'अवतारा'चा चित्राविष्कार (नितीन दीक्षित)

'अवतारा'चा चित्राविष्कार (नितीन दीक्षित)

एखाद्या कथेचं बीज अनेक वर्षं तुमच्या मेंदूच्या अवकाशात तरंगत असतं, मग अचानक त्याला कधीतरी जमीन सापडते, ते मातीत रुजतं. हे सगळं नेणिवेच्या पातळीवर गुपचूप होत असतं, जेव्हा त्याचा अंकुर मातीतून डोकं वर काढतो, तेव्हा ते तुमच्या जाणिवेत प्रवेश करतं. 'अवताराची गोष्ट' या चित्रपटाची कथा ही नऊ वर्षांचा लहान मुलगा असणारा मी आणि विशीतला मी या दोघांमधला संवाद होता... 

एखाद्या कथेचं बीज अनेक वर्षं तुमच्या मेंदूच्या अवकाशात तरंगत असतं, मग अचानक त्याला कधीतरी जमीन सापडते, ते मातीत रुजतं. हे सगळं नेणिवेच्या पातळीवर गुपचूप होत असतं, जेव्हा त्याचा अंकुर मातीतून डोकं वर काढतो, तेव्हा ते तुमच्या जाणिवेत प्रवेश करतं. 'अवताराची गोष्ट' या चित्रपटाची कथा ही नऊ वर्षांचा लहान मुलगा असणारा मी आणि विशीतला मी या दोघांमधला संवाद होता. माझी ही दोन्ही रुपं सतत माझ्यासोबत असूनही या कथेला अंकुर फुटायला मात्र काही वर्षं जावी लागली. 

माझा साताऱ्यातला मित्र, अमित देशमुखचा मला एके दिवशी फोन आला : ''सर, तुमच्याकडे एखादी चांगली कन्सेप्ट असेल, तर सांगा. आमच्याकडे निर्माता आहे.'' गोष्ट आवडली, तर लगेच सिनेमा सुरू करायचाय. असे अनेक फोन येतात, भेटीही होतात; पण बरेचदा त्याचं पुढं काही होत नाही, हा आत्तापर्यंतचा अनुभव. मात्र, अमितच्या आवाजात खात्री होती, विश्‍वास होता...आणि माझ्याकडे गोष्ट होती! पुण्यात भेटायचं ठरलं. अमितसोबत अमित खेडेकर, सोमनाथ वैष्णव आणि सुशांत गुणाले अशी चौकडी मला भेटली. यातल्या अमित खेडेकरचे मामा सचिन साळुंके निर्माते होते आणि हे चौघं जण असणार होते कार्यकारी निर्माते. खरं तर या चौघांचा हा खटाटोप चालला होता तो त्यांना अभिनय करायला मिळावा यासाठी; पण माझ्या गोष्टीत त्यांच्यासाठी भूमिका नव्हत्या. मात्र, तरीही त्या सगळयांनाच गोष्ट आवडली. चित्रपट मीच दिग्दर्शित करणार हे माझं ठरलं होतं; पण मी याआधी कोणत्याच सिनेमाला साधा सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं नव्हतं, त्यामुळे निर्माते जरा साशंक होते. मात्र, माझ्याकडे पंधरा वर्षांचा रंगभूमीचा अनुभव, अनेक डॉक्‍युमेंटरीज आणि कॉर्पोरेट फिल्म्सचं दिग्दर्शन यामुळे कलाकारांकडून हवं ते काढून घेण्याचा आणि कॅमेऱ्याच्या भाषेचा चांगला अनुभव गाठीशी होता, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्‍वास होता. 

पहिल्यांदाच मी लेखकही होतो आणि दिग्दर्शकही. याचा एक फायदा असा झाला, की दिग्दर्शकीय सूचना, पार्श्‍वसंगीत, किंवा कला दिग्दर्शनातल्या सूचना लिहाव्या लागल्या नाहीत. लेखनाचे कष्ट थोडे कमी झाले. कथा तयार होतीच, पटकथा-संवादाचं काम सुरू झालं. नऊ वर्षांचा कौस्तुभ आजीच्या गोष्टी ऐकत लहानाचा मोठा झालाय, यातल्या दशावतराच्या गोष्टी त्याच्या विशेष आवडीच्या. त्याला हे माहिती आहे, की कलियुगात कली अवतार घेणार आहे; पण तो कोण असणार, हे कोणालाच माहिती नाही. साधा अंधारात एकटा जायला घाबरणारा कौस्तुभ स्वत:ला कली अवतार समजू लागतो. रामाला जसा हनुमान, तसा कौस्तुभला मंग्या भक्त म्हणून लाभतो. मग काही किरकोळ योगायोगांना हे दोघं चमत्कार समजतात आणि 'देवाचा अवतार' स्टार्ट होतो. मात्र, पुढं एका घटनेत 'देव' जखमी होतो आणि त्याला आपण अवतार नसल्याचं लक्षात येतं. या घटनेनंतर कौस्तुभ नैराश्‍यात जातो, विचित्र वागायला लागतो. त्याचे आई, वडील, आजी, बहीण यांना त्याच्या या तऱ्हेवाईक वागण्याचं कारण कळत नाही. त्यांच्या घरात भाड्यानं राहणाऱ्या, इंजिनिअरिंग शिकणाऱ्या अमोदजवळ कौस्तुभ त्याची सगळी गुपितं सांगत असतो. त्याला कौस्तुभच्या मनात उठलेल्या वादळाचं नेमकं कारण कळतं. स्वत: नास्तिक असलेला अमोद कौस्तुभच्या अवताराच्या संकल्पनेला एका वेगळ्या रूपात मांडतो, त्याच्यात आत्मविश्‍वास निर्माण करतो, आणि त्याला हळुवारपणे नैराश्‍यातून बाहेर काढतो. 

