हृदयाला भिडणारी व्यक्तिचित्रं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalijkhuna Book

बऱ्याच दिवसांनी एक सुंदर पुस्तक हाती आलं. उदय कुलकर्णी यांनी या पुस्तकात त्यांच्या काळीजकुपीत अलगदपणे बंद केलेल्या त्यांच्या जीवनात आलेल्या सुहृदांचीच व्यक्तिचित्रं प्रामाणिकपणे शब्दबद्ध केली आहेत.

हृदयाला भिडणारी व्यक्तिचित्रं!

- यशवंत नामदेव व्हटकर saptrang@esakal.com

बऱ्याच दिवसांनी एक सुंदर पुस्तक हाती आलं. उदय कुलकर्णी यांनी या पुस्तकात त्यांच्या काळीजकुपीत अलगदपणे बंद केलेल्या त्यांच्या जीवनात आलेल्या सुहृदांचीच व्यक्तिचित्रं प्रामाणिकपणे शब्दबद्ध केली आहेत. त्यांच्या आयुष्यात या ना त्या मार्गाने ही मंडळी आली व लेखकांच्या ऋजुतापूर्ण, मार्दवप्रेमाने, आपलेपणाच्या वागण्याने ती त्यांचीच होऊन गेली. सर्वच व्यक्तिचित्रं ही खूपच हृदयस्पर्शी झाली आहेत.

कुलकर्णी यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केलेली सुमारे ३० ते ३५ व्यक्तिमत्त्वं ही खरोखर एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. इंग्लंडमध्ये मिडवाइफ - नर्सची नोकरी करून आपले लाखो रुपये समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्थेला दान करणाऱ्या कृष्णाताई लोकरे. १९४५ मध्ये रेल्वेस्टेशन मास्तर असणाऱ्या वडिलांच्या निधनानंतर ही खंबीर, धाडसी मुलगी १९५५ मध्ये पंधराशे रुपये इतकी तुटपुंजी रक्कम घेऊन इंग्लंडला आपल्या तुटपुंज्या इंग्रजी भाषाज्ञानासह रवाना झाली व स्व-हिमतीने व तेथील सहृदयी मिशनरींच्या मदतीने स्थिर झाली. आपल्या नियोजित वरालाही तिथं बोलावून त्यांनी तिथं पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेतलं व पंचावन्न वर्षांचा संसारही केला. दर वेळी भारतात आल्यावर सेवाभावी संस्थांना भरभरून निरपेक्ष भावनेने मदत केली. पंतप्रधान निधी, डायबेटिक सोसायटी, व्हिलेज डेव्हलपमेंट, आनंदवन, बरोरा यांना अक्षरशः कोटी-कोटींच्या देणग्या त्यांनी कोणासही कळू न देता दिल्या. ना फोटो, ना प्रसिद्धी.

या पुस्तकातील एकेका व्यक्तीसाठी लिहीत गेलो तर ते एक पुस्तकच होईल. या पुस्तकातील एका व्यक्तीबाबत बोलायलाच हवं - सोनाली नवांगुळ. या हिंमतबाज मुलीविषयी अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या या प्रकरणात सोनालीला अपघाताने आलेलं अपंगत्व व त्याच्यावर मात करत तिने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. या प्रगतीच्या वाटेत कुलकर्णी अगदीच निर्धाराने, स्वउन्नतीच्या क्षितिजाप्रत झेप घेणाऱ्या स्वावलंबी सोनालीला जिथं हवा तिथंच हात देतात. अलगद, तिचा स्वाभिमान, स्वत्व राखत.

या पुस्तकात त्यांनी अनेक व्यक्तिमत्त्वांशी वेगवेगळ्या कारणांस्तव आलेला संबंध स्पष्ट केला आहे. संगवई कुटुंबीय - डॉ. विजया संगवई, संजय संगवई - नर्मदा आंदोलनातील एक क्रियाशील प्रमुख कार्यकर्ता - मेधाताई पाटकर, भालजी, लतादीदी, स्मिता पाटील, भानू अथय्या ते प्रख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ते मराठीतील दिग्गज नट चंद्रकांत, शापित अभिनेता गणपत पाटील, मोठा माणूस निळू फुले सर्वच ग्रेट. वाड कुटुंबीय ते जयंत सावरकर, वसंत सरवटे, शि. द. फडणीस ते बाबा आमटे, अन्सार शेख आणि भारतीय मुस्लिमांच्या व्यथेला सर्वांसमोर आणणारे मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचं संयोजन, ते सर्वांसमोर आणण्याचं योगदान, नर्मदा बचाव आंदोलन, काय काय नाही या एकांड्या शिलेदाराने केलं. कोल्हापूरकरांना म. सु. कारेकरांचं नाव माहीत आहे; पण त्यांच्या कार्याचं समालोचन कुलकर्णी यांनी अतिशय आपुलकीच्या भाषेत केलं आहे.

‘मराठी रंगभूमी, तंजावर आणि कोल्हापूर’ या लेखात त्यांचा अभ्यास व व्यासंगाची झलक दिसते. पार्श्‍वनाथ आळतेकर ते प्रत्यक्ष देव आनंदला प्रथम चित्रपटात दिग्दर्शित करणाऱ्या पेटकर मास्तर तथा यशवंत विठ्ठल पेटकर, शंकरराव घोरपडे या सर्वांना कुलकर्णी यांनी वाचकांच्या भेटीस आणलं आहे. ते जेवढ्या सहजपणे सर्वसामान्य व्यक्तींकडे जात, त्याच सहजपणे देव आनंद, दिलीपकुमार, राज कपूर यांनाही भेटले. राज कपूर यांनी कोल्हापूरकरांची एक लाघवी आठवण ‘किधरभी रास्ता पुछा तो... नीट जा म्हणजे पोचताय बघा बरोबर!’ ऐसे बोलते थे. लेखकाला ते म्हणतात, ‘‘मैने कोल्हापूर के लोगोंसे एक बात सीख ली, मान ली. अपनी राहपे ‘नीट’ यानी सीधा चलता गया... और देखिए में कहाँ से कहाँ पहुंच गया जिंदगी में.’’

‘आपली’ स्मिता कोल्हापुरात शूटिंगसाठी आल्यावर कसलीही ओळख नसताना शूटिंग पाहण्याच्या निमित्ताने पन्हाळ्याला जाऊन तिला अडवून तिला ममतेच्या, आपलेपणाच्या हक्काने अडवून, ‘‘तू ‘शराबी’सारख्या फालतू सिनेमात तो घाणेरडा डान्स का केलास?’’

एवढे रोखठोक प्रश्‍न त्या दिग्गज अभिनेत्रीला विचारण्याचं धाडस लेखक करतो. स्मिताही काही क्षण आवाक् झाली; पण त्याच्या रागयुक्त प्रश्‍नातील माया, प्रेम, आपलेपणाचा ओलावा पाहून स्मिता उत्तर देते, जे एका सच्च्या मनाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारं व खरंच वाचण्यासारखं आहे.

Web Title: Yashwant Namdeo Vhatkar Writes Kalijkhuna Book

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Booksaptarang
go to top