गर्भपिशवी - समज आणि गैरसमज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ
महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती महिलांची गर्भाशये काढली गेली, याविषयीची माहिती प्रशासनामार्फत गोळा करणे सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजूर महिला आजाराला कंटाळून गर्भाशय काढतात, यावर एका वृत्तवाहिनीने सविस्तर बातमी केली होती. तर पाहूयात नक्की ही शस्त्रक्रिया केव्हा आणि कोणासाठी योग्य आहे.

नॅशनल हेल्थ सर्व्हेनुसार गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया (हिस्टरेक्टोमी) ठरावीक परिस्थितीच करावी. म्हणजे पाळीदरम्यान अतिरक्तस्राव, ओटीपोटात सतत दुखणे, ओव्हरी कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, फॅलोपियन ट्यूबचा कॅन्सर अशा परिस्थितीतच गर्भाशय काढणे योग्य ठरते. गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या निरीक्षणावरून असे आढळून आले आहे, की भारतात ग्रामीण महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार अधिक प्रमाणात असून, पांढरे जाणे ही सर्वसाधारण समस्या पाहायला मिळते. केवळ कॅन्सरच्या भीतीपोटी कित्येक महिला पिशवी काढण्याचा चुकीचा निर्णय घेतात. 

मायांगातील पिशवीच्या तोंडाचा व गर्भाशयाचा कॅन्सर, अंडकोश फायब्रॉइड आजार चोरपावलाने येतात. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणे गरजेचे असते. ते खूपच प्रभावीरीत्या करता येते, हे आपण या पूर्वीच्या लेखातून जाणून घेतले आहे. अनेकदा लैंगिक संबंधातील संसर्गामुळेही काही आजार वाढू शकतात. महिलांना घरामध्ये दुय्यम स्थान असल्याने त्या मोकळेपणाने बोलत नाहीत. त्या कोणताही आजार निमूटपणाने सहन करत राहतात. 

मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील अविभाज्य घटक! वयाच्या १३/१४व्या वर्षी सुरू झालेली ही क्रिया गरोदरपणाचा काळ सोडल्यास रजोनिवृत्तीपर्यंत दर महिन्याला अव्याहतपणे चालूच असते. इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या अंत:स्रावाच्या असमतोलतेमुळे कधी कधी गर्भाशयाच्या आतील स्तराची प्रमाणाबाहेर वाढ होऊन हा स्तर पाळीच्या वेळी बाहेर फेकला जातो, तेव्हा अनियमितपणे होणारा अतिरक्तस्राव व पोटात जास्त दुखणे, अशा प्रकारचा त्रास संभवतो. हा काळ स्त्रीला शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूपच क्लेशदायक ठरतो. साधारणतः वयाच्या ३० ते ३५ वर्षांनंतर ही तक्रार आपले उग्र स्वरूप दाखवायला सुरवात करू शकते. परंतु गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे ही एक मोठी शस्त्रक्रिया असते. शारीरिक, आर्थिक व मानसिकदृष्ट्या रुग्ण अधू होतो. शिवाय सर्वसामान्य शस्त्रक्रियेत असणारे व त्यासाठी लागणाऱ्या भूल देण्यातील धोकेही वेगळेच! पिशवीबरोबर अंडाशयही काढून टाकल्यास पेशंटला मेनोपॉजल सिंड्रोम अधिक तीव्रतेने जाणवतो. यात अंगातून गरम वाफा येणे, घाम येणे, चिडचिडेपणा, कातडीचा रुक्षपणा, योनीमार्गाचा कोरडेपणा, हाडे ठिसूळ होणे, हृदयावर परिणाम होणे, मूत्राशयाचे वारंवार इन्फेक्शन होणे इत्यादी प्रकार जाणवतात. आजपर्यंत गर्भपिशवीच्या ऑपरेशनला कोणताही पर्याय नव्हता, परंतु या शस्त्रक्रियेस अत्यंत प्रभावी व निर्धोक असे पर्याय आता उपलब्ध झालेले आहेत.
१) बलून थेरपी 
२) टीसीआरई 
३) मायक्रोवेव्ह ॲब्लेशन 
४) एल. एन. जी. सिस्टीम 
५) नवीन औषधोपचार 
या सर्वप्रकारांतील थेरपीचे फायदे
१) गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यासाठी मोठे ऑपरेशन करावे लागत नाही. 
२) शरीरावर कोणतीही जखम किंवा व्रण नसतो. 
३) भूल व शस्त्रक्रिया छोटी असल्याने तिच्या अनुषंगाने येणारे धोकेदेखील कमी असतात. 
४) महिना दीड महिना विश्रांतीची गरज नाही. दोन-तीन दिवसांमध्ये कामाला सुरवात करता येते. 
५) रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणापूर्वी पोटावर शस्त्रक्रिया असणाऱ्या स्त्रियांना अत्यंत फायदेशीर व कमी धोकादायक.
६) ८५ ते ९० टक्के महिलांची पाळी बंद होते. उरलेल्यांमध्ये पाळी चालू राहिली, तरी रक्तस्रावाचे प्रमाण अल्प असते.
७) गर्भ अंडकोष शरीरात राहिल्याने मेनोपॉजचे सर्व त्रास कमी होतात. 
८) ऑपरेशनच्या वेळी जरुरी असणाऱ्या बाहेरील रक्ताची गरज भासत नाही. 
९) उपचारानंतर तीन-चार दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतात. 
११) रुग्ण त्याच दिवशी घरी जातो.
नवीन अत्याधुनिक उपचारपद्धती म्हटले, की ती महाग व सर्वसामान्यांना परवडणार नाही अशी वाटते, परंतु या सर्व थेरपी याला अपवाद आहे. उपचार, औषध, हॉस्पिटल, भूलतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांचा सर्व खर्च गर्भपिशवी काढून टाकणाऱ्या ऑपरेशनच्या मानाने कमी आहे. गर्भपिशवी काढून टाकण्याच्या ऑपरेशनच्या मानाने खर्च कमी आहे. गर्भपिशवी काढून टाकण्याच्या ऑपरेशनपूर्वी या वेगवेगळ्या थेरपीचा आपण जरूर विचार करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Health Bharati Dhore Patil maitrin supplement sakal pune today