‘या श्वासाचे श्वासपण’

आश्वासक आणि आशावादी सूर सांगणारी कविवर्य श्रीधर शनवारे यांची ‘या श्वासाचे श्वासपण’ ही कविता
Ya Shwashache Shwaspan poem by Sridhar Shanvare
Ya Shwashache Shwaspan poem by Sridhar ShanvareSakal

- प्रशांत असनारे

माणसाचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य अनेक मौल्यवान श्वासांनी लगडलेलं आहे. यातला प्रत्येक श्वासन् श्वास महत्त्वाचा आहे . या प्रत्येक श्वासाचा आपण आदर करायला हवा...आस्वाद घ्यायला हवा...उपभोग घ्यायला हवा.

आयुष्यात निराशाचे क्षण तर प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात; पण या क्षणांवर मात करून जो पुढं जातो त्यालाच आयुष्याचं आणि आयुष्यातल्या या श्वासांचं मोल कळलेलं असतं. हा आश्वासक आणि आशावादी सूर सांगणारी कविवर्य श्रीधर शनवारे यांची ‘या श्वासाचे श्वासपण’ ही कविता मला नेहमीच आवडत आलेली आहे.

नैराश्य, वैफल्य, अनिश्चिता, उदासपणा, अलिप्तता, उद्वेग, दुःख यांची तमा न बाळगता स्वतःच्या श्वासांवर नियंत्रण कसं ठेवायचं, त्याचं ‘श्वासपण’ कसं टिकवायचं हे सत्त्व आणि तत्त्व सांगणारी ही कविता मनाचा तळठाव घेते. कालचक्रातल्या अंधाराची भीती न बाळगता प्रकाशाचे कण शोधण्याचा मौलिक सल्ला आपल्याला ही कविता देते.

या नैराश्याच्या पोकळीत गुंतून न पडता श्वासांचं श्वासपण जपा, तसंच नैराश्य किंवा वैफल्य यांच्यामुळे आपल्या श्वासांचं हिरवेपण आणि ताजेपण कोमेजून देऊ नका हे मानवी जीवनावरचं सुसंगत असं तत्त्वज्ञान शनवारे यांनी अत्यंत कमी शब्दातून मांडलं आहे.

कविता साधी आहे, सोपी आहे, सरळ आहे. कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करता आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करणारी आहे. या कवितेच्या मुळाशी अनुभवाचं मोठं बळ आहे. कविता लहान असली तरी या कवितेचा आवाका खूप मोठा आहे आणि जीवनविषयक संवेदन व्यक्त करण्याची क्षमता अनन्यसाधारण आहे.

खरं म्हणजे, आपल्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडेल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. पुढच्या क्षणी कदाचित एखादी चांगली घटना घडू शकते किंवा एखादी वाईट बातमी आपल्या कानावर पडू शकते. अनिश्चित घटनांचा थवा आपल्या आयुष्यात नेहमीच उडत असतो; पण म्हणून आपण घाबरायचं नसतं. येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आव्हान देत पुढं जायचं असतं.

सोप्या शब्दांतून जीवनाचं हे सत्य आणि सार सांगता सांगता, निराश मनोवस्थेच्या चक्रव्यूहात अडकून पडलेल्यांना मार्ग किंवा दिशा दाखवण्याचा प्रयत्न ही कविता करते.

कविता हे साहित्यप्रकारातलं सगळ्यात लघुरूप आहे. कमीत कमी शब्दांतून जास्तीत जास्त परिणाम करण्याची शक्ती कवितेमध्ये असते. तिच्या संक्षेपशील स्वभावामुळं तीमधल्या प्रत्येक शब्दाला फार महत्त्व आहे. शनवारे यांनी आपल्या नेहमीच्या संयत शैलीतून आणि कमीत कमी शब्दांतून हा अलौकिक आशय सहज कवेत घेतला आहे.

कवी हा हळवा असतो आणि या हळवेपणामुळंच एक प्रकारची मानसिक शक्ती त्याला प्राप्त झालेली असते. या हळवेपणामध्येही सामर्थ्य असतं म्हणून तो क्रियाशील असतो आणि सर्जनशील असतो. 

ही कविता वाचल्यानंतर मला सहज एक गोष्ट आठवली...एकदा एक कवी रस्त्यानं जात होता. वाटेत त्याला एक काडी पडलेली दिसली. ती काडी ओलांडून तो पुढं गेला. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो पुन्हा माघारी वळला.

