भावनिक गुंतवणुकीचा चलच्चित्रपट : ’ऑल ईज वेल’

All is well book
All is well booksakal media

डॉ. सुरेश सावंत,

‘मथुरेश’, शाहूनगर, नांदेड-431602,

संदीप रामराव काळे हे सर्वोदय, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छात्रभारती, नई तालीम, सेवाग्राम, आनंदवन, सोमनाथची श्रमसंस्कार छावणी इ. रचनात्मक चळवळी आणि आंदोलनांतून घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. दै. ’सकाळ’च्या ’सप्तरंग’ पुरवणीतील ’भ्रमंती लाईव्ह’ ह्या सदरामुळे हे नाव आता सर्वदूर सुपरिचित झाले आहे. आपल्या सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी अनेक संस्था आणि चळवळींना आर्थिक आधार मिळवून दिला आहे. ’क्रांतीची पावले’, ’सख्ख्या बहिणी, पक्क्या मैत्रिणी’, ’गंध आपुलकीचा’, ’माणुसकी’, ’अश्रूंची फुले’ इ. 58 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. संदीप काळे यांच्यातील लेखनऊर्जा कौतुकास्पद आहे. त्यांनी संपादित केलेल्या ’मु.पो. आई’ ह्या पुस्तकाच्या आजवर 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी अनुवादित केलेल्या ’ट्वेल्थ फेल’ ह्या पुस्तकाच्या 10 आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 2021 च्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्काराने संदीप काळे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

’ऑल ईज वेल’ हे संदीप काळे यांचे आत्मकथन सकाळ प्रकाशनाने एकाच वेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तीन भाषांतून प्रकाशित केले आहे. मराठी आत्मकथनाची अकरावी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. एखादे मराठी आत्मकथन एकाच वेळी 3 भाषांमधून प्रकाशित होण्याची आणि केवळ चार महिन्यांत 11 आवृत्ती प्रकाशित होण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी. सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणारे संदीप काळे हे वाचकप्रिय लेखक ठरले आहेत. मनोजकुमार शर्मा यांच्या ’ट्वेल्थ फेल’ ह्या आत्मकथनाचा अनुवाद करताना आपणास आत्मकथन लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे लेखक संदीप काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे.

लेखकाने 15 प्रकरणांमधून ह्या आत्मकथनाची मांडणी केली आहे. बालपणी शेतातून घरी येताना आईसह नदीचा पूर ओलांडतानाच्या चित्तथरारक प्रसंगाने ह्या आत्मकथनाची सुरुवात होते. नांदेड जिल्ह्यातील पाटनूर हे संदीप काळे यांचे जन्मगाव. राबत्या शेतकरी कुटुंबाची आणि शेतीमातीची पार्श्वभूमी. संदीपची आई मुक्ताबाई उर्फ कमलबाई म्हणजे दिवसरात्र शेतीमातीत राबणारी, लेकरांना ’चांगला माणूस’ म्हणून घडविणारी क्षमेची प्रतिमा भूमिकन्या सीताच जणू! नायकाच्या अल्पशिक्षित आईत सुसंस्कृत आणि कणखर स्त्रीत्वाचे दर्शन घडते. उलट वडील रामरावजी काळे म्हणजे जमदग्नीचा अवतार. बालपणी नायकाला गावातल्या शाळेत जाण्याची घाई झाली होती. आईच्या मागे लागून, हट्ट करून नायकाने शाळेत प्रवेश मिळविला. संदीपची अल्पशिक्षित आई म्हणजे जणू श्यामची आईच! संस्कारांचं स्वायत्त विद्यापीठ!

