चित्ता, उंदीर आणि सम्राट अशोक! (यशवंत थोरात)

यशवंत थोरात ythorat@gmail.com
रविवार, 18 जून 2017

विज्ञान असं सांगतं की माणसाला भुकेची किंवा शरीरसुखाची जशी गरज निर्माण होते, तशीच त्याच्या मनात हिंसेचीही गरज निर्माण होते. मात्र, संशोधकांच्या मते, आधुनिक जागात आक्रमकतेचं आकर्षण फायद्याचं नसून नुकसानकारक आहे.
मग यावर उपाय काय आहे?

विज्ञान असं सांगतं की माणसाला भुकेची किंवा शरीरसुखाची जशी गरज निर्माण होते, तशीच त्याच्या मनात हिंसेचीही गरज निर्माण होते. मात्र, संशोधकांच्या मते, आधुनिक जागात आक्रमकतेचं आकर्षण फायद्याचं नसून नुकसानकारक आहे.
मग यावर उपाय काय आहे?

मी आमच्या घराच्या वरच्या मजल्यावरच्या अभ्यासिकेत अमेरिकेच्या मूळ रहिवाशांविषयीचं एक पुस्तक चाळत होतो. त्यांच्यावरच्या अन्यायाची ती कहाणी वाचताना माझ्या रागाचा पारा क्षणाक्षणाला चढत होता. अमेरिकेच्या इतिहासात काळीज गोठवणारे दोन मुख्य शोकप्रवाह आहेत. एक म्हणजे 1607 मध्ये अमेरिकेत उतरल्यावर ब्रिटिशांनी तिथले मूळ रहिवासी असलेल्या रेड इंडियनांची केलेली अमानुष कत्त्तल. दुसरा म्हणजे, आपल्या कापसाच्या शेतांवर राबवून घेण्यासाठी ब्रिटिशांनी आफ्रिकेतून आणलेले चार लाख गुलाम. या गुलामांना अतिशय अमानवी वागणूक दिली जात असे. सुसंस्कृततेचा टेंभा मिरवणाऱ्या ब्रिटिशांकडून दिली जाणारी ही वागणूक म्हणजे ढोंगीपणाचा कळसच होता. माझ्या रागाचा पारा आणखी चढण्यापूर्वीच माझी पत्नी उषा हिचा आवाज माझ्या कानी पडला. ‘जरा खाली याल का?’ असा पुकारा झाला. नंतर नेहमीप्रमाणेच जरा मधाळ आवाजात ‘पुस्तकातले विचार तिथंच सोडून या, इथं जरा वेगळं काम आहे’ असं सांगण्यात आलं.

‘येतोच’ असं मी म्हणालो. - माणूस वयानं जसजसा मोठा होतो, तसतसे असले निरोप या "सूचना' बनत असतात आणि माझ्यासाठी तर ते "टेन कमांडमेंट'सारखे न टाळता येण्याजोगे आदेशच असतात. मी तातडीनं खाली गेलो. उषाचा एक मित्र आंब्याची पेटी घेऊन आला होता. कौतुकाचे भाव चेहऱ्यावर आणत "तुझ्याविषयी मला किती प्रेम आहे,' अशा आविर्भावात मी दिवाणखान्यात बसलो. उषानं आमची एकमेकांशी ओळख करून दिली. तो तंत्रज्ञ होता आणि व्यवसायातून मिळालेले पैसे इतिहासाच्या संशोधनासाठी खर्च करत होता.
‘सध्या काय चाललंय?’ चौकशी केली.
‘साठमारी’ या क्रीडाप्रकारावर संशोधन करतोय,’ तो म्हणाला. साठमारी म्हणजे दारू पाजल्यामुळं उन्मत्त झालेल्या हत्तीला नियंत्रणात आणण्याचा खेळ. - मी कोल्हापूरचा असल्यानं या क्रीडाप्रकाराशी परिचित होतो. विद्यार्थिदशेत मी कोल्हापूरमधल्या मंगळवार पेठेतल्या एका वसतिगृहात राहत असे. त्या वेळी पूर्वी जिथं असे खेळ होत, त्या मैदानात फिरायला जाणं, तिथं जाऊन वाचन करणं आणि एकटं भटकणं हेच माझे छंद होते.