त्यानं ती पडलेली काडी उचलली. तिचे दोन तुकडे केले. एकमेकांच्या शेजारी ठेवले आणि पुढं निघून गेला. रस्त्यावर पडलेल्या त्या एकट्या काडीचं एकाकीपण त्याला सहन झालं नाही म्हणून काडीचे दोन तुकडे करून ते एकाकीपण त्या कवीनं नाहीसं केलं!

दोन काड्यांना एकमेकींची सोबत मिळेल ही त्या कवीची त्यामागची उदात्त भावना. अशाच निकोप, निरामय आणि हळव्या  भावनांसह कवी आयुष्यभर जगत असतो...आयुष्यभर लिहीत असतो. शब्दांमधून प्रकट झालेल्या या सर्व भावना म्हणजेच त्याच्या कविता असतात.

शनवारे हे मनानं हळवे होते म्हणूनच ते क्रियाशील, सर्जनशील आणि सामर्थ्यशील होते. ‘उन्हउतरणी’, ‘आतून बंद बेट’, ‘थांग-अथांग’, ‘तळे संध्याकाळचे’, ‘तीन ओळींची कविता’, ‘जातो माघारा’, ‘सरवा’ हे शनवारे यांचे गाजलेले कवितासंग्रह.

शनवारे हे व्रतस्थ, संयमी आणि प्रयोगशील कवी म्हणून साहित्यक्षेत्रात ओळखले जातात. त्यांच्या कविता दीर्घकाळ मनात राहतील अशाच आहेत. त्यांच्या कविता जीवनाकडं पाहण्याचा वेगळा आणि समजूतदार दृष्टिकोन देतात. त्यांच्या कवितेतून त्यांची सकारात्मक दृष्टी तर जाणवतेच; पण त्यांची चिंतनशील प्रवृत्तीही आपल्याला अनुभवायला मिळते.

मला आवडलेली त्यांची ही कविता ‘आतून बंद बेट’ या संग्रहातली आहे. या संग्रहातल्या सगळ्या कविता वाचताना निसर्गाची अनेक बिंब-प्रतिबिंबं आपल्याला पाहायला मिळतात. याही कवितेत आग , बाग, जळता फाग, गार वारा, निळा गालिचा अशा आंतरिक लय असलेल्या प्रतिमा आलेल्या आहेत. ज्या कवीनं आयुष्यभर निसर्गाशी मैत्री केली त्याच्या कवितेत निसर्गाची ही सगळी रूपं उतरणं स्वाभाविक आहे.

कवीचं निसर्गाशी अतूट असं नातं आहे म्हणूनच ते आयुष्यभर जगताना निसर्गात जास्त रमतात आणि निसर्गात रमता रमता आयुष्याचा सुंदर चेहरा शोधण्याचा प्रयत्न करतात. 

यानिमित्तानं मला त्यांच्या कवितेच्या अजून काही ओळी आठवत आहेत. ते एका कवितेत म्हणतात : 

पायात नदी

आणि मनात तळे घेऊन

मी आयुष्यातून चाललो आहे-

भारलेपणा घेऊन.

निसर्ग माणसाला काय देतो यापेक्षा माणूस निसर्गाकडून काय घेतो हे प्रतीकांच्या-प्रतिमांच्या माध्यमातून शनवारे कवितेतून वारंवार मांडतात. शनवारे यांचं जितकं प्रेम निसर्गावर आहे तितकंच प्रेम माणसाच्या जगण्यावर आहे आणि म्हणूनच निसर्गाचे दाखले देत असताना ते जगण्याच्या अन्वयार्थापाशी येऊन थांबतात.

ही कविता शनवारे यांची जरी असली तरी त्यातून ध्वनित होणारा मथितार्थ हा सगळ्या मानवजातीसाठी आहे. जेव्हा एखादा कवी स्वतःविषयी न बोलता समाजाविषयी बोलतो किंवा समूहाविषयी बोलतो तेव्हा ती कविता आपोआप वैश्विक आणि सार्वत्रिक अनुभव घेऊन येते.

निसर्ग आणि मानवी आयुष्य यांचा अनुबंध सांगणारी एक वस्तुनिष्ठ कविता म्हणून मी या कवितेकडं पाहतो. मला आवडलेल्या या कवितेविषयी लिहिताना मी फार खोलवर गेलेलो नाही; पण या कवितेतल्या अभिजात काव्यविचारांचं अजून खोलवर मूल्यमापन व्हायला हवं, असं मला मात्र प्रामाणिकपणे वाटतं.

(लेखक हे सुप्रसिद्ध कवी असून, ‘मीच माझा मोर’ आणि ‘मोराच्या गावाला जाऊया’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com