World Cup 2019 : लेखनाच्या मैदानात क्रिकेटपटू... (केदार ओक)

kedar oak
kedar oak

क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा त्यांनी स्वतःच लिहिलेली पुस्तकं...चरित्रं म्हणा किंवा आत्मचरित्रं म्हणा. अशाच काही नामवंत क्रिकेटपटूंवरच्या पुस्तकांचा हा धावता परिचय क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्तानं...

आपल्या भारतात सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे राजकारण आणि क्रिकेट. सध्या दोन्ही क्षेत्रांसाठी मोठा अवघड आणि तितकाच मनोरंजक काळ सुरू आहे. हा लेख प्रकाशित होईपर्यंत "लोकशाहीचा सोहळा' म्हणून मिरवल्या जाणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल लागून महाचर्चेला सुरवातही झालेली असेल. राजकारणाच्या या धडाडणाऱ्या तोफा थंड होण्याआधीच क्रिकेट वर्ल्ड कपचा बिगूल वाजणार आहे. घोडामैदान फार लांब राहिलेलं नाही. मैदानावर आपले खेळाडू त्यांची कामं करतीलच; पण आपणही आपलं काम करायला हवंच. कारण, "क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' असं विनोदानं म्हटलं जातं. पाच वर्षांनी होणारी निवडणूक आणि चार वर्षांनी होणारा वर्ल्ड कप...
त्यामुळे चर्चा तर अटळ आहे!
* * *
क्रिकेटमध्ये बोला-लिहायला, वाद घालायला भरपूर सामग्री उपलब्ध आहे. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या वर्ल्ड कपच्या निमित्तानं आज आपण एका वेगळ्याच गोष्टीवर नजर टाकणार आहोत. क्रिकेटविषयी आत्तापर्यंत बरेच खेळाडू, समालोचक, पत्रकार आणि समीक्षक यांनी लेखन केलेलं आहे. अगदी डॉन ब्रॅडमनपासून माईक ब्रिअर्ली, सुनील गावसकरांपर्यंत आणि नेव्हिल कार्डसपासून शिरीष कणेकरांपर्यंत. सगळ्यांच्या लेखनाचा आढावा घेणं शक्‍य नाही; मात्र आपण गेल्या काही वर्षांत क्रिकेटसंदर्भात आलेल्या पुस्तकांवर एक नजर टाकू या.
* * *
व्हीव्हीएस लक्ष्मण - 281 and beyond
लक्ष्मणचं हे अगदी ताजं आत्मचरित्र आहे. लक्ष्मण म्हणजे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातला भारतीय फलंदाजीचा कणा. शांत आणि सज्जन अशी प्रतिमा असणारा हा खेळाडू. इतकी वर्षं आपल्याला त्याची फक्त फलंदाजी बघायची सवय होती; पण तो मीडियामध्ये सक्रिय झाल्यापासून त्याच्या बडबड्या स्वभावालाही आपण आता सरावलो आहोत. तो कॅमेरासमोर जसा भरभरून बोलतो तशीच पुस्तकातही लक्ष्मणनं त्याची मतं खुलेपणाने मांडली आहेत. वर्ल्ड कपला डावललं जाण्याचं दुःख असो वा सलामीला न खेळण्याचा निर्णय असो किंवा ग्रेग चॅपल कोच असतानाचा अवघड काळ...लक्ष्मणनं हे सगळं खुलेपणानं सांगितलं आहे. लहानपणापासून ते नंतर पुढच्या काळात एक यशस्वी खेळाडू होण्यापर्यंतचा लक्ष्मणचा चांगला-वाईट प्रवास नक्कीच वाचनीय आहे.
* * *
युवराज सिंग ः भारताच्या वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा हा हीरो. सन 2011 चा वर्ल्ड कप खेळायचा आणि जिंकायचाच या ध्येयानं झपाटून गेलेल्या युवराजनं खोकला, दम, निद्रानाश आणि उलट्या अशा विचित्र कठीण परिस्थितीत संपूर्ण वर्ल्ड कप खेळून काढला. त्याच्या अप्रतिम कामगिरीच्या पडद्यामागं एक दुखणं विंगेत दडपलं जात होतं; पण शेवटी कॅन्सर बनून ते युवराजच्या समोर आलंच.
लहानपण, वैयक्तिक नातेसंबंध, क्रिकेट, कॅन्सरचं निदान, आजाराकडं केलेलं दुर्लक्ष, चुकीचे उपचार, रोगाचं गांभीर्य समजल्यानंतर अमेरिकेत जाऊन घेतलेले उपचार, उपचारांदरम्यान येणारं खचलेपण, त्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया, आईशी घट्ट जुळलेली नाळ, मित्रमंडळींची साथ या सगळ्या विषयांवर युवराजनं त्याच्या पुस्तकात अगदी सुरेख आणि साध्या भाषेत लिहिलं आहे. त्याचा लढवय्या प्रवास कुणालाही प्रेरणा देऊन जाईल असाच शब्दबद्ध झालाय.
* * *
सचिन तेंडुलकर ः जवळपास 20 वर्षांपूर्वी पुण्यातल्या एस. पी. कॉलेजच्या हॉस्टेलला राहत असतानाची गोष्ट. कॉलेजच्या परिसरात एक
