भगिनीभावाचं सामर्थ्य

आणि महिलांमध्येही अनेक कारणांनी स्पर्धा असते. वैयक्तिक चढाओढ, मत्सर आणि पाठीमागे केल्या जाणाऱ्या कुचाळक्यांचा सामना करावा लागतो.
womens
womenssakal

आणि महिलांमध्येही अनेक कारणांनी स्पर्धा असते. वैयक्तिक चढाओढ, मत्सर आणि पाठीमागे केल्या जाणाऱ्या कुचाळक्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचशा स्त्रिया वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्रस्त झालेल्या दिसतात. अशा वेळी बंधुभावाप्रमाणेच भगिनीभावही महत्त्वाचा ठरतो.

पुरुषांमध्ये अनेक कारणांनी स्पर्धा असते तशीच स्त्रियांतही जाणवते. स्त्रियांमध्येही तशीच परिस्थिती दिसून येते. विविध व्यवसायांमध्ये वैयक्तिक चढाओढ, मत्सर त्याचबरोबर पाठीमागून करायची कारवाई असे सगळे मार्ग अनेक जण वापरताना दिसतात. काही वेळा प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे गुण असतात. आस्थापनांमध्ये, पक्षांमध्ये आणि त्या कार्यालयांमध्ये प्रत्येकाचे गुण बघून जबाबदारीचे वाटप करण्याचा प्रयत्न वरिष्ठ करत असतात.

काही वेळा मात्र अमक्याला जे काम दिलं ते मला का नाही? असा प्रश्न पडतो आणि त्याचं खरं तर उत्तर नसतं. कामाची जबाबदारी जशी ज्याला योग्य वाटेल, तशी देण्याचा अधिकार वरिष्ठांना असतो; परंतु असे मुद्दे जे वैयक्तिक आयुष्याप्रमाणेच सार्वजनिक जीवनात असतात ते त्यांच्या बऱ्याच वेळा लक्षात येत नाहीत.

घरगुती चौकटीमध्ये काही वेळा घडतं, की मीच का रोज चपात्या करायच्या... तर कोणी म्हणतं, मी भाजी का करायची? मग अखेर मोठमोठ्या घरांत त्या कामांचंही एक वेळापत्रक तयार केलेलं असतं. स्वयंपाक-पाणी असेल, घरकामं असतील तर त्याच्यातसुद्धा त्या दोन-तीन महिलांच्या जबाबदारीचं वाटप करण्याची वेळ येते.

अर्थात ती व्यवस्था काही वाईट असते अशातला भाग आपल्याला म्हणता येणार नाही; परंतु त्यामधून सातत्याने कुरकुर, भुणभुण आणि एकमेकींच्या पाठीमागे काहीतरी वाईट बोलणं हा एक आपल्या समाजातील अस्वस्थ करणारा, त्याचबरोबर व्यक्तीची सकारात्मक शक्ती संपवून टाकणारा आणि भावनाप्रधान व्यक्तींना ज्याचा जास्त त्रास होतो, असा प्रकार आहे.

अशा प्रकारच्या कुचाळक्या, वैयक्तिक स्पर्धा ही जशी अगदी शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये जाणवते तशीच वेगवेगळ्या वसाहतींमध्ये दिसते, अगदी नातेवाईकांमध्येही... काही जणांना अधिक यश मिळतं. त्याला एवढं यश का मिळालं, याच्यापेक्षा त्याकडे आपण खरंच कसं बघायचं हा एक फार मोठा दृष्टिकोनाचा विषय आहे, असं मला वाटतं.

त्याबाबत विचार केल्यावर मात्र आपल्याला दिसून येतं, की जगात जेव्हा यशस्वी पुरुषांच्या सर्वेक्षणांवर अभ्यास झाला तसाच तशा महिलांबद्दलही केला गेला. तिथे असं लक्षात आलं, की जे पुरुष यशस्वी झालेले होते त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं, की त्यांच्यात काहीतरी गुण असतील.

परिश्रमाचं फळ म्हणून ते यशस्वी झाले किंवा ते बुद्धिमान असतील, त्यांनी अभ्यास केला असेल आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकाऱ्यांची मदत जिंकली असेल, असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. त्या उलट जर एखादी स्त्री यशस्वी झाली तर दुर्दैवाने समाज (मग त्यात पुरुष आणि महिला दोघेही आले) म्हणतो, की तिचे काहीतरी चांगले कॉन्टॅक्ट असतील किंवा ती दिसायला सुंदर असेल किंवा तिने स्त्रित्वाचा फायदा करून घेतला असेल किंवा ती वशिल्याची तट्टू आहे... तिच्यात कुठलेही गुण नाहीत, ती दिसायलाही एवढी चांगली नाही. ती दिसायला चांगली असेल आणि वक्तृत्व चांगलं असेल तर त्याबद्दल अजून बोललं जातं, की फक्त बडबड का करतात, त्यातून काय साध्य होतं...