पाटनूर हे डोंगरात वसलेले कठीण गाव असल्यामुळे गावात पाणीटंचाई. शाळेत शिकणारा संदीप उर्फ बाळू गावच्या सार्वजनिक विहिरीतून शेंदून पाणी भरण्याचे काम करतो. उन्हाळ्यात विहिरीचा तळ उघडा पडलेला. तळाशी कासवाची पिलं पाण्याअभावी तडफडत असलेली. त्या पिलांची तगमग बघून संदीप मोठ्या कष्टाने पाण्याने भरलेली घागर पुन्हा त्या विहिरीत रिकामी करतो. दररोज आपला जेवणाचा डबा पाथरडच्या झोपडीतील निराधार म्हातारीला देऊन स्वतः उपाशी राहतो. असे नायकाच्या संवेदनशीलतेचे अनेक प्रसंग ह्या आत्मकथनात वाचायला मिळतात.

लेखकाने आपल्या गावातली उत्सवप्रियता, कर्मकांड आणि देवभोळेपणाचे चित्रण फारच बारकाईने केले आहे. एकीकडे मंदिरांची भरभराट होते आहे आणि दुसरीकडे गावची शाळा पूर्णतः दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, याचे चित्रण मोठे मर्मभेदक आणि अस्वस्थ करणारे आहे. गावातील सनातनी संस्कारांबद्दल लेखक फार संतापाने, पण तितक्याच संयमाने भाष्य करतो. गावातील विषमता आणि शाळेतील समतेचे संस्कार यामुळे बालमन द्विधा होते. पारंपरिक गावगाड्याचे चित्रण लेखकाने फारच कौशल्याने केले आहे.

अपरंपार हे पाटनूरचं ग्रामदैवत. पाटनूरच्या जंगलाला निझामाविरुद्धच्या संघर्षाची सोनेरी पार्श्वभूमी आहे. बालपणी नायक आजोबासोबत ह्या जंगलात गेला असता त्यांची वाघाशी गाठ पडते. त्या रोमहर्षक प्रसंगाचे वर्णन मोठे प्रत्ययकारी आहे. लेखकाने आपला बालपणीचा सगळा आवचिंदपणा (अवखळपणा) प्रांजळपणे कथन केला आहे. लेखक बालपणी गाय चारण्यासाठी ह्या जंगलात शाहू नावाच्या मागासवर्गीय गुराख्यासह जात असे. शाहूच्या सोबतीनं नायक जंगल वाचायला शिकतो. चौथीत असताना लेखकाने जंगलातील जिवंत अनुभवांवर दीर्घ असा निबंध लिहिला होता. तो निबंध शिक्षकांनी पुनर्लेखन करून शाळेच्या नोटीसबोर्डावर डकवला होता. ते कौतुक पाहण्यासाठी अनेक गावकर्‍यांसह आईवडीलही शाळेत आले होते. लेखकाच्या सर्जनशीलतेची बीजे अशी त्याच्या बालपणात, शालेय जीवनात सापडतात. हिंगोली जिल्ह्यातील सांडस हे नायकाचे आजोळ. लेखकाने आजोळातील रम्य, आठवणींना उत्तम उजाळा दिला आहे.

नायकाचे सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाटनूर गावापासून 7 कि.मी. अंतरावरील चेनापूरच्या आश्रमशाळेत झाले. उन्हापावसात, उपाशीपोटी आणि अनवाणी पायपीट करत नायकाने हे शिक्षण पूर्ण केले. लेखकाने वर्णन केलेला दहावीच्या परीक्षा केंद्रावरील नकलांचा सुळसुळाट शिक्षणव्यवस्थेवरील विश्वास उडायला कारणीभूत आहे. केंद्रावर नेमलेले पोलीसच कसे नकलांना प्रोत्साहन देतात, याचे मोठे संतापजनक वर्णन लेखकाने केले आहे. नायकाला इंग्रजी विषयात नापास होण्याची भीती होती, पण 36 गुण मिळवून नायकाने त्यातून आपली सुटका करून घेतली.