‘त्या वेळी फक्त कोल्हापूर आणि बडोद्याचे संस्थानिकच या खेळाला आश्रय देत असत,’ त्यानं माहिती पुरवली.
पण तुला हे माहीत आहे का, की पूर्वी काळवीटांच्या शिकारीसाठी खास प्रशिक्षण दिलेले चित्ते मैदानात उतरवले जायचे. संस्थानिकांनी एक आवड म्हणून हा साहसी छंद जोपासला होता. भावनगर आणि कोल्हापूर या दोन संस्थानिकांतर्फे सर्वसामान्य माणसाच्या आणि त्यांच्या वसाहतवादी मित्रांच्या करमणुकीसाठी असे खेळ भरवले जात.
‘चित्ता हा श्वानकुळातला प्राणी आहे, असं मी कुठंतरी वाचलं आहे, ते खरं आहे का?’ त्यानं विचारलं.
‘नाही, तसं नाही. त्यांचे पंजे अर्धे मागं वळलेले असतात; पण ते मार्जारकुळातलेच आहेत. मात्र, सिंह, वाघ, बिबटे आणि लांडगे यांच्यासारख्या मोठ्या प्राण्यांमध्ये त्यांचा समावेश होत नाही,’ उषानं सांगितलं. उषाच्या माहितीला मी माझ्याजवळची थोडी माहिती जोडली. मी म्हणालो ः ‘पळताना आपला वेग अवघ्या तीन सेकंदांत शून्यापासून 60 किलोमीटरपर्यंत वाढवण्याची त्यांची क्षमता असते. त्यामुळंच चित्ता हा जगातला सगळ्यात वेगवान प्राणी समजला जातो.’
‘या संस्थानिकांना चित्ते कुठं मिळायचे,’ त्यानं विचारलं.
‘आफ्रिकेतून’ - मी अंदाजानं सांगितलं. माझ्या वाक्‍यावर उषा सूचकपणे खाकरली. मी अंदाजपंचे काहीतरी ठोकून देतोय, हे ‘मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ची पदाधिकारी असलेल्या उषाच्या लगेच लक्षात आलं. मला दुरुस्त करत ती म्हणाली ः ‘आफ्रिकेत चित्ता आहे; पण त्या काळात आशियातही चित्ता होता.’

‘सध्या काय स्थिती आहे?’ मी विचारलं. त्यावर ‘सध्या भारतीय चित्ता अस्तित्वात नाही. 1948 मध्येच तो नामशेष झाला आहे. त्या वेळच्या सुरगुजाच्या विलासी आणि जंगली प्राण्यांबरोबर क्रूरतेने वागणाऱ्या महाराजांनी 1630 वाघांबरोबर मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात असलेल्या तीन चित्यांचीही शिकार केली. मात्र, आशियाई जातीच्या सुमारे 100 चित्यांचं इराणमध्ये संगोपन केलं जात आहे,’ उषानं नेमकी माहिती दिली.

ब्रिटिशांच्या राजवटीत भावनगर आणि कोल्हापूरचे महाराज जंगली काळवीटांच्या शिकारीसाठी चित्ता पाळायचे. ब्रिटिश लष्करातल्या एका भारतीय अधिकाऱ्यानं या शिकारीचं सविस्तर वर्णन आपल्या पुस्तकात केलं आहे. कोल्हापूर संस्थानच्या "राजाराम रायफल्स'साठी त्याची तात्पुरती नेमणूक करण्यात आली होती आणि युद्धासाठी नवी तुकडी तयार करण्याची जबाबदारी त्याच्याकडं सोपवण्यात आली होती.
‘ते पुस्तक मिळेल का?’ त्यानं विचारलं.

‘शक्‍यता कमी आहे. कारण, ते बाजारात उपलब्ध नाही आणि माझ्याकडं त्याची फक्त एकच प्रत आहे,’मी म्हणालो. तो थोडासा हिरमुसला. त्याला दिलासा देत उषा म्हणाली ः ‘तुला ते ग्रंथालयात मिळू शकेल; पण मी त्यातले काही उतारे वाचून दाखवते.’
आम्हाला ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. तिनं वाचायला सुरुवात केली ः-
***

