लिंगभाव कशासाठी? मर्दानगी आणि स्त्रीत्व समजायला हवं

gender.jpg
gender.jpg

एका पुरुषाच्या समस्येवर समुपदेशन करताना अॅड. मनीषा गवळी यांनी "मोकळे व्हा'मध्ये नारी समता मंचचा संपर्क दिला. झालं... तेव्हापासून संस्थेतील फोन सातत्यानं खणखणू लागले. संपूर्ण राज्यभरातील समस्याग्रस्त पुरुषांनी आमच्याशी संवाद साधला. किंबहुना, पुढील दोन महिन्यांतील वेळाही बुक झाल्या. मंचअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या 'पुरुष संवाद केंद्रा'च्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत अनेक विषय हाताळले आहेत.

केंद्रात येणाऱ्या पुरुषांशी बोलताना नात्यातील विसंवाद, हे मोठं कारण दिसतं. पती-पत्नीच्या पारंपरिक भूमिकेपलीकडं दोघांतला एक जण जात नाही आणि वादाला तोंड फुटतं. गैरसमज, कायद्याविषयीचं अर्धवट ज्ञान, त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांबाबतची बेपर्वाई अशा अनेक गोष्टींतून वाद टोकाला जातात. 

असंही म्हटलं जातं, की अत्याचार हा अत्याचार असतो. त्यात स्त्री काय आणि पुरुष काय? पीडित व्यक्ती कोणीही असो, तिला न्याय मिळायला हवा, हे निश्‍चित. पण, हुंड्यासाठी छळ, स्त्री गर्भहत्या, खतना, लैंगिक छळ, बलात्कार, ऑनर किलिंग, मानवी तस्करी, अॅसिडहल्ले या घटना घडल्यास त्याला 'लिंगभावा'च्या दृष्टिकोनातून बघावं लागतं.

लिंगभाव म्हणजे Gender. समाजात मुली आणि मुलगे यांना वेगवेगळ्या पद्धतीनं वाढवलं जातं. साध्या खेळण्यांमधूनही हे दिसतं. मुलींना बाहुली, भातुकली; तर मुलग्यांना गाड्या, बंदूक देणं सरसकटपणे केलं जातं. म्हणजे बघा, मोठं होऊन काय करायचं, याचं ट्रेनिंगच बालपणी सुरू होतं. मग, मुलींना अनेकदा ऐकाव्या लागणाऱ्या गोष्टी काय असतात? तर, 'शिक्षण वगैरे ठीक; पण लग्न कधी करणार? तू घरकाम आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकशील ना?', 'हा पदार्थ माझ्या आईसारखा नाही झाला,' 'किती पसारा झालाय, घरच्या बाईनं आवरायला नको?' खरंतर घरकाम-स्वयंपाक हे प्रत्येकालाच यायला हवं. जीवनकौशल्य म्हणून त्याकडं पाहिलं जाणं गरजेचं आहे. पण, पुरुषांचा लिंगभाव वेगळा घडवला जातो, थोडा आक्रमकही. मुलगे काय ऐकत मोठे होतात? तर, 'रडतोस काय पोरीसारखा?', 'पुरुषासारखा पुरुष ना तू? बांगड्या भर', "मर्दको दर्द नाही होता', "रडायचं नाही-रडवायचं' वगैरे वगैरे. सतत असं वागण्याचा ताण पुरुषांनाही असतोच. असा हा स्त्री-पुरुष भेदभाव खोलवर रुजलेला आहे. तो बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. 

आपली समाजव्यवस्था आजही पुरुषप्रधान आहे. उदा.  नावात मधलं नाव वडील किंवा पतीचं. म्हणजे वंश पुरुषाच्या नावे चालतो. लग्न झाल्यावर बाईचं घर बदलतं, बहुतेकदा मालमत्तेची मालकी आणि महत्त्वाचे निर्णय हे पुरुषांच्या हातात असतात. त्यामुळं तुलनेनं महिला असुरक्षित असतात. हीच असुरक्षितता लक्षात घेऊन काही कायदे स्त्रियांच्या संरक्षणासाठी करण्यात आले. या कायद्यांचा सर्रासपणे गैरवापर केला जात असल्याचा कांगावा काही पुरुषांकडून केला जातो. काही वेळा तसं घडतही असेल. मात्र, गैरवापर होतोच, असं सरसकट म्हणणं योग्य नाही. स्त्रिया विरुद्ध पुरुष, असा हा प्रश्न नाही. तसं त्याकडं बघूही नये. मुळात कुणावरही अत्याचार होऊ नये, असा समाज हवा. 

निसर्गानं स्त्रिया आणि पुरुषांना परस्परपूरक बनवलं आहे. पण, आपला समाज त्यांना एकमेकांच्या विरुद्ध उभा करतो. लिंगभावाचे म्हणजे स्त्रीत्व आणि पुरुषत्वाचे साचे बनतात. त्यापेक्षा वेगळं वागणाऱ्यांना विरोध, कुचेष्टा सहन करावी लागते. ही बंद दारं उघडायला हवीत. मर्दानगी आणि स्त्रीत्व म्हणजे काय, याची चिकित्सा आपण करायला हवी. नातेसंबंध, लैंगिकता, वैवाहिक/कौटुंबिक जीवनातले ताण-प्रश्न हे मोकळेपणानं बोलायला वाव मिळाला तर माणसं अधिक सजगपणे, संवेदनशीलतेनं नात्यांकडं पाहू शकतील. समतेवर आधारित असा समाज निर्माण करण्याची आपली जबाबदारी निभावूया. मग नाती अशी असतील, की सगळ्यांना मोकळेपणानं गाता येईल, 
"तुम्हारा साथ मिलने से एहसास-ए-कुव्वत आया है, 
नयी दुनिया बनाने का जुनून फिर हम पे छाया है....' 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com