पाचवीला भाटेगावच्या शाळेत असताना केलेल्या उनाडक्या, पाटनूरच्या प्राथमिक शाळेचा लळा-जिव्हाळा, आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची वैशिष्ट्ये, उमलत्या वयातील मुलामुलींची भाबडी प्रेमप्रकरणे आणि त्यांची परिणती, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची दुरवस्था, नायकाला शेतात काम करताना झालेला सर्पदंश, पांडाळ करणार्‍या पांडाळ्याचे (मांत्रिक) अघोरी उपचार, अंधश्रद्धा, खेड्यातील लग्नसमारंभ, त्यातील गमतीजमती, नोकरीअभावी तरुणवर्गात आलेले वैफल्य आणि व्यसनाधीनता, नायकाने शेतीत कष्टाची कामे करत घेतलेले शिक्षण, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि गटबाजीचं राजकारण, दारूचे वाहणारे पाट यामुळे खंगलेल्या खेड्यांचे विदारक चित्रण लेखकाने केले आहे.

ह्या तपशीलवार वर्णनांमुळे हे एका व्यक्तीचे आत्मकथन न वाटता हे संपूर्ण गावगाड्याचेच आत्मकथन वाटते. लेखकाने गावशिवारातील हातभट्टीचे अतिशय ओंगळवाणे वर्णन केले आहे. लेखकाने गावगाड्यातील राजकीय आणि सामाजिक विघटनाचे बारकावे फारच छान टिपले आहेत. चोरून विड्या-सिगारेटी ओढण्याचा प्रसंगही लेखकाने प्रांजळपणे कथन केला आहे. पोटात शिरून राहण्याच्या आपल्या स्वभावामुळे लेखकाने अनेक माणसे जोडली. प्रचंड गोतावळा निर्माण केला. प्रत्येक प्रतिकूलतेला अनुकूलतेत रूपांतरित करत खडतर वाटचाल करण्याच्या स्वभावामुळे नायकाच्या जीवनाला दिशा मिळत गेली.

नकला करण्याचे मुक्त स्वातंत्र्य असल्यामुळे नायकाने नांदेड जिल्ह्यातील स्टेशन उमरीला अकरावीत प्रवेश घेतला. तिथे प्रवेश घेणार्‍या बहुसंख्य विद्यार्थ्यांची मानसिकता हीच होती. अकरावीचे वर्गच होत नसल्यामुळे वर्षभर नांदेडात राहून इंग्रजीचे ट्यूशन लावण्याचा निर्णय घेतला. एका बांधकामावर देखरेख ठेवण्याच्या कामामुळे शहरात राहण्याचा आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटला. घरमालकाचे पडलेले काम करत एक वर्ष काढले. बारावीसाठी पुन्हा उमरीला. उमरीच्या वास्तव्यात नायकाला फुकट सिनेमा पाहायचा नाद लागला. उमरीचा बाजार, सोबतचे व्यापारी मित्र, मोघाळी, ढोलउमरी, रावधानोरा येथील मित्र व नातेवाईकांकडे घेतलेला पाहुणचार, उमरीतील मित्रांची अर्धवेडी प्रेमप्रकरणे आणि त्यांची अपरिहार्य परिणती, नायकाने मंदिरात बसून केलेला अभ्यास याचे लेखकाने फार छान वर्णन केले आहे.

बारावीच्या परीक्षेत एकमेकांचे पाहून लिहिता यावे, यासाठी नायकाने एका मित्रासह रात्रीतून परीक्षेची सगळी बैठकव्यवस्थाच बदलून टाकली. त्याचे वर्णन एखाद्या भयपटात शोभण्यासारखे उत्कंठावर्धक उतरले आहे. बारावी पास झाल्यावर श्यामकांत कुलकर्णी आणि राजेश पाठक यांच्या मदतीने प्रतिभा निकेतन कॉलेजमध्ये बी.ए. ला प्रवेश घेतला. दररोज गावावरून 20 ते 25 कि.मी.चा त्रासदायक प्रवास करत शिक्षण घेतले. विविध उपक्रमांत सहभाग घेतला. जिवाला जीव देणार्‍या मित्रमैत्रिणी जोडल्या. इंग्रजीचे भूत याही काळात नायकाच्या मानगुटीवर बसलेले होतेच. प्रा. राजाराम वट्टमवार सरांमुळे राष्ट्रसेवादल आणि इतर चळवळींशी नायकाचा परिचय झाला. मुंबईत जाऊन वर्ल्ड सोशल फोरमच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे दृष्टी विकसित झाली.

