

Teacher Student Relationship In Art
esakal
सुहास किर्लोस्कर - suhass.kirloskar@gmail.com
अध्यापनाला एक शिस्त हवी परंतु उत्स्फूर्त कलेचे सादरीकरण करताना त्या शिस्तीचे ओझे वाटू न देणे, बंधनात स्वातंत्र्य देणे, हे गुरूचे कौशल्य आहे. हुकूमशाहीमध्ये उत्स्फूर्तता लयाला जाते. सगळे आपल्या हुकमाचे ताबेदार आहेत आणि आपल्याला घाबरतात याची नशा गुरूच्या/ शिक्षकाच्या डोक्यात जाते आणि त्याचा हुकूमशहा होतो. गुरू कसा असावा? गुरूविषयी आदरभाव असावा की शिष्यांनी गुरूला नेहमी घाबरून राहावे? कला क्षेत्र हे उत्स्फूर्त वातावरणात बहरते. दहशतीच्या वातावरणात कला कोमेजली जाईल की खुल्या वातावरणात नवनिर्मिती होईल?
पडद्यावर काळाकुट्ट अंधार आहे. त्या अंधारातून ड्रम वादन ऐकू येते. बीटची लय वाढत जाते आणि एकदम ड्रमचे सिम्बल वाजतात. समेवर येताच अंधारातून अनेक खोल्या दिसतात आणि दूरवर एक युवक ड्रम वाजवताना दिसतो. तो युवक द्रुत लयीमध्ये वाजवण्याची प्रॅक्टिस करत असतानाच त्याला समोरच्या अंधारात एक व्यक्ती दिसते आणि तो वादन थांबवून सॉरी म्हणतो. समोर उभी असलेली व्यक्ती म्हणजे फ्लेचर आहे, जो गुरू आहे, म्युझिक कंडक्टर आहे. फ्लेचर त्या युवकाला नाव विचारतो. पहिल्या वर्षात शिकणारा अँड्र्यू गुरूला बघून घाबरतो. ‘‘तुला माहितीय मी कोण आहे?’’, ‘‘येस सर.’’ या प्रसंगी आपल्याला अंधारात पांढरा टी शर्ट घातलेला अँड्र्यू दिसतो आणि त्याच्या भोवती ड्रम सेट दिसतो. ‘‘मी विद्यार्थ्यांची निवड करत असतो, हे जर तुला माहीत आहे, तर तू (मला बघताच) ड्रम वादन का थांबवलेस?’’ घाबरलेला अँड्र्यू ड्रम वाजवतो आणि प्रतिक्रियेसाठी फ्लेचरकडे बघतो. यानंतर फ्लेचर लय दुप्पट करण्यास सांगतो, वेग वाढवण्यास सांगतो. दरवाजा बंद होतो आणि फ्लेचर गेल्याचे दिसते. अँड्र्यू एक उसासा टाकतो. खरे तर गुरूला हा नवा शिष्य सापडला आहे पण एक विद्यार्थी घाबरल्याचे बघताच फ्लेचरला जरा जास्तच आनंद होतो. व्हिपलॅश चित्रपटातील पहिलाच प्रसंग बोलका आहे.