक म्हणून मला नेहमीच वाटतं की, मुलांची किमान दहावी होईपर्यंत त्यांना फोन देण्याची आवश्यकता नसते. त्यातून संपर्कासाठी द्यायचा असेलच तर तो साधा फोन द्यावा.

आठवीपर्यंत तर मुलांना स्मार्टफोन, महागडे फोन या कशाचीच गरज नसते. ती मुलांची मूलभूत गरज नाही. त्यांना यूट्यूब किंवा इतर ओटीटीवरच्या गोष्टी बघायच्या असतील तर त्या त्यांना घरातल्या टीव्हीवर किंवा आई-बाबांच्या मोबाईलवर बघता येऊ शकतात. संपर्कापुरता साधा बटणफोनही मुलांना पुरेसा असतो. एकदा त्यांची दहावी झाली की शालेय जीवन संपतं, त्याचबरोबर वयानंही ते समजदार होतात.

मोबाईलच्या धोक्यांविषयी त्यांच्याशी संवाद साधल्यास त्यांना अधिक नीट विषय समजून घेता येऊ शकतो; पण अनेकदा पालकांना या गोष्टी पटत नाहीत हा माझा अनुभव आहे.

त्यामागं काही महत्त्वाची कारणं असतात. उदाहरणार्थ :

१) आमच्याकडं पैसे आहेत तर आम्ही भारीतले फोन का घेऊन द्यायचे नाहीत मुलांना?

२) इतर सगळ्यांच्या मुलांकडं फोन आहेत...मीच दिला नाही तर माझ्या मुलाला वाईट वाटेल... त्याला बाकीचे चिडवतील.

३) मुलांना स्मार्टफोन दिले नाहीत तर ते टेकसॅव्ही होणार नाहीत आणि जगाच्या स्पर्धेत मागं पडतील.

यातलं दुसऱ्या क्रमांकाचं कारण सोडलं तर बाकीची कारणं तितकीशी खरी नाहीत आणि योग्यही नाहीत. इतरांकडं फोन असले की मुलांवर एक प्रकारचं ‘पीअर प्रेशर’ असतं ही गोष्ट अगदीच खरी आहे. म्हणूनच इथं संवादाचं महत्त्व आहे. अशा वेळी मुलांना विश्वासात घेऊन, त्यांना फोन का दिला जात नाही, याची माहिती देणं आवश्यक आहे. शिवाय, मुलांच्या बाबतीत समाजानं काही बाबतींत सामूहिक विचार आणि प्रयत्न करणं आवश्यक असतं, असं मला नेहमीच वाटतं.

मुलं हा कुठल्याही पालकांसाठी त्यांचा ‘स्टेटस सिम्बॉल’ असता कामा नये. आपण मुलांना किती महागातला फोन घेऊन देऊ शकतो ही दाखवण्याची गोष्ट नाही. उलट, पालकांनी एखादा सामूहिक विचार स्वीकारला तर सगळ्याच मुलांचा त्यात फायदा असतो आणि ‘पीअर प्रेशर’चे प्रसंग कमी व्हायला मदत होते.

पूर्वीच्या काळी अनेक बाबतींत कळत-नकळत, पद्धत म्हणून पालक असा सामूहिक विचार करत असत. हल्ली मात्र हे प्रमाण झपाट्यानं कमी होतंय. त्यामुळं सगळ्या पालकांनी या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे.

सोशल मीडियावरचे धोके असे टाळा...

‘ज्यांचं वय १३ वर्षं पूर्ण झालं आहे ते कुणीही सोशल मीडिया वापरू शकतात’ असं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणतात. मात्र, इथंही दहावी होईपर्यंत मुलांना सोशल मीडिया वापरू देऊ नये. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरचं वातावरण प्रचंड कलुषित झालेलं आहे. मुलांना ट्रोल करण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढलेलं आहे. मुलांना टार्गेट करण्याचं प्रमाण, त्यांच्याबाबत सोशल मीडियावर गुन्हे घडण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे.

आपल्याशी कोण कुठल्या हेतूनं वागतंय हे मुलांच्या लक्षात अनेकदा येत नाही. बॉडी-शेमिंगचं प्रमाण झपाट्यानं वाढलेलं आहे. त्यातून स्वप्रतिमा विस्कळित होण्याचे प्रकार मुलांच्या बाबतीत घडतात. मुलीही मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर लक्ष्य होतात. बुलिंगचं प्रमाण वेगानं वाढतं आहे. ऑनलाईन जगात चांगला-वाईट स्पर्श नसतो; पण लैंगिक छळ तरीही आहेच. त्यामुळं लहान वयात मुलांकडं सोशल मीडिया असणं अत्यंत धोकादायक आहे. वाढीच्या वयात मुलांकडं सोशल मीडिया असेल तर, तिथं ज्या गोष्टी ट्रेंडिंग होतात त्या खऱ्या आहेत, असा समज अनेकदा मुलांचा होतो आणि तो घातक असू शकतो. शिवाय, सगळे ‘सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स’ हे सकारात्मक असतातच असं नाही.

सौंदर्याच्या चुकीच्या कल्पना, पुरुषत्वाच्या चुकीच्या धारणा, लैंगिकतेबद्दल चुकीच्या कल्पना तयार होण्याचा धोका अनेकदा असतो. आपण ज्या व्यक्तीला फॉलो करतोय ती योग्य आहे का, योग्य सल्ले देतेय का हे तपासून बघण्याचं ते वय नसतं; त्यामुळं मुलं चटकन् प्रभावित होण्याची शक्यता असते. प्रभाव चांगला आणि वाईट दोन्ही पद्धतींचा असतो हे कधीही विसरता कामा नये.

शिवाय, सोशल मीडियाचं आणि इंटरनेटचं व्यसन लहान वयात लागण्याचा धोका असतोच, तसंच अनेकदा मुलं त्यांचं वय बदलून सोशल मीडियावर जातात; कारण सगळ्यांकडे सोशल मीडिया असतो, तर काही वेळा पालकच मुलांची वयं बदलून त्यांची सोशल मीडिया अकाउंट्स काढतात. या दोन्ही प्रकारांत, इतरांकडं आहे आणि आपल्याकडे नसेल तर आपण मागं पडू...आपल्याला नावं ठेवली जातील, अशी भीती असते.

या भीतीतून पालकांनी आणि मुलांनीही बाहेर आलं पाहिजे; कारण, आपल्या मुलांकडं वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत सोशल मीडिया नसेल तर त्यांच्या आयुष्यात काहीही विशेष फरक पडत नसतो. उलट, जे अनेक धोके सोशल मीडियाबरोबर येतात ते टाळता येतात.

मुलांना लहान वयात फोन आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टींची गरज नसते ही बाब पालकांनी आधी स्वीकारली पाहिजे, तरच मुलंही ती स्वीकारतील. त्याविषयी कुटुंबात संवाद झाला पाहिजे. हा संवाद अधिकारवाणीनं होण्यापेक्षा मैत्रीपूर्ण असला तर मुलंही समजून घेतात. संपूर्ण कुटुंब सजग असेल तर समाजही आपोआप जागरूक बनत जातो हे विसरता कामा नये.

(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com