
परिवर्तन आणि नव्या संधी...
साकेत भांड
बाबांच्या निष्ठापूर्वक कार्यानं एव्हाना व्यवसाय स्थिरावला होता. प्रकाशन वाट सोपी नव्हती; पण त्याला एक ‘बैठक’ मिळाली होती. ही बैठक होती सकस, आशयगर्भ साहित्याची आणि दिग्गज लेखकांच्या साहित्यकृतींची. ‘साकेत’च्या वाटचालीत अनेक नामवंत साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतींद्वारे संस्थेला भक्कम पाठबळ दिलं.
त्यामुळे प्रकाशन अल्पावधीतच नावारूपाला आलं. ४७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या साकेत प्रकाशनाच्या वाटचालीत रा. रं. बोराडे, ना. धों. महानोर, भालचंद्र नेमाडे, भा. ल. भोळे, रंगनाथ तिवारी, राजन गवस यांच्या साहित्यकृतींची साथ मिळाली.
भास्कर चंदनशिव, चंद्रकांत पाटील, निशिकांत ठकार, श्याम मनोहर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ब्रह्मानंद देशपांडे अशा अनेक लेखकांचे योगदान मोलाचे ठरले. पारंपरिक ललित साहित्य प्रकारांनी साकेत समृद्ध होत होतं. एका तपापूर्वीचा हा काळ.
प्रकाशनात आम्ही पाऊल ठेवलं तोपर्यंत वाचकांची नवी पिढीही उदयाला आली होती. तिची आवड-निवड आणि गरज वेगळी होती, हे जाणवायला लागलं. हीच जाणीव आम्हाला वेगळं काही करण्यासाठी उद्युक्त करून गेली आणि नव्या दिशा, नवं क्षितिज शोधण्याची धडपड सुरू झाली. व्यवसायात सातत्यानं प्रयोग करणं आणि त्यातून नवनिर्माण करणं, हे झालं तरच अस्तित्व टिकेल आणि ठळक होईल ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली होती.
दरम्यान, ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’तर्फे आयोजित पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी लक्षात आलं की, प्रकाशनविश्व जेवढं अफाट आहे तेवढंच ते सखोलदेखील आहे. मोती काढायचे तर तळाशी जावं लागेल. इथून प्रवास सुरू झाला. देश-विदेशातील बुक फेअर्सना हजेरी लावत गेलो,
प्रकाशन क्षेत्रातील वेगवेगळी प्रशिक्षणं घेतली तसतसे या व्यवसायाचे अनेक पैलू उलगडत गेले. दरम्यान, महाराष्ट्रातील पुस्तक प्रदर्शनांमध्ये सहभागी होताना ‘साकेत’च्या दालनात येणारे वाचक आणि त्यांची मागणी लक्षात येत होती. वाचकांना कथा, कादंबरी, ललित यांसोबत आणखी बरंच काही हवं होतं. मग ती पूर्तता करण्याचा प्रयत्न सुरू झाला.
वाचकांच्या आवडीचे साहित्य देण्यासोबतच जगभरातील उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणायचं असाही निश्चय केला. यासाठी जगभरातील नोबेल पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या कलाकृती मराठीत आणायच्या होत्या; पण त्या कशा? मग यासाठी रात्री जागून शोधमोहीम सुरू केली. त्या लेखकांचे संपर्क-दुवे शोधणं,
मेल पाठवणं, त्यांच्याशी बोलणं, असं करत एक-एक लेखकाचं साहित्य मिळवत गेलो. आज साकेत प्रकाशनाच्या यादीत नोबेल विजेत्या साहित्यिकांच्या पुस्तकांची एक शृंखलाच तयार झाली आहे. ‘माय नेम इज रेड’, ‘स्नो’, ‘बायिंग अ फिशिंग रॉड फॉर माय ग्रँडफादर,’ ‘ब्लाइंडनेस’, ‘जंगलबुक’, ‘गरिबीमुक्त विश्वाची निर्मिती’ ही पुस्तकं आम्ही मराठीत प्रकाशित केली. अर्थातच याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
आम्ही प्रथितयश साहित्यिकांच्या साहित्यकृती प्रकाशित तर केल्याच; पण त्याचबरोबर इतर अनेक प्रयोग आम्ही करत होतो. मराठी माणसाच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारे पु. ल. देशपांडे, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी आणि आधुनिक वाल्मीकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर यांची साकेत
प्रकाशित पुस्तकं वाचकांच्या बुकशेल्फमध्ये हमखास दिसू लागली. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लक्ष्मण गायकवाड, विज्ञानलेखक निरंजन घाटे, सुप्रसिद्ध लघुकथाकार चारुता सागर यांचीही अनेक पुस्तकं साकेत प्रकाशनानं प्रकाशित केली. नारायण धारप यांच्या गूढकथांनी कित्येक वाचकांच्या मनावर गारुड केलं. धारपांची तब्बल ५० पुस्तकं नव्यानं प्रकाशित केली.
आता नवनवीन, विविधांगी पुस्तकांनी साकेतचे ग्रंथदालन समृद्ध होत होते. २२ वाङ्मय प्रकारांतील वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळताना दमछाक होत होती. मात्र दर्जेदार पुस्तकं काढण्यासोबतच सक्षम वितरण यंत्रणा असणं हे प्रकाशकासाठी अत्यावश्यकच असतं. कारण कितीही चांगली साहित्यकृती निर्माण केली तरी ती वाचकांपर्यंत सहज उपलब्ध झाली तर त्या पुस्तकाला न्याय मिळतो आणि प्रकाशकाला यश.