‘दुसऱ्या महायुद्धाच्या सुरवातीला माझी कोल्हापूर संस्थानच्या ‘राजाराम रायफल्स’साठी तात्पुरती नेमणूक झाली होती. युद्धाच्या तयारीचा एक भाग म्हणून संस्थानला एक नवी बटालियन उभी करायची होती. मी त्या वेळी तिथं असताना कोल्हापूरच्या महाराजांनी मला आणि माझ्या पत्नीला चित्त्यांची ती प्रसिद्ध शिकार पाहण्यासाठी निमंत्रित केलं होतं. त्या शिकारीत खास प्रशिक्षण दिलेल्या चित्त्याकडून हरणाची शिकार केली जाते. फक्त कोल्हापूर आणि भावनगर या दोन संस्थानांमध्येच अशी शिकार पाहायला मिळत असे. हा चित्ता बराचसा भारतीय पॅंथरसारखा दिसत असे; पण त्यांच्यात फक्त तेवढंच साम्य होतं. भारतीय पॅंथर छोटा; पण थोडासा जाड चणीचा होता, तर शिकार करवून घेण्यासाठी वापरला जाणारा हा चित्ता थोडा उंच आणि शिडशिडीत चणीचा होता. बिबट्या सर्वसाधारणपणे रात्री शिकार करतो. अचानक हल्ला करण्याचं तंत्र तो वापरतो. चित्ता हा मात्र दिवसाढवळ्या शिकार करतो आणि त्याच्या वेगावर त्याचा सर्वाधिक भर असतो. वेगाला अनुकूल अशीच त्याची शरीरयष्टी असते. मात्र, दीर्घ काळ तो हा वेग टिकवू शकत नाही. या वेगानं तो दीर्घ काळ पाठलाग करू शकत नाही. साधारणतः 300 मीटर्सच्या अंतरात शिकार मिळवता आली नाही, तर तो शिकारीचा नाद सोडून देतो आणि चिडून एखाद्या झाडाखाली चरफडत बसून राहतो.’

‘एक कप चहा मिळेल?’ वाचनाची लय तोडत मी विचारलं.
उषानं नुसताच एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडं टाकला आणि शांतपणे आपलं वाचन पुढं सुरू केलं ः-
‘- महाराजांच्या निमंत्रणानुसार आम्ही मोटारीनं कोल्हापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिकारीच्या स्थळी पोचलो. आम्हाला तिथं भरपूर नाष्टा देण्यात आला. तेवढ्यात भगव्या रंगाच्या आलिशान गाडीतून महाराज तिथं आले. ती एक प्रवासी पद्धतीची मोटार होती. भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या आणि दणकट शरीरयष्टी असलेल्या महाराजांना चढणं-उतरणं सोईचं व्हावं, यासाठी मोटारीचे समोरचे दरवाजे काढण्याची सोय त्या गाडीत होती. थोड्या वेळानं एक मोठी चारचाकी घोडागाडी तिथं आली. तिला ‘ब्रेक’ असं म्हटलं जाई. दोन अर्जेंटिनी घोडे त्या गाडीला जोडलेले होते. गाडीवान ऑस्ट्रेलियन होता आणि त्याचं नाव चार्ली असं होतं. ब्रेकच्या समोरच्या भागात लाकडी बाकासारखं एक सीट होतं. मागच्या बाजूला दोन लाकडी बाक होते. त्या दोन बाकांमध्ये तो सडपातळ चित्ता उभा होता. आम्हाला त्या बाकांवर बसायचं होतं. तो चित्ता पूर्णपणे माणसाळलेला आणि निरुपद्रवी आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं; पण तसं दिसत मात्र नव्हतं.

