पत्नी मोबाईलच्या नादात संसाराकडे करतेय दुर्लक्ष

स्मिता जोशी
रविवार, 21 जुलै 2019

समस्यांवर बोलू काही - स्मिता जोशी
- पत्नी मोबाईलच्या नादात संसाराकडे दुर्लक्ष करते

 

पत्नी मोबाईलच्या नादात संसाराकडे दुर्लक्ष करते 

प्रश्‍न : माझ्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. आम्हाला चार वर्षांची मुलगी आहे. एवढी वर्षे होऊनही माझ्या पत्नीला सांसारिक जबाबदाऱ्यांची काहीही जाणीव नाही. तिला मोबाईलचे प्रचंड व्यसन आहे. ती सतत मोबाईलवर असते. रात्री लवकर झोपत नाही. खूप उशिरापर्यंत म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत मोबाईलवर असते. सकाळी उशिरा उठते. त्यामुळे मुलीचे शाळेचे वेळेत आवरणे, मला ऑफिसमध्ये जायला टिफिन देणे या सगळ्या गोष्टी ती वेळेवर करू शकत नाही. तिला अनेक वेळा सांगूनही तिच्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. तिच्याकडून मोबाईल काढून घेणे आम्हाला शक्‍य होत नाही. काय करावे? 

उत्तर : आजच्या तरुण पिढीमध्ये मोबाईलचे व्यसन वाढलेले आहे, अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. मोबाईल ही एक अत्यावश्‍यक गरज झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा मर्यादित स्वरूपात केला तर, त्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, त्याचा अतिरेक झाल्यास शेवटी परिणामांना सामोरे जावे लागते. मोबाईलमध्ये खूप वेळ गेल्यामुळे दैनंदिन कामकाज वेळेवर पूर्ण होत नाही आणि त्यामुळे चिडचिड, नैराश्‍य या सर्व गोष्टींना बळी पडणारी तरुण पिढी आज दिसून येत आहे. लग्न होण्यापूर्वी या सर्व गोष्टी कदाचित चालून जातात. परंतु, लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि त्या वेळेला स्वतःमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे. तुमच्या पत्नीचे मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी तिला जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे गरजेचं आहे. तिचा वेळ त्यामध्ये जातो आहे. त्याचा परिणाम तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. तसेच, कुटुंबावरही होत आहे, याची जाणीव झाली आणि काही फटका बसला तर ती मोबाईलचा वापर मर्यादित करू शकेल. परंतु, ते तुम्हाला तिला समजावून सांगणे शक्‍य होत नसेल तर तिला समुपदेशकांमार्फत समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. समुपदेशन ही एक उपचारपद्धती आहे. समुपदेशक विविध मार्गाने व्यक्तीच्या चुका त्याला समजाव्यात आणि त्याने स्वतःच्या वर्तनात बदल करावा, असे उपचार करतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wife ignore the married life due to mobile