आजवर मराठवाड्यातील प्रमुख प्रकाशन संस्था म्हणून ओळख होती. आता विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात साकेत प्रकाशनाची स्वतंत्र शाखा असणं गरजेचं होतं; पण मी काहीशा द्विधा मन:स्थितीत होतो; पण वितरण यंत्रणा सक्षम करणं हे आमचं प्राधान्य होतं. त्या वेळी ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या कै. सुनील मेहता यांनी हिंमत दिली, ‘अरे तू कर सुरू. पुढचे सगळे होईल!’ या त्यांच्या शब्दांनी बळ मिळालं.
‘अक्षरधारा’च्या रमेश राठीवडेकर यांनीही साकेत प्रकाशनाला कायम सहकार्य केलं आणि खंबीर पाठिंबा दिला. आणि १० वर्षांपूर्वी पुण्यात सुरू केलेल्या या शाखेमुळे कामाला चांगलीच गती मिळाली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई येथील वितरकांपर्यंत पुस्तके वेगाने आणि सहज उपलब्ध होऊ लागली. याबरोबरच येथील नामवंत लेखक, संपादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थेशी जोडले जाऊ लागले.
वितरण यंत्रणा सक्षम करताना संपूर्ण महाराष्ट्रभर जाळं विणलं तसं वितरणातील एका रूढीला दिलेला छेद हेदेखील आमच्यासाठी धारिष्ट्य होतं. पूर्वी सर्वसाधारणपणे प्रकाशक वितरकाला-विक्रेत्याला आधी पुस्तकं पाठवत आणि नंतर काही काळाने पैसे मिळत. यामध्ये वेळ, पैसा खर्च होणं आणि मनस्ताप पदरी येणं हे चालूच होतं.
मग आम्ही वेळेवर आणि चोखपणे आर्थिक व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना आणि वितरकांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. आमचा आमच्या पुस्तकांवर, वाचकांवर विश्वास होता. आणि या निर्णयानं साकेतच्या अर्थकारणाला आकार आला. मोठ्या प्रमाणात अडकणारा पैसा वेळेवर येऊ लागला. यातून नवनवीन पुस्तकांचे प्रकल्प हाताळणं सोयीचं होऊ लागलं आणि वितरणाला विविधांगी प्रसिद्धीची भक्कम जोड देणं शक्य झालं.
सगळं सुरळीत सुरू होतं, ठिकठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनांमध्ये पुस्तक खपाचा आलेख चढता होता, प्रकाशन व्यवसायात गती आली होती. मात्र अचानक नोटबंदी जाहीर झाली आणि या व्यवसायाला मोठा धक्का बसला.
प्रदर्शनांमधून होणाऱ्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला, प्रदर्शनं हा रोखीचा व्यवहार एकदम कमी झाला. हळू हळू दुकानांमधूनही पुस्तकांची मागणी कमी होऊ लागली, पुस्तक प्रदर्शनं भरविणं तर अगदीच कमी झालं. इतकं की विक्री थेट ३०-३५ टक्क्यांपर्यंत खाली आली. एक अगतिकता निर्माण झाली. यातून पुढे एक नवी वाट दिसली, पूर्णत: नवीन. पुढे कोणतं वळण आहे ठाऊक नव्हतं, यश किती येणार माहिती नव्हतं.
इथे सुरू झाले ऑनलाइन विक्रीच्या जगाशी स्वत:ला जोडून घेण्याचे अधिकाधिक प्रयत्न. अडचणीमध्ये नवीन संधी दडलेली असते असं जे म्हणतात त्याची प्रचिती आली. नोटबंदीनं प्रकाशन व्यवसायाला जसा गतिरोधक टाकला तसा नवा मार्गही दाखवला. या वाटेवर चालण्याआधी संशोधन, या व्यवहाराचे फायदे-जोखीम आणि यासाठी उपलब्ध ऑनलाइन विक्रीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म यांचा अभ्यास सुरू झाला. अविरत प्रयत्न आणि चिकाटीने आम्हाला ऑनलाइन विक्री व्यवसायाची नस सापडली होती. याच वाटेचा पुढे हमरस्ता झाला.
समृद्ध साहित्य वारसा आई व वडिलांनी आमच्या पुढच्या पिढीकडं सोपवला होता. ही जबाबदारी घेताना ते पाठीशी होतेच; पण एक फार मोठी जबाबदारी पेलण्यासाठी आपल्यालाही तेवढं सक्षम होण्याची आता गरज आहे, ही जाणीव होत होती.
बाबांनी आमच्या हाती सूत्रं देताना सांगितलं होतं, ‘प्रकाशन हा व्यवसाय असला तरी मुख्यत: हे सामाजिक बांधिलकीचं कार्य आहे. प्रकाशनाकडे निखळ व्यवसाय म्हणून बघू नका. प्रकाशनामार्फत आपण उत्तमोत्तम साहित्य समाजाला देत असतो आणि यातून समाजप्रबोधनाचं कार्य घडत असतं.
त्यामुळे प्रत्येक पुस्तक प्रकाशित करताना या जबाबदारीची जाणीव ठेवा.’ बाबांनी हे सांगितलं तो दिवस आणि आजचा दिवस. हा मंत्र आम्ही कधी विसरलो नाही.
( लेखक ‘साकेत प्रकाशन’ या संस्थेचे संचालक असून ‘साकेत बुक वर्ल्ड ’ चे कार्यकारी संचालक आहेत )