उद्योजजगतात ज्या महिलांना यश मिळतं त्यांच्याबद्दल बोललं जातं, की त्या काहीच काम करत नाहीत. फक्त वर वर मिरवतात. म्हणून त्यांना यश मिळतं, असे अनेक मुद्दे स्त्रियांच्या यशाला झाकोळणारे सर्वेक्षणांमध्ये दिसून आलेले आहेत. त्याला कारण स्त्रीच्या यशाकडेच बघण्याची जी दृष्टी आहे ती एका वर्चस्वी भावनेतून, अहंकारातून आलेली आहे.

त्या दृष्टीच्या मागे स्त्रीचं स्त्रीत्व असूनसुद्धा तिने यश मिळवलं याच्याबद्दल तिला काही वेगळा त्रास झाला असेल, याची दखल अजिबात नसते, त्याबद्दलची संवेदनशीलता नसते. तिचा वैवाहिक किंवा वैयक्तिक दर्जा काय आहे, ज्याच्यावरून सातत्याने तिला दूषणं देणं किंवा तिचा एक अवगुण आहे, अशा पद्धतीने बोलणं हेदेखील आपल्याला घडताना दिसतं.

त्याच्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्रस्त झालेल्या दिसतात. तशीच परिस्थिती आपल्याला काही प्रमाणात पुरुषांचीही दिसून येते. त्यांनासुद्धा संशय, स्पर्धा असह्य होऊन काही वेळेला त्यांनीही आत्महत्या केल्याची उदाहरणं घडलेली आहेत.

काही वेळेला बॉसच्या प्रचंड त्रासाला कंटाळून अनेक जण नोकरी सोडून दुसरीकडे काम करताना आपल्याला दिसतं. काही दिवसांनी त्या ठिकाणी ते सुखाने काम करताना दिसतात. काही उदाहरणांमध्ये स्वतः बॉस झाल्यावर अतिशय चांगल्या प्रकारे वागायचा प्रयत्न करणारे पुरुष आणि महिलाही मी पाहिलेल्या आहेत.

परंतु, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा एका हितसंबंधांच्या भूमिकेतून तयार होतो तेव्हा एकमेकांच्या सहकाऱ्यांनी आणि आपल्या बॉसने किंवा वरिष्ठांनी सांगितलेल्या गोष्टीत काहीतरी पूर्वग्रहाची भिंतसुद्धा आपल्याला उभी राहिलेली दिसते. त्यामुळे स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या कामाबरोबर मी जेव्हा राजकीय व्यासपीठावर जाते तेव्हा हा मुद्दा मला प्रकर्षाने जाणवतो.

एकूणच राजकारण आजच्या घडीला प्रचंड प्रदूषित झालेले दिसत आहे. जो मुद्दा चाललेला आहे तो सोडून वेगळेच आरोप करायचे, त्याला उत्तरादाखल प्रत्यारोप करायचे, याला आपण राजकीय चलाखी मानतो. त्याच्यामुळे लोकांची दिशाभूलही झालेली दिसून येते. अशा वेळी मला स्वतःला काय साध्य करायचे, माझे उद्दिष्ट काय आहे, मला काय हेतूने काम करायचे आहे, हे आधी ठरवणं आवश्यक असतं.

आपण एकदा ठरवतो की आपल्याला सार्वजनिक जीवनात यश मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्थान पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आपण काम करणं फार गरजेचे आहे. हे काम करत असताना स्वतःची उद्दिष्टं ठरवण्याबरोबरच आपल्याला आपली कार्यपद्धतीही निश्चित करणं फार आवश्यक असतं. त्याचबरोबर आपण काय पद्धतीने काम करायचं हेही ठरवणं गरजेचं असतं.

त्यात हळूहळू असा महत्त्वाचा मुद्दा लक्षात यायला लागतो, की आपण लोकांना समजून घेण्याबरोबरच स्वतःचा अभ्यास, कार्यक्षमता, कामाचे तास, आपण सामान्यांना किती मदत करतो आणि कामाच्या नावाने वायफळ गप्पा किती मारतो याचेही गणित प्रत्येकाने करणे खूप आवश्यक असतं. दुसरं असं, की भगिनीभाव, सिस्टरहूड हे शब्द फार महत्त्वाचे आहेत.