पुस्तकप्रदर्शन कायम भरलेलं असायचं. तिथं मला सचिनच्या भावाचं, अजित तेंडुलकरचं "असा घडला सचिन' नावाचं मराठी अनुवादित पुस्तक मिळालं. त्या काळातल्या पैशांच्या मानानं बऱ्यापैकी महाग असलेलं ते पुस्तक मी क्षमता नसतानाही केवळ आणि केवळ सचिनच्या प्रेमापोटी विकत घेतलं होतं. ते पुस्तक खरोखरच खूप भारी होतं. त्यानंतर काही वर्षांपूर्वी सचिनचं "प्लेईंग इट माय वे' नावाचं आत्मचरित्र आलं. या पुस्तकात भरपूर घटना आहेत आणि त्या खूप विस्तारानं लिहिल्यानं पुस्तक खूप मोठं झालंय. सचिनची मैदानावरची मुशाफिरी सर्वांनाच माहीत आहे; त्यामुळे ती सोडून बाकीची काही नवीन माहिती वाचायला मिळेल या अपेक्षेत असलेल्या आणि सचिनची कारकीर्द "याचि देही, याचि डोळा' बघत मोठ्या झालेल्या "हार्ड कोअर' फॅन्सची मात्र या पुस्तकामुळं थोडीशी निराशाच होण्याची शक्‍यता आहे. अर्थात बाकीच्यांसाठी मात्र सचिनची जडणघडण वाचणं हा एक खूप आनंददायी अनुभव ठरू शकतो. सचिननं प्रत्येक वेळी दुखापतींवर केलेली मात, त्याची इच्छाशक्ती, खेळावरचं अतोनात प्रेम आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा या गोष्टी पुस्तक वाचताना सातत्यानं जाणवतात.
* * *
सौरव गांगुली ः सौरवचंही 'A century is not enough' नावाचंपुस्तक आलं आहे. सौरवचं हे पुस्तक बरचसं त्याच्या स्वभावाला साजेसं झालं आहे. लेखनाची शैली चांगली आहे आणि काही घटना लिहिताना त्यानं हातचंही राखलेलं नाही; पण वाचताना बऱ्याचदा तो स्वतःची पाठराखण करतोय, वकिली किंवा बचाव करतोय अशी भावना होते. आयपीएलसारख्या विषयावर त्यानं भरपूर लिहिलं आहे; पण सन 2003 च्या वर्ल्ड कपच्या महत्त्वाच्या घटनेकडं मात्र त्याच्याकडून फारच दुर्लक्ष झालेलं आहे. सौरवचं प्रत्येक अडथळ्यावर मात करून पुढं येणं हे प्रकर्षानं जाणवतं आणि हाच पुस्तकाचा गाभा आहे. बाकी, पुस्तकातलं लेखनही नावाला शोभेल असंच आहे. बरंच काही आहे; तरीही कुठंतरी अपूर्णतेची भावना आहे.
* * *
संजय मांजरेकर ः आत्तापर्यंत आपण जी पुस्तकं बघितली ती खेळाडूंनी "घोस्ट रायटर'च्या मदतीनं लिहिलेली पुस्तकं आहेत; पण संजय मांजरेकर गेली अनेक वर्षं नियमित समालोचक आहे, स्तंभलेखक आहे; त्यामुळे त्याचं पुस्तक स्वतःचं आहे. मांजरेकरच्या पुस्तकाचं नाव आहे Imperfect. हे पुस्तक म्हणजे खूप पारदर्शकतेनं, प्रांजळपणे आणि स्वतःच्याच कारकीर्दीचा "बर्ड आय व्ह्यू'नं घेतलेला आढावा आहे. क्रिकेट हे पहिलं प्रेम नसणं, तंत्रशुद्ध खेळण्याचा वृथा अट्टहास, वडिलांशी फार जवळीक नसलेलं नातं, मुंबई क्रिकेट, सन 1990 मधलं भारतीय क्रिकेट याविषयी त्यानं अगदी खुलेपणानं लिहिलं आहे. मांजरेकर हे नेहमी काहीतरी वेगळे विचार असणारं, सोशल मीडियावर ते विचार व्यक्त केल्यानं भरपूर ट्रोलिंगला सामोरं जायला लागणारं व्यक्तिमत्त्व आहे; पण पुस्तक मात्र नक्कीच दाद मिळवून जातं.
* * *
ख्रिस गेल ः तो बिनधास्त बोलतो, वागतो, खातो, पितो आणि खेळतोही. त्याचं लेखनही तसंच आहे. तो स्वतःलाच "युनिव्हर्स बॉस' म्हणवून घेतो. त्याला माहीत आहे की तो भारी आहे आणि हे सगळं जगाला खुलेपणानं सांगायलाही तो कचरत नाही. त्याला न्यूनगंड शिवलेलाही नाही. तो दिलखुलास आहे, विक्षिप्त आहे आणि हे सगळं तो पुस्तकात मान्य करतो. त्याच्या टोलेबाजीसारखंच त्याचं "सिक्‍स मशिन' नावाचं आत्मचरित्रही एकदम तोडीस तोड आहे.
* * *
एबीडी व्हिलियर्स ः एबीडी दक्षिण आफ्रिकेचा असला तरी त्याचे चाहते मात्र जगभर आहेत. जवळपास "अजातशत्रू' या प्रकारात मोडणारा हा असामान्य फलंदाज त्याच्या पुस्तकातून आपल्याला वेळोवेळी त्याच्या साधेपणाची आणि नम्रतेची साक्ष देतो. एबीडीनं त्याच्या लहानपणीचा काळ खूप छान लिहिला आहे. त्याच्या भविष्यातल्या पराक्रमांची बीजं आपल्याला एबीडीच्या बालपणात आढळतात. क्रिकेटप्रेमींना माहीत असेल की एबीडीच्या अनेक अचाट गोष्टींची (हॉकी, रग्बी, सायन्स प्रोजेक्‍ट) यादी सोशल मीडियावर अधूनमधून फिरत असते; मात्र खुद्द एबीडीनं त्यातल्या बहुतांश गोष्टी खोट्या असल्याचं सांगितलं आहे. शेवटी शेवटी वर्ल्ड कप जिंकता न आल्याचं प्रकरण वाचून आपल्यालाही वाईट वाटतं. कारणं काहीही असोत; पण गेल्या वर्षी अचानक निवृत्ती घेतल्यानं यंदा त्या स्वप्नाच्या पाठीमागं तो धावणार नाहीये. त्याच्याच शब्दात सांगायचं तर ः "काही स्वप्नं अपूर्णच राहतात'.
* * *