कॉलेजात नायकाने मा.म. देशमुखांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला प्राचार्या स. दि. महाजन यांनी खोडा घातला. संदीपने सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीत भाग घेतला आणि इथूनच त्याच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने वळण लागले. तेथे आलेल्या माधवी फुके नावाच्या मुलीसोबत प्रेमाच्या आणाभाका झाल्या. पण ते प्रेम त्या शिबिरापुरतेच राहिले. माधवीने काही गोपनीय मनोगत लिहून दिलेली डायरी जयंतीने हरवून टाकली आणि नायकाच्या मुग्ध प्रेमकहाणीला पूर्णविरामच मिळाला. त्या डायरीत काय होते हे अजूनही गुपीच आहे, असे नायक म्हणतो. माधवीवरचे प्रेम अजून कायम असे असे लेखकाने प्रांजळपणे नमूद केले आहे. आताही असे बिनधास्तपणे मत मांडायला धाडस लागते.

त्या छावणीवरून नांदेडला परत आल्यावर वट्टमवारसरांनी लेखकांना म्हणजे संदीप यांना दोन पुस्तके वाचायला दिली. पहिले ’प्रेमातून सावरताना’ आणि दुसरे गांधीजींचे ’माझे सत्याचे प्रयोग’. ह्या पुस्तकांनी संदीपच्या सैरभैर मनाला स्थैर्य मिळाले. वडिलांच्या नोकरीमुळे नायकाचा परिवार भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर स्थलांतरित झाला. कारखान्यातील कामगारांच्या जीवनाची अशाश्वतता, कामगारांमधील व्यसनाधीनता, सार्वजनिक दुर्गा उत्सव, नायकाची उत्सव समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड, पारदर्शी निधीसंकलन, शिल्लक निधीतून गरीब विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप इ. बाबींवर लेखकाने फार छान प्रकाश टाकला आहे.

मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने ईबीसीची सवलत बंद करण्याचा घाट घातला होता. त्या विरोधात छात्रभारतीने मंत्रालयात उग्र आंदोलन केले. त्या आंदोलनातील नायकाचा सहभाग, शिक्षणमंत्र्यांना घेराव, तोडफोड, पोलिसांचा लाठीमार, आंदोलकांना अटक, नायकाची इतर आंदोलकांसह पोलीस कोठडीत रवानगी आणि सुटका, शासनाची माघार आणि आंदोलकांचा विजय ह्या सर्व घटना घडामोडींचे लेखकाने चित्रदर्शी वर्णन केले आहे. डाव्या चळवळीतील सहभागामुळे लेखकाला अनेक ज्येष्ठ गांधीवादी आणि समाजवादी नेत्यांचा सहवास लाभला. त्यांच्या विचारांमुळे आणि समाजसमर्पित कार्यामुळे नायकाच्या जीवनातही एकप्रकारचे डोळसपणे आणि झपाटलेपण आले.

