चाळिशीनंतर पूर्वतपासण्या आवश्‍यक!

Women-Health
Women-Health

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
स्त्रियांमध्ये ३५ व्या वर्षाचा टप्पा अनेक कारणांनी खूप महत्त्वाचा असतो. या वयानंतर मुख्यत्वे मासिक पाळीच्या तक्रारी बहुतांशी स्त्रियांना भेडसावत असतात. याच काळात पाळीची नियमितता हरवू शकते. ती कधी योग्य प्रमाणात असते, तर कधी अतिरक्तस्रावाने हैराण करून सोडते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने याची योग्य काळजी घेणे व योग्य पूर्वतपासण्या करणे खूपच गरजेचे असते. वयाच्या ३५ ते ४० वर्षांनंतर मासिक पाळीतील अनियमितता स्वाभाविक असू शकते. परंतु, अनियमिततेबरोबर अतिरक्तस्राव होत असल्यास गर्भपिशवीच्या आतील थरात, म्हणजेच एंडोमेर्तीममध्ये प्रॉब्लेम असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे गर्भपिशवीच्या पूर्वतपासण्या माहिती करून घेणे सर्व महिलांच्या दृष्टीने गरजेचे आहे.

सर्वांत सोपी आणि परिणामकारक तपासणी म्हणजे सोनोग्राफी! गर्भपिशवीचा आकार, आंतर्स्राराची जाडी, स्त्री बीजकोषाचे आकारमान या सर्वांची तपासणी सोनोग्राफीद्वारे समजू शकते व त्यानुसार उपचारपद्धती ठरवता येते. 

वयाच्या चाळिशीनंतर आंतर्स्राराची जाडी (थिकनेस) ७ मिलिमीटरपेक्षा जास्त नसावी आणि ती जास्त असल्यास दुर्बिणीद्वारे हिस्टेरोस्कोपीद्वारे त्या थराची बायोप्सी, अशी पुढील तपासणीकडे वाटचाल करणे योग्य ठरते. कित्येक वेळा स्त्रिया घाबरून जाऊन या तपासणीसाठी आढेवेढे घेतात, असा तज्ज्ञांना अनुभव आहे. परंतु याची तपासणी सोपी असते व निदानासाठी, पुढील उपचारांसाठी मार्गदर्शक असते. या थराचा निष्कर्ष तीन प्रकारांत मोडतो -

१. सिक्रिटरी अथवा प्रॉलिफरेटिव्ह (नॉर्मल) 
२. सिम्पल अथवा अटिपिकल हायपरप्लेझिया 
३. कॅन्सर 
पहिला निष्कर्ष आढळल्यास काहीही काळजी करण्याचे कारण नाही, असे समजावे आणि डॉक्टरी सल्ल्यानुसार प्रत्येक वर्षी सोनोग्राफी जरूर करून घ्यावी. दुसरा निष्कर्ष आढळत्यास तो थोडा गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. कारण अतिवाढ हा त्याचा त्रासदायक भाग असतो आणि त्याची वाढ थोपवणे खूप गरजेचे असते व ती वाढ प्रोजेस्टेरॉन नावाच्या हॉर्मोन्सनी थोपवता येते. या उपचारानेही रक्तस्राव न थांबल्यास वयाच्या पंचेचाळीशीनंतर गर्भपिशवी काढून टाकण्याचा पर्याय विचारात घ्यावा लागतो. पिशवी तशीच ठेवल्यास नियमित तपासणी अनिर्वाय ठरते.

तिसरा निष्कर्ष आढळल्यास गर्भपिशवी ताबडतोब काढण्याशिवाय उपायच उरत नाही. आमच्या स्त्री आरोग्य संघटनांनी स्त्रियांचा चाळीस वयाचा टप्पा हा धोक्याचा आणि पूर्वतपासणीसाठी योग्य असे म्हटले आहे आणि तो उपचारपद्धतीत गाइडन्स म्हणून वापरावा, असे नमूद केले आहे. 

तर मैत्रिणींनो, तारुण्यात ‘पोरी जरा जपून,’ जसे १६ वर्षाला म्हणतो तसेच ‘बाई जरा जपून,’ असे चाळीस वर्षांनंतर म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com