-मधल्या काळात पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरचंही वाद-विवादांनी भरलेलं आत्मचरित्र आलं होतं. इंग्लंडच्या केव्हिन पिटरसननंही असाच धुरळा उडवून दिला. बरेचसे ऑस्ट्रेलियन खेळाडूही सनसनाटी निर्माण होईल अशी पुस्तकं लिहून गेले आहेत. अगदी नुकतंच शाहिद आफ्रिदीचंही, वादाला खतपाणी घालणारं पुस्तक आलं आहे. इतकी वर्षं सर्वांना अंदाज होता, त्यानुसार त्यानं वयचोरीची कबुली दिली आहे. इंग्लंडच्या दौऱ्यात गाजलेल्या "स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरणावरही त्यानं प्रकाश टाकला आहे.

क्रिकेटमध्ये आत्मचरित्र असतं, खेळाडूंच्या संपर्कात आलेल्यांकडून लिहिलं गेलेलं व्यक्तीचित्रण असतं आणि केवळ बाह्य निरीक्षणावर केलं गेलेलं लेखनही असतं. प्रत्येक साहित्यप्रकाराच्या आपापल्या चांगल्या-वाईट बाजू आहेत. आत्मचरित्रातले स्वतःचे अनुभव, कारकीर्दीतल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरची मानसिक स्थिती या गोष्टी दुसऱ्या प्रकारात मिळणार नाहीत, तसंच आत्मचरित्र हे नावाप्रमाणे आत्मकेंद्रित होण्याचा धोकाही असतो. इतर प्रकारांतून मात्र त्याच घटनांकडं तटस्थपणे पाहिलं जाऊन वाचकांना एक वेगळा अँगल मिळण्याची शक्‍यता असते.

...तर मित्रांनो, वाचण्यासारखं पुष्कळ उपलब्ध आहेच आणि आता पुढला दीड महिना वर्ल्ड कपही जोमात असेल. स्पर्धा जशी पुढं सरकेल तशा चर्चाही रंगायला लागतील. आपण आपापल्या पद्धतीनं आनंद घेऊ या. शेवटी, टीम इंडियाला वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो. भेटू या पुन्हा कधीतरी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com