संहितेचं काम सुरू असताना कास्टिंगचं कामही सुरू होतं. कौस्तुभ आणि मंग्याच्या भूमिकेसाठी जवळजवळ दोनशे मुलांची ऑडिशन घेतली; पण मनासारखं कास्टिंग होत नव्हतं. शेवटी डोंबिवलीतल्या संकेत ओकच्या वेध ऍकॅडमीतल्या मिहिरेश जोशीची या भूमिकेसाठी निवड केली. सांगलीतल्या माझ्या मामेभावाच्या मुलाला- यश कुलकर्णीला मी लहानपणापासून पाहत होतो. त्याचा अभिनयाशी दुरूनही संबंध नव्हता; पण मला तो मंग्याच्या भूमिकेसाठी योग्य वाटला. कौस्तुभचे वडील सुनील अभ्यंकर, आई लीना भागवत, बहीण रश्‍मी अनपट, तर आजी सुलभा देशपांडे अशी टीम तयार झाली. पाहुणा कलाकार म्हणून आशिष विद्यार्थीही काम करायला तयार झाले. अमोदच्या भूमिकेसाठी बरेच पर्याय माझ्या मनात होते, त्यात आदिनाथ कोठारे मात्र नव्हता. त्याला ही भूमिका द्यावी ही निर्मात्यांची इच्छा होती. मी काहीशा अनिच्छेनंच आदिनाथला भेटलो, त्याला गोष्ट आणि त्याची भूमिका ऐकवली, त्याला ती खूपच आवडली. मग मी त्याच्यासमोर स्क्रिप्ट ठेवलं आणि त्यानं ऑडिशन दिली. त्या पहिल्याच भेटीत मला माझा अमोदही मिळाला आणि एक चांगला मित्रही. 

वाईजवळच्या बावधन या गावात मला जसं हवं होतं, तसं कौस्तुभचं घर अमित खेडेकर आणि अमित देशमुखनं शोधून काढलं. त्यात हवे तसे बदल कला दिग्दर्शक प्रशांत बिडकरनं करून दिले. चित्रीकरणाआधी दिग्दर्शकाचं लेखकाशी जे नातं असतं, तेच नातं चित्रीकरणावेळी छायालेखकाशी असतं. नागराज दिवाकर या चित्रपटाचा छायालेखक होता. दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिलाच चित्रपट होता, त्यामुळे प्रत्येक शॉटच्या वेळी नागराज ''सर, ये शॉट नही लगेगा'' असं म्हणत माझी परीक्षा घेत होता. मी प्रत्येक वेळी माझ्या शॉटवर ठाम असायचो. पहिल्या दोन दिवसांनंतर त्यानं आणि इतर क लाकारांनीही परीक्षा घेणं थांबवलं आणि चित्रीकरणाला वेग आला. 

सगळं चित्रीकरण सलग करायचं असाच आमचा बेत होता; पण तेराव्या दिवशी ज्या घरात आम्ही चित्रीकरण करत होतो, त्या घराला लागून असणाऱ्या एका घरातल्या आजींचं देहावसान झालं आणि आम्हाला चित्रीकरण थांबवावं लागलं. याचा एक फायदा असा झाला, की जे चित्रीकरण झालं होतं, ते मला पाहता आलं, आणि मयूर हरदास या आमच्या संकलकासोबत, झालेल्या दृश्‍यांचं संकलनही करता आलं. तरीही रिशूट करावं असं फारसं काही निघालं नाही. 

पुन्हा सगळ्या कलाकारांच्या तारखा जुळवून महिन्याभरानंतर चित्रीकरण सुरू झालं. ठरलेल्या वेळेत ते संपलं. दोन लहान मुलं चित्रपटात असल्यामुळे मला डबिंगचा धोका पत्करायचा नव्हता, म्हणून सगळा चित्रपट आम्ही सिंक साऊंड केला होता. हे काम राशी बुट्टेनं केलं. मंगेश धाकडेचं पार्श्‍वसंगीत, सुनील सुकथनकर यांच्या शब्दांना गंधार संगोरामचं संगीत असं सगळं एकत्र आलं आणि 'अवताराची गोष्ट' तयार झाला. 

दिग्दर्शक म्हणून, या पहिल्याच चित्रपटानं चित्रपट व्यवसायाची 'अथ'पासून 'इती:'पर्यंत सगळ्याच अंगांशी माझी ओळख करून दिली. लेखन-दिग्दर्शन या माझ्या हातातल्या गोष्टी होत्या, आणि मला मिळालेल्या मर्यादित बजेटमध्ये त्या मी निभावल्या. चित्रपट तयार झाल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी जे उपद्व्‌याप करावे लागतात, तेही मला, निर्माता नवीन असल्यामुळं करावे लागले. इथं कला वगैरे सगळं संपतं आणि फक्त व्यावसायिक गणितं उरतात. यात थोडी जरी चूक झाली, तरी ती कशी महागात पडू शकते हे लक्षात आलं. 'अवताराची गोष्ट'चं प्रमोशन आणि डिस्ट्रिब्युशन माझ्या मनासारखं झालं नाही; पण 'झी गौरव' आणि महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेत हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला, यासोबतच एकूण चौदा पुरस्कार 'अवताराची गोष्ट'ला मिळाले, हेच काय ते समाधान! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com