

Y2K Bug and Technology Revolution
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
कोणतीही वस्तू घेण्यासाठी असंख्य पर्याय एका टचवर आले. कपडे, शूज, मोबाइल, घड्याळं, अंडरवेअर्स, रेस्तरां, दुकानं, खाद्यपदार्थ किंवा शॉपिंग साइट्स अशा सगळ्याच बाबतीत बहुपर्यायांची मुबलक मुबलकता आली. पण त्यामुळे होतं असं की, नक्की काय, कुठून आणि चांगलं डील मिळवून कसं घ्यायचं हे पाहून दमछाक होते.
मी तेव्हा तेरा-चौदा वर्षांचा होतो. वर्ष २००० उजाडणार होतं. मी ज्या मोठ्या मुलांमध्ये – दादांमध्ये - क्रिकेट खेळायचो, त्यांच्या ग्रुपमध्ये तेव्हा एकच चर्चा होती – वायटूकेची. २००० या वर्षात एक जानेवारीला कॉम्प्युटरवर तारीख काय असेल? हा प्रश्न तेव्हा चर्चिला जात होता. तो झिरपत झिरपत आम्हा शाळेत जाणाऱ्या मुलांपर्यंतही आला होता. शाळेत तेव्हा तसा कॉम्प्युटर हा औपचारिक विषय होता, पण आमचा थेट कॉम्प्युटरशी संबंध येत नव्हता. काही मुलं गेम खेळायची तितकाच. त्यात मला ते फारसे आवडायचे नाहीत. त्यामुळे हे सगळे जण वायटूकेचं किती चर्वितचर्वण करताहेत असं आम्हाला – निदान मला तरी वाटत होतं.
मोठं झाल्यावर वाचलं की, वायटूकेचा प्रश्न हे एक गिमिक होतं. मुद्दामहून तंत्रज्ञान उत्पादनांकडे लोकांचं लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी टेक-कंपन्यांनी निर्माण केलेलं मार्केटिंग गिमिक. कॉम्प्युटर नेहमीप्रमाणेच तारीख दाखवणार होता, हे तंत्रज्ञान कंपन्यांच्या धुरीणांना माहीत होतं, पण वायटूकेमुळे अचानक कॉम्प्यूटर, ऑपरेटिंग सिस्टिम्स असले शब्द चर्चेत आले. जणू हे गिमिक पुढे होऊ घातलेल्या इंटरनेट क्रांतीची, सोशल मीडियाची, मोबाइल क्रांतीची आणि आताच्या एआयची नांदी असावी असं आता वाटतं.