वाचन संस्कृतीचे 'डेस्टिनेशन'

श्रीकांत कात्रे
सोमवार, 23 एप्रिल 2018

पर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या हंगामात विविध साहित्यविषयक उपक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे. या गावात दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याच्या सुटीत साहित्यविषयक विविध उपक्रम आयोजित होतात. साहित्यिकांची प्रकट मुलाखत, साहित्यिक आणि वाचक थेट संवाद, चर्चा, परिसंवाद असे विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. मराठी भाषा विभागाने त्याचा आराखडा केला आहे. नेहमीच स्ट्रॉबेरी शेती आणि पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सेवेसाठी झटणारे हे गाव आता साहित्याची परंपरा जपण्यासाठी पुढे आले आहे.

भिलारला साहित्याचा वारसा लाभलेला नसला, तरी राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख या गावाने निर्माण केली आहे. येथील ३५ ते ४० पर्यटन निवासे ही देश-विदेशांतील पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. हे ‘पुस्तकांचे गाव’ मे २०१७मध्ये अस्तित्वात आले. गावात गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे साहित्य, कला, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची पावले या गावाकडे वळली. राज्यातील विविध शाळांच्या सहलीही या ठिकाणी येऊ लागल्या. भिलारमधील २५ घरांमध्ये साहित्यांची दालने वाचक आणि पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बहुतेक सर्व विषयांना स्पर्श करणारी पुस्तके येथे येणाऱ्याला समृद्ध करीत आहेत. प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारातील पुस्तकांचे वाचनालय सुरू आहे. राज्याबरोबरच परराज्यातील आणि विदेशातीलही पर्यटक व वाचकांना पुस्तकांचे गाव आकर्षित करू लागले आहे. त्यांच्या भेटीही वाढल्या आहेत. भिलारला आल्यावर पुस्तके चाळावीत, स्ट्रॉबेरीची चव चाखावी आणि मस्तपैकी पेटपूजा करून सायंकाळी येथीलच कृषी पर्यटन निवासात विश्रांती घ्यायची, असा नित्यनियमच आहे. 

एक वर्षाच्या कालावधीत पुस्तकांचे गाव एक आगळे वेगळे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येऊ पाहत आहे. यामुळे येथील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, हीच या संकल्पनेची सकारात्मकता म्हणावी लागेल. येथे येणारे वाचक दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाचा पर्यटनाला पूरक असा उपक्रम भिलारवासीयांनी शेतीच्या कामातूनही यशस्वी करून दाखवला आहे. भविष्यात हे गाव वाचन संस्कृतीचे ‘डेस्टिनेशन’ ठरेल यात शंका नाही.

अभ्यासक्रमातही समावेश
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ‘कवितेचं गाणं होताना’ (सलिल कुलकर्णी), वाचनप्रेरणा दिनाच्या निमित्ताने दोस्ती पुस्तकांची, स्मरण विंदांचे कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी पुस्तकांच्या गावाला खिळवून ठेवले आहे. यंदाच्या दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात गावाची ओळख करून देण्यात आली असून, मुखपृष्ठावर लोगो छापण्यात आला आहे. कल्याणमध्ये गणपती मंडळाने पुस्तकांच्या गावाचा देखावा सादर करून भिलारची माहिती गणेशभक्तांनाही करून दिली आहे. 

पुस्तकांचे गाव भिलारकर ग्रामस्थांमुळे यशस्वितेच्या उंबरठ्यावर आहे. शासनाच्या सर्व उपक्रमांना राज्यातील साहित्यिकांबरोबरच ग्रामस्थांनी दिलेली साथ लाखमोलाची आहे.
- विनय मावळंकर 

पुस्तकांच्या गावामुळे भिलारचे नाव दूरवर पोचले आहे. भिलारला वाढणारे पर्यटन उद्योगांसाठी फायदेशीर ठरते आहे. शासनाने आता भिलारच्या विकासासाठी सकारात्मकता दाखवावी.
- बाळासाहेब भिलारे

Web Title: World Book Day shrikant atre article