esakal | कधी उचलणार मुलींसाठी पाऊल....When will a stand for girls
sakal

बोलून बातमी शोधा

rajastan school girl

कधी उचलणार मुलींसाठी पाऊल....

sakal_logo
By
संदीप काळे

आज मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण थोडेफार जरी वाढले असेल तरी, खेड्यामध्ये मात्र आजही मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण नगण्य आहे. मुलींना 'चूल आणि मूल' इतकेच मर्यादित ठेवले जाते. मुलींनी शिक्षण घेतले तरी, तिने नोकरी केली तरी, मुलींना स्वयंपाक करता आला पाहिजे, ही सगळ्यात मोठी इच्छा घरच्यांची आणि नातेवाईकांची असते.

खेड्यामध्ये आजही शाळांची परिस्तिथी चांगली नाही आहे. काही ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शाळा उपलब्ध आहेत. बाकीचे वर्ग शहराच्या ठिकाणी जाऊन शिकावे लागतात. अशी, परिस्थिती असल्यामुळे अनेक मुलींना शहराच्या ठिकाणी जाऊन शिकता येत नाही. मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. गावात उपलब्ध असणार्या् वर्गापर्यंत शिकविले जाते नाहीतर शेवटचा उपाय म्हणून लग्न करून दिल्या जाते. खेड्यातील, लोकांमध्ये आजही शिक्षणा बद्दल जनजागृती करावी लागणार आहे. महाराष्ट्रात अनेक खेडोपाडी आजही मुलींचे शाळा शिकण्याचे प्रमाण फार नगण्य आहे.

आज मी तुम्हाला राजस्थान मधील शाळेची भेट घडविणार आहे. त्या शाळेचे नाव जगामध्ये गाजलेले आहे.

राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल असे या शाळेचे नाव आहे. राजस्थानमध्ये जैसलमेर मधील वाळवंटात मध्यभागी ही शाळा वसलेली आहे. या शाळेचे उद्दिष्ट हे आहे की, मुलींना शिक्षण देणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे. या शाळेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती खास राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील मुलींसाठी तयार केली गेली आहे जिथे मुलींचे साक्षरतेचे प्रमाण फक्त 32% आहे. राजस्थान मध्ये असणाऱ्या या शाळेचे जगभरातून कौतुक केले जाते. या शाळेत शिकत असलेल्या मुलींच्या गणवेषांपासून ते शाळेच्या डिझाईनपर्यंत सर्वकाही या शाळेच्या बाबतीत खास आहे. शाळेचे नावजरी, राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल असले तरी या शाळेला ज्ञान केंद्र म्हणूनही ओळखल्या जाते.

या शाळेचा प्रकल्प CITTA या फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आला होता, ज्या अंतर्गत मुलींना शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर महिलांना सुद्धा रोजगाराचे कौशल्य शिकविले जाते. या शाळेला उभे करण्यासाठी, जैसलमेरच्या राजघराण्यातील चैतन्य राज सिंह आणि राजेश्वरी राज्य लक्ष्मी यांनी हातभार लावला आहे. 400 मुली या शाळेत शिकू शकतात. बालवाडी पासून ते दहावी पर्यंत शिक्षण देण्यासाठी ही शाळा बांधण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील वास्तुविशारद डायना केलॉग यांनी या शाळेची रचना केली आहे. सूर्यग्रह पैलेस हॉटेलचे मालक मानवेंद्र सिंग शेखावत यांनी शाळा बांधण्यासाठी जागा दिली आहे.

राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूलच्या मुली जो गणवेश परिधान करतात, तो गणवेश सुद्धा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. विद्यार्थिंनी परिधान करत असलेल्या या गणवेशाची डिझाईन सुप्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केला आहे. राजस्थान उन्हामुळे गरम होत असलेल्या राज्यांपैकी एक आहे, भिंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करण्यात आली आहे, जेणेकरून सूर्याच्या तापमानाचा काहीही फरक पडणार नाही. शाळेत कॅश काउंटर कुठेही उपलब्ध नाही, शिकवणी फी आणि जेवण सर्व काही येथे विनामूल्य आहे.

इथे मोठा प्रश्न हा उभा होतो की, ही भव्य आणि दिव्य शाळा राजस्थानमध्येच का बांधण्यात आली? राजस्थान भारतातील तिसरे मोठे राज्य आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला साक्षरतेचे प्रमाण फार कमी आहे. महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे, हा मुख्य उद्देश या शाळेचा आहे. राजस्थान मधील 80 टक्के लोक हे, जैसलमेर मधील ग्रामीण भागात राहतात. इथे महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण 32 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मुख्यत्वे मुली घरी राहूनच घरगुती कामे करतात. याव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात, परिणामी फारच कमी मुलींना अभ्यास करण्याची संधी मिळते.

राजस्थान मध्ये स्त्रीभ्रूण हत्या, मोठ्या प्रमाणात होते. या, गुन्ह्यामुळे लिंग प्रमाणातही मोठा फरक दिसून येते. या सर्व कारणांमुळे संपूर्ण समुदाय, विशेषत: स्त्रिया गरिबीत आपले जीवन व्यतीत करतात आणि त्यांचे जीवन सुधारण्याची संधी त्यांना क्वचितच मिळते. त्यामुळे मुलींना शिक्षणाच्या उद्देशाने शाळा बांधण्यासाठी ही जागा निवडली गेली. जगभरातील शैक्षणिक तज्ज्ञ मंडळी या शाळेच्या डिझाइनवर आणि यंत्रणेवर केस स्टडी करत आहेत. चांगल्या हेतूसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आणि हेतू स्पष्ट असेल तर सर्व काही शक्य आहे.

याचेही शाळा एक उत्तम उदाहरण आहे...

आपल्या महाराष्ट्राने सुद्धा असा विचार करायला पाहिजे. मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी नामी योजना करायला हव्यात. कधीतरी वेळेच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आज आहे. नाही का?

loading image