नायकाला आनंदवनात बाबा आमटे यांचा सहवास लाभला. बाबांच्या निधनानंतर बाबांना ज्या खड्ड्यात दफन करण्यात आले, त्या खड्ड्यात नायकाने बाबांचे पार्थिव ठेवले. तो क्षण लेखकाने फारच हृदयस्पर्शी चितारला आहे. आपणही बाबा आमटे, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, अण्णा हजारे यांच्यासारखा पूर्णवेळ कार्यकर्ता बनून सामाजिक कार्य करावे, असे नायकाला वाटायचे. पूर्णवेळ कार्यकर्ता की करिअर असे द्वंद्व नायकाच्या मनात बराच काळ चालले. सेवाग्राममध्ये भेटलेले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मगनलाल यांनी पूर्णवेळ कार्यकर्त्याची शोकात्मिका वर्णन करून स्वतःचेच उदाहरण दिले. ते ऐकून नायकाने पूर्णवेळ कार्यकर्ता बनण्याचे स्वप्न तिथेच विसर्जित केले आणि त्यांची पावले करिअरच्या दिशेने पडू लागली.

कॉलेजमध्ये शिकत असताना प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे नायकाच्या मनात पत्रकार बनण्याचे स्वप्न अंकुरित झाले होते. त्या स्वप्नाच्या दिशेने आता नायकाची वाटचाल सुरू झाली. पत्रकारितेच्या शिक्षणासाठी धाकटी बहीण शारदाकडून 50 रुपये घेऊन नायकाने एका गोधडीसह गाव सोडले. काहीही ओळखपाळख नसताना औरंगाबाद गाठले. विद्यापीठात जाऊन मोठ्या मुश्कीलीने वृत्तपत्र विद्याविभागात प्रवेश मिळविला. कमवा व शिका योजनेत काम करत पत्रकारितेची पदवी मिळविली. इथेही अनेक मित्रमैत्रिणी जोडल्या. सुरेश पुरी सरांसारख्या शिक्षकांचे प्रेम संपादन केले. शिकत असतानाच ’लोकाश्रय’ साप्ताहिकात कार्यकारी संपादक म्हणून नोकरी केली. गरिबीमुळे बिस्किटाच्या एका पुड्यावर दिवस काढले. दोन मित्रांत एक वडापाव खाऊन गुजराण केली. त्या काळात सुरेश पुरी सरांचे घर हे नायकाचे हक्काचे घर बनले होते. लेखकाने सभोवतालच्या जगण्यातील ताणेबाणे छान टिपले आहेत.

पदवीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच ’सांजवार्ता’ सायंदैनिकात फ.मुं. शिंदे यांच्या शिफारशीने नोकरी मिळविली. पत्रकारिता हा एक वसा आहे हा संस्कार विद्याभाऊ सदावर्ते यांनी दिला. तो संस्कार नायकाने एखाद्या अलंकारासारखा सांभाळला आहे. त्या सायंदैनिकाचे नियुक्तिपत्र म्हणजे आयुष्यातील करिअरच्या वाटचालीची चावी होती, असे लखेकाने म्हटले आहे. जिथे नायकाचा पत्रकारितेत प्रवेश होतो, तिथे ’ऑल इज वेल’ ह्या आत्मकथनाचा पहिला भाग संपतो. ह्या आत्मकथनात नायकाच्या जीवनातील दुःखरंगांच्या विविध छटाही इंद्रधनुष्यासारख्या करूण-लोभस झाल्या आहेत.

’ऑल इज वेल’ ह्या आत्मकथनातून वाचकांच्या मनात ध्येयवेड्या नायकाचे भावनाशील व्यक्तिचित्र तर उभे राहतेच, शिवाय संस्कारांचे विद्यापीठ असलेली कष्टाळू आई, कडव्या शिस्तीचे आणि शीघ्रकोपी वडील, प्रेमळ बहीणभाऊ शारदा आणि परमेश्वर, दोन्ही आजोबा (आईचे वडील आणि वडलांचे वडील), पाटनूरच्या शाळेतील गंड्रस, देशमुख, धुतराज, गुंडजवार हे प्रेमळ शिक्षक, जंगल वाचायला शिकविणारा गुराखी शाहू, नायकावर लेकरासारखं प्रेम करणारे जमादार तुकाराम बिर्‍हाडे आणि त्यांच्या दोन बायका, शेंबोलीच्या शाळेचे मुख्याध्यापक भोसले गुरुजी, नायकासाठी जास्तीचा डबा आणणारा मित्र संभाजी पुयड, ट्रक ड्रायवर नायडू वस्ताद, चेनापूरच्या आश्रमशाळेतील बेराडे, पांचाळ, केंद्रे, निमगावकर, बेंडके, मुंडे, गायकवाड, जाधव, होनशेट्टे इ. शिक्षक, परीक्षेच्या काळात सिनेमाला घेऊन जाणारे भागवतमामा, सर्पविष उतरवणारा पांडाळ्या, गंधार मिनके, द्वारका सुवर्णकार.