ज्यांना काम करायचं आहे किंवा त्याच्यासाठी आत्मशक्ती मिळवायची आहे त्यांनी या गोष्टी स्वतः समजून घेतल्याशिवाय त्यांना यश मिळणं हे कायमस्वरूपी अशक्य असतं हे माझं आतापर्यंतचा निरीक्षण आहे. ज्या स्त्रिया आनंदाने काम करतात तेव्हा त्यांना त्याचं किती समाधान मिळतं? असं समाधान कामापेक्षा कुरघोडीमधून जर का कोणाला मिळत असेल तर तो त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न आहे.

ते तसं का करतात, ते तसं का वागतात याची उत्तरं आपल्याला काही वेळा मिळतच नाहीत; परंतु आपण पाहतो की ते अशा पद्धतीने सातत्याने कुरघोड्या करून यशस्वी होतात. माझं निरीक्षण आहे, की त्यांचं यश अल्पकालीन असतं. अशा यशातून समाधान मिळत नसतं. कुठेही मनात आनंद नसतो. केवळ त्या क्षणी कुणावर तरी कुरघोडी केली याचा आनंद असतो.

त्या खेरीज त्यांना कुठल्याही बाबतीत लोकांना भेटल्यावर आनंद वाटत नाही. लोक त्यांना भेटायला आले की त्यांना वाटतं, की कुठून पिडा आली... टाळलेलं बरं. तर अशा प्रकारचं माणसाचं व्यक्तिमत्त्व जेव्हा तयार होत जातं तेव्हा लोकं चार हात लांबच राहायला लागतात. अशा व्यक्ती मोठ्या पदावर असतील तर मात्र असे लोकं त्यांच्याशी चार गोष्टी चांगल्या वागायला लागतात.

आम्ही समाजात स्त्रियांना सांगतो, की अभ्यास आणि त्याचबरोबर संवाद कौशल्य, कुठे काय बोलायचं याचं तारतम्य, किती वेळ एखादी गोष्ट बोलायची त्याचा गणिताचा हिशेब याचं वेळापत्रक नीट निश्चित करणं आणि आपण तेच तेच बोलतोय का, याचा विचार दररोज करणे या गोष्टी कार्यकर्त्यांना अतिशय आवश्यक आहेत.

आपण जेव्हा भगिनीभाव म्हणतो तेव्हा दुसरीचं दुःख समजून त्या जखमेवरच्या खपल्या काढण्यापेक्षा त्याच्या पलीकडे पोहोचण्यासाठी खरंच मी मनापासून दुसऱ्या स्त्रीला मदत करते का? याचा विचार करणं हे खूप आवश्यक असते. त्याचबरोबर बंधुभाव शब्द जेवढा आहे तेवढा भगिनीभाव समाजात नाही.

म्हणून भगिनीभाव शब्द मोठ्या प्रमाणात मी प्रचलित करण्याचा प्रयत्न केला; पण असा अजिबात कोणी गैरसमज करून घेऊ नये की, याचा अर्थ मला महिलांमधल्या शत्रूभावनेचा कधीच अनुभव आला नाही. मलासुद्धा तो अनुभव आला. काही वेळेला ज्यांना आपण मदत करतो त्यांच्यातच आपल्यासंदर्भात खूप द्वेषभावना तयार झालेली आपल्याला दिसते. काहींना असं वाटायला लागतं, की त्यांच्या मागे कोणीतरी सूत्रधार असतात.

ते तुम्हाला काही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं यश कलंकित करण्याचा प्रयत्न करत असतात; पण या सगळ्या गोष्टीत मी असं मानतं, की प्रतिकूल गोष्टीला अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. शेवटी हे आपलं काम आहे आणि त्याच्यात चार चांगले लोक भेटतात तशी एखाद-दोन काही वेगळ्या स्वभावाची माणसं भेटू शकतात.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं मूळ ध्येय विचलित होऊ न देता आपण काम करणं आवश्यक आहे. इथे मला खरोखर सांगायला हरकत नाही, की महाभारतातील अर्जुनाला जसा पक्ष्याचा फक्त डोळा दिसत होता तसं आपल्याला सामान्यांना मदत करण्यासाठीच आपली क्षमता वाढवत राहणं आपण आपलं ध्येय मानलं पाहिजे.

ते साध्य करण्यासाठी मग प्रसंगी आपण भगिनीभावाचा उपयोग करून हे विरोधाचं, मतभेदाचं, पाठीमागे चालणाऱ्या कुचाळक्या यांचं जे विष आहे त्यालासुद्धा सामोरं जाऊ शकतो. तेवढी आत्मशक्ती आपल्याला भगिनीभावामुळे मिळते. कारण दोन माणसं विरोध करणारी असली तरी ५० जण पाठिंबा देऊन प्रेम देणारे असतात, हे आपण कधी विसरता कामा नये. त्यामुळे सिस्टरहूड इज पॉवरफुल, म्हणजे भगिनीभाव सर्वात प्रभावी आहे, हे मला निश्चितपणाने वाटते.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com