राजकीय खेळी मालेगावची अन् तयारी धुळ्याची

राजकीय खेळी मालेगावची अन् तयारी धुळ्याची
राजकीय खेळी मालेगावची अन् तयारी धुळ्याची sakal

मालेगाव महापालिकेतील काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी महापौरांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला धक्का देणारी ही वरवरची घटना दिसत असली, तरी या घडामोडीचे पडसाद केवळ मालेगाव शहरापुरते आणि ठराविक मतदारसंघांपुरते मर्यादित नक्कीच राहणार नाहीत. सध्या ही राजकीय उलथापालथ मालेगावभोवती केंद्रित असली तरीदेखील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मोठ्या घडामोडी या राजकीय नाट्यानंतर रंगण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत. मालेगाव हे धुळे लोकसभेंतर्गत येत असल्याने या घडामोडीनंतर भाजपसाठी धुळे लोकसभा मतदारसंघ राखणे अतिशय किचकट बनणार आहे. राष्ट्रवादीला धुळे लोकसभा मतदारसंघ मिळाल्यास निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर हे उमेदवार असू शकतात. अगदी काँग्रेसकडेही हा मतदारसंघ राहिला तरीदेखील डॉ. दिघावकर यांना काँग्रेस तिकीट देऊ शकेल. भाजपचा चेहरा म्हणून अमरिशभाई पटेल रिंगणात उतरू शकतात. या सध्या शक्यता असल्या तरीदेखील त्या दृष्टीने चाचपणी आत्तापासून नक्कीच सुरू झालेली आहे.

मालेगावचा मुस्लिम मतदार अलीकडच्या काळात एमआयएमकडे ओढला गेला. मालेगावमध्ये मुस्लिम समुदायामध्ये दखनी-मोमीन हा पारंपरिक वाद आहे. मोमीन अर्थात अन्सारी मंडळींवर धार्मिक पगडा अधिक आहे. जनता दलाचे निहाल अहमद मालेगावसाठी फारकाही न करताही सहा टर्म केवळ अन्सारी मतांवर आमदार म्हणून निवडून येत राहिले. सध्या तुल्यबळ विचार करता रशीद शेख यांच्या भोवतीचे बहुतांश नगरसेवक आणि कार्यकर्ते दखनी आहेत. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती यांच्या भोवतीचे वलय अधिकांश अन्सारींचे आहे. पूर्वी राष्ट्रवादीत असलेले मौलाना मुफ्ती सध्या एमआयएमवासीय आहेत. या परिस्थितीत नव्या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे पारडे आता सर्वाधिक जड झाले आहे. गेल्या विधानसभेनंतर जो महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला, त्यापूर्वी तो मालेगावमध्ये अस्तित्वात आलेला आहे. काँग्रेस आणि शिवसेना हे मालेगावमध्ये सोबत होते. काँग्रेसच्या जागी आता राष्ट्रवादी एवढाच काय तो बदल...

मालेगावमधील नव्या राजकीय समीकरणांचा परिणाम मुस्लिम प्राबल्य असलेल्या धुळे, जळगाव आणि भुसावळपर्यंत होऊ शकतो. त्यात धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीतही आगामी काळात पडसाद दिसण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. लोकसभेच्या राजकीय रिंगणात काँग्रेसला दमदार उमेदवार देता आला नाही. त्याचा सरळसरळ फायदा भाजपला होत राहिला. त्यामुळे आगामी निवडणुकीतील चित्र बदलण्याची क्षमता या राजकीय पटलावरील बदलत्या स्थितीमुळे निर्माण झाली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी पुढील निवडणुकीत दावा सांगू शकेल, अशी स्थिती आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून साथ न मिळाल्याची खंत रशीद शेख यांच्यासह त्यांच्या अनुयायांना आहे. रशीद यांचे पुत्र आसिफ यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर मालेगाव-मुंबई पदयात्रा काढली होती. शिवाय यावेळी मराठा आरक्षणालाही त्यांनी पाठिंबा दर्शविला होता. या रॅलीद्वारे त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. पक्षविरहीत एक संघटनादेखील त्यांनी तेव्हा मुस्लिम आरक्षणासाठी स्थापन केली होती.

मुस्लिम समाजाचे सर्वाधिक अनुनय करणाऱ्या एमआयएमला दूर लोटण्याची संधी या निमित्ताने मुस्लिम समुदायासमोर निर्माण झाली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या राजकारणात मुस्लिमांचा तारणहार म्हणून एमआयएम पुढे येऊ पाहतंय. ही दरी भरून काढण्यासाठी पुढील निवडणुकीपर्यंत अनेक उलथापालथी होऊ शकतात. सध्याचे मालेगावमधील एमआयएमचे आमदार मुफ्ती देखील वेगळी वाट निवडू शकतात. काँग्रेसमध्ये झालेलं मोकळं वातावरण आता अनेक मुस्लिम नेत्यांना खुणावू पाहतंय. महाविकास आघाडीचा खरा कस लोकसभा निवडणुकीवेळी लागणार आहे. त्यामुळे तेव्हाच्या राजकीय गणितांसाठीची ही सुरवात मानायला हरकत नाही. धार्मिक धुव्रीकरण हादेखील मोठा मुद्दा पुढच्या काळात निर्माण केला जाऊ शकतो.

मालेगावमधील रशीद शेख कुटुंबीयांचं दुःख मात्र वेगळंच होतं. या सगळ्या कोलाहलात त्यावर आता फारशी चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. सुमारे चाळीस वर्षे शेख कुटुंब काँग्रेसशी निगडित होतं. स्व. विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. तेव्हा वरिष्ठांकडून नेहमी विचारपूस व्हायची. राष्ट्रवादीत जाण्याच्या निर्णयाबाबत रशीद शेख शेवटपर्यंत ठाम नव्हते. मुलगा आसिफला मात्र जायचं होतं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींनी चौकशी करायला ठाण्याच्या एका नगरसेवकाला निरीक्षक म्हणून पाठवलं होतं. त्यामुळे शेख कुटुंबाची खदखद अधिक वाढली आणि काँग्रेस सोडण्याचा निर्णय पक्का झाला. मालेगावमध्ये रशीद शेख कुटुंबाव्यतिरिक्त अन्य कोणीही विकास साधू शकत नाही, ही भावना तिथल्या मतदारांमध्येही दृढ आहे. एमआयएमच्या सध्याच्या आमदारांनी मालेगावसाठी गेल्या अडीच वर्षात काहीही केलेलं नाही, हे विशेष. आता वेध आहेत ते पुढील घडामोडींचे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com