राजू, रफीक हे उमरीच्या शाळेतील वर्गमित्र, बालाजी मंदिरातील दयाळू पुजारी, परीक्षेची बैठकव्यवस्था बदलण्यात नायकाला मदत करणारा मित्र संजय धर्माधिकारी, कॉलेज प्रवेशासाठी मदत करणारे श्यामकांत कुलकर्णी आणि पाठक, नायकाचे पालकत्व स्वीकारणारे वट्टमवार सर आणि वट्टमवार काकू, सोमनाथच्या शिबिरात भेटलेली मैत्रीण माधवी फुके, सारस्वत बँकेचे संस्थापक एकनाथ ठाकूर, माधवकाका आणि गणूकाका, पाथरडच्या झोपडीतील निराधार म्हातारी, विनातिकीट नायकाला पकडून समज देणारा रेल्वेचा तिकीट चेकर श्रीकांत, पत्रकारितेचे शिक्षण घेताना लाभलेले शिक्षक सुरेश पुरी, पत्रकारितेतील मार्गदर्शक विद्याभाऊ सदावर्ते ही सगळीच पात्रे कमीअधिक रेखीव आणि ठसठशीत झाली आहेत. व्यक्तिस्वभावाचे विविध नमुने इथे पाहायला मिळतात. नायकाला बाबा आमटे, अण्णा हजारे, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, कवी फ.मुं. शिंदे यांचा सहवास लाभला. त्यांच्या सहवासातील क्षण नायकाचे जीवन उजळून टाकणारे आणि जीवनाला दिशा देणारे ठरले.

’ऑल इज वेल’ ह्या आत्मकथनाची भाषा अतिशय सरळ, साधी, सोपी आणि अनलंकृत आहे. लेखक आपले लेखन चमकदार करण्यासाठी मुद्दाम कुठेही आलंकारिक भाषेचा आश्रय घेत नाही. हे पुस्तक म्हणजे कार्यकर्त्या, चळवळीतील पत्रकाराच्या जडणघडणीचे स्वकथन आहे. ह्या लेखनात कमालीचा प्रांजळपणा आहे. यात कुठेही आवेश नाही किंवा अभिनिवेष नाही. मुद्दाम प्रतिमानिर्मितीचा प्रयास नाही. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, कुणीही मार्गदर्शक नसताना नायकाने स्वतःला पत्रकारितेत आणि साहित्यात सिद्ध केले आहे. म्हणून ग्रामीण तरुणांसाठी हे आत्मकथन अतिशय प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वाटतो. प्रांजळपणा किंवा प्रामाणिकपणा हा ह्या लेखनाचा ठळक विशेष आहे. लेखकाने तटस्थपणे आणि त्रयस्थपणे नायकाची जडणघडण न्याहाळली आहे आणि ती नेमकेपणाने शब्दबद्ध केली आहे. या आत्मकथनात आत्मगौरव, आत्मप्रौढी आणि आत्मस्तुतीला अजिबात थारा नाही. दोरखंडाने मारणार्‍या बापाला आणि कार्यक्रमात खोडा घालणार्‍या प्राचार्यांना लेखक खलनायकाच्या रुपात रंगवत नाहीत. उलट त्यांनाही समजून घेतो. नायकाचा एकूणच सूर अतिशय समंजसपणाचा आहे. इतरांना समजून घेण्याची नायकाची (लेखकाची) ही दृष्टी खरोखरच कौतुकास्पद आहे.

