थायरॉइड ग्रंथी आणि त्यांची गुपिते

thyroid
thyroid

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
गळ्यातला ताईत म्हणजे काय? तर अत्यंत लाडक्‍या आणि महत्त्वाच्या व्यक्तीला दिलेली ही उपमा, तसेच उच्च स्थानावर गळ्यामध्ये विराजमान अवघी २० ते २५ ग्रॅम वजनाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. ती आपली गळ्यातील एखाद्या ताईतासमान, म्हणजे अगदी राणीसारखी असते. ती सर्व शरीरावर नियंत्रण ठेवते. आपण दैनंदिन जीवनात आहार घेतो, त्याचे ऊर्जेत किती प्रमाणात रूपांतर होते; तसेच कशी, केव्हा व कोणत्या वेगाने ऊर्जानिर्मिती होईल, हे या ग्रथींद्वारे निर्माण होणारे दोन हार्मोन्स म्हणजेच टी-३ आणि टी-४ यांच्या प्रमाणावरून ठरते. 

हीच ऊर्जा शरीरातील विविध कार्ये घडवून आणते. पचन क्रियेचा समतोल, शरीराच्या तापमानाचा समतोल तसेच मेंदूची कार्यक्षमता आणि त्यांची क्रिया सुरळीत ठेवणे ही महत्त्वाची आणि गुंतागुंतीचे कार्य ही ग्रंथी सुलभपणे करीत असते. अर्थात, तिच्यातील हार्मोन्स पातळी योग्य प्रमाणात स्थिर असते तेव्हाच हे घडते. हार्मोन्सची पातळी काही कारणास्तव वर किंवा खाली झाल्यास याचा त्रास सुरू होणे, यालाच आपण वैद्यकीय भाषेत हायपोथायरॉइड अथवा हायपर थायरॉइड असे म्हणतो. 

थायरॉइड ही ग्रंथी दोन हार्मोन्सची निर्मिती करते, परंतु तिचे सर्वस्वी नियंत्रण मेंदूतून असते. म्हणजेच, त्याची निर्मिती कमी प्रमाणात होते तेव्हा आपल्या मेंदूला त्याचा संकेत पोचतो आणि ताबडतोब थायरॉइड उत्तेजित करणारी हार्मोन्सचे स्राव वाढू लागते. यालाच आपण ‘टीएसएच’ म्हणतो.

थोडक्‍यात काय, तर ‘टीएसएच’ची पातळी जास्त असल्यास टी-३ आणि टी-४ शरीरात कमी आहेत, असे समजावे. म्हणूनच त्याला हायपोथाईरॉइड असे संबोधले जाते. याच्या उलट ‘टीएसएच’ची पातळी कमी असल्यास टी-३ व टी-४ आपल्यामध्ये जास्त आहे, असे समजण्यास काहीच हरकत नाही. म्हणूनच आपण याला हायपर थायरॉइड असे म्हणतो. 

सर्वसाधारणपणे वजन वाढणे, केस गळणे, थकवा येणे, अपचन होणे, त्वचा कोरडी पडणे, नैराश्‍याने ग्रासणे या समस्यांना आपणास सामोरे जावे लागते. त्या वेळी थायरॉइडचा विकार असू शकतो. वरवर पाहता सामान्य वाटणाऱ्या या तक्रारी थाईरॉइडच्या असंतुलनामुळे असू शकतात. 

हायपोथायरॉइडची लक्षणे
    थकवा येणे.
    वारंवार आणि जास्त प्रमाणात मासिक पाळी येणे.
    विसरभोळेपणा.
    वजन वाढणे.
    कोरडी, खरखरीत त्वचा आणि केस.
    घोगरा आवाज.
    थंडी सहन न होणे.
    प्रजनन क्षमता कमी असणे.

थायरॉइडच्या त्रासाचा धोका मुख्यत्वे स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतो. त्याला कारण म्हणजे त्यांच्या शरीरात होणारे हार्मोन्सचे बदल मोठे आहेत. म्हणूनच भारतामध्ये आठपैकी एका स्त्रीला थायरॉइडचा त्रास दिसून येतो. मुख्यत्वे आपल्या वेगवेगळ्या स्वरूपात आणि जीवनातील टप्प्यात याची काळजी घ्यावी लागते. ती कशी घ्यायची याची माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com