’ऑल इज वेल’ हे ह्या पुस्तकाचे शीर्षक अतिशय समर्पक असून लेखकाच्या सकारात्मक जीवनदृष्टीचे ते प्रतीक आहे. ’मनातला सक्सेस पासवर्ड’ ही या पुस्तकाची टॅगलाईनही अर्थपूर्ण आणि चित्ताकर्षक आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून मा. शरद पवार, अण्णा हजारे, प्रकाश आमटे, सिंधूताई सपकाळ, फ.मुं. शिंदे, श्रीराम पवार, महेंद्र कल्याणकर, मनोजकुमार शर्मा इ. मान्यवरांनी ह्या आत्मकथनाची पाठराखण केली आहे. आकर्षक मुखपृष्ठ डॉ नरेंद्र बोरलेपवार यांनी साकारले असून सकाळ प्रकाशनाने पुस्तकाची उत्कृष्ट निर्मिती केली आहे.

’ऑल ईज वेल’ हे काय आहे? एका एकलव्याच्या जीवननिष्ठेचा चढतावाढता आलेख आहे. नायकाचे गडद अंधाराकडून उजेडाकडे केलेली पायपीट आहे. एका ध्येयवेडाने अभावग्रस्ततेवर केलेली मात आहे. आईने कोरलेल्या संस्कारांचं सुंदर शिल्प आहे. आजोळच्या समृद्ध आठवणींची पोथी आहे. आदिवासी आश्रमशाळेने घडविलेल्या बिगर आदिवासी मुलाच्या ससेहोलपटीची अंतिमतः यशोगाथा आहे. प्रत्येक प्रकारच्या प्रतिकूलतेविरूद्ध नायकाने दिलेल्या झटझोंबीची प्रेरणादायी हकीकत आहे. धडपडणार्‍या विद्यार्थ्यांवर जिवापाड प्रेम करणार्‍या आचार्यकुळातील शिक्षकांची गौरवगाथा आहे.

सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीचे दर्शन आहे. एका सर्जनशील आणि संवेदनशील पत्रकाराच्या जडणघडणीची ही दिलखुलास गोष्ट आहे. सदैव सकारात्मकतेचा संदेश देणारी जीवनगाथा आहे. हे पुस्तक म्हणजे भारतातल्या प्रत्येक खेड्याचं आत्मकथन आहे. आमच्या शिक्षणव्यवस्थेचं पोस्टमार्टेम आहे. खेड्यातल्या प्रत्येक युवकाचं हे प्रातिनिधिक आत्मकथन आहे. दुफळीने भंगलेल्या आणि वैफल्यग्रस्ततेने खंगलेल्या खेड्याचे शोकात्म चित्रण आहे. ’ऑल ईज वेल’ म्हणजे भावनिक गुंतवणुकीचा चलच्चित्रपट आहे. खेडवळ नायकाच्या डाव्या विचारसरणीतील जडणघडणीचा आकर्षक आलेख आहे. समाजोपयोगी आणि रचनात्मक पत्रकारितेचे नीतिशास्त्र आहे. ’ऑल इज वेल’ ही एका सर्जनशील आणि संवेदनशील पत्रकाराच्या जडणघडणीची एक सरळ साधी सोपी आणि ऊर्जेस्वल गोष्ट आहे.

ऑल इज वेल (आत्मकथन)

लेखक ः संदीप रामराव काळे

पृष्ठे ः 270, किंमत ः 240 रु.

डॉ. सुरेश सावंत,

‘मथुरेश’, शाहूनगर, नांदेड-431602,

भ्र. 9422170689, 8806388535

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com