महाराज त्या घोडागाडीच्या समोरच्या बाकावर स्थानापन्न झाल्यानंतर दुडक्‍या चालीनं ती ब्रेक निघाली. उंच-सखल भागातून आम्ही जंगलाच्या आतल्या भागात पोचलो. साधारणतः मैलभर अंतर गेल्यानंतर आम्हाला सुमारे 500 मीटर अंतरावर काळवीटांचा एक कळप दिसला. आमच्या गाडीवानानं घोडागाडीचा वेग कमी केला, वाऱ्याचा अंदाज घेतला आणि त्या हरणांना आमचा वास येऊ नये म्हणून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं घोडागाडी त्या कळपाच्या जवळ नेली. त्यानंतर त्या कळपातल्या हरणांना चाहूल लागणार नाही, अशा पद्धतीनं त्यानं ती घोडागाडी नागमोडी वळणं घेत कळपाच्या बरीच जवळ नेली. आम्ही त्या कळपापासून 300 मीटर अंतरावर पोचलो, तेव्हा चित्त्याची देखभाल करणाऱ्या मदतनिसानं चित्त्याच्या डोळ्यावरची कातडी झापडं काढली आणि त्याची नजर त्या कळपाकडं वळवली. चित्त्यानं त्या कळपाकडं पाहिलं, एकदा आजूबाजूला नजर टाकली आणि ब्रेकमधून हलकी उडी मारून तो जमिनीवर उतरला. त्यानंतर पोट जमिनीला लागेल इतकं खाली वाकत जमिनीवरच्या उंचवट्यांचा फायदा घेत तो धीम्या गतीनं कळपाकडं सरकायला लागला. त्याला कसलीही घाई नव्हती. त्याच्या हालचाली अतिशय शांत; पण तितक्‍याच सावध आणि अतिशय योजनापूर्वक होत्या. तो कळपापासून सुमारे 150 मीटरवर पोचला, तेव्हा त्यानं क्षणार्धात त्या कळपातल्या एका हरणाकडं झेप घेतली. चित्त्याची चाहूल लागताच भेदरलेल्या हरणानंही तेव्हाच उडी मारली. अशा वेळी हरीण एका विशिष्ट लयीनं उड्या मारत एका उडीत ते 25 ते 30 फूट अंतर सहजपणे कापते. या वेळी आमची ब्रेक एक वळण घेऊन खाचखळग्यातून चित्त्याच्या मागं वेगानं धावत होती. गाडीच्या धक्‍क्‍यांमुळं आमची हाडं मोडायचंच फक्त बाकी राहिलं होतं. तोपर्यंत चित्ता कळपापर्यंत पोचला होता आणि एका काळवीटाच्या बाजूनं वेगानं पळत होता. त्यानंतर जे घडलं ते इतक्‍या वेगानं घडलं, की ते मानवी डोळ्यांनी टिपणं अशक्‍य होतं. चित्त्याची आणि त्या काळवीटाची अपघातानं टक्कर झाली, असं आम्हाला क्षणभर वाटलं; पण ते तसं नव्हतं. काळवीटाच्या बाजूनं वेगानं पळताना त्यानं त्या काळवीटाला खाली पाडलं आणि आपले दात त्याच्या घशात घुसवले. विजेच्या वेगानं हालचाली करत त्यानं त्या हरणाला जमिनीवर दाबून धरलं होतं. मात्र, त्याच्या पायापासून तो स्वतःला सावधपणे दूर ठेवत होता. त्या काळवीटाच्या लाथेचा एक फटका बसला असता तर त्या चित्त्याच्या डोक्‍याची हाडं तुटली असती, असं मला कुणीतरी सांगितलं. आमची ब्रेक त्या जागी पोचली, तेव्हा त्या चित्त्याचा प्रशिक्षक गाडीतून उतरून त्या चित्त्याजवळ गेला. चित्त्यानं गुरगुरतच त्याचं स्वागत केलं. त्याच्याशी हळुवारपणे बोलत त्यानं त्याला साखळी बांधली. त्या वेळी दुसऱ्या एका मदतनिसानं त्या काळवीटाचा गळा चिरून एका थाळीत त्याचं रक्त जमा केलं आणि ते त्या चित्त्याला प्यायला दिलं तेव्हाच त्याचं समाधान झालं. त्यानंतर तो चित्ता कुठलाही विरोध न करता चुपचाप गाडीत येऊन बसला. अशा प्रकारे चित्त्याची ती थरारक शिकार संपली. अशी शिकार पुन्हा कधी पाहायला मिळणार नाही.'' उषानं पुस्तक मिटलं.

‘व्वा, काय थरारक वर्णन आहे!’ तो मित्र म्हणालाः ‘काय ते दिवस होते. रंग, समारंभ, प्रणय, क्रीडा, शौर्य, माणसाची हत्तींशी झुंज, चित्त्याची शिकार, एखाद्या कवितेच्या लयीसारखं चापल्य...कितीतरी गोष्टी. आताच्या आपल्या नीरस आयुष्यात कसलाही थरार उरलेला नाही.’
***

आमच्या गप्पा संपल्या. उषा त्याला बाग दाखवायला घेऊन गेली; पण या चर्चेनं मी मात्र अस्वस्थ झालो. माणूस हिंसेकडं का आकर्षिला जातो, याचं उत्तर मला आजपर्यंत कळलेलं नाही. अगदी प्राचीन काळापासून माणसाला रक्तपाताची आवड आहे. मग तो रक्तपात एखाद्या मैदानावरचा असो अथवा रणांगणावरचा असो. प्राण्यांची झुंज, माणसांमधल्या लढती किंवा प्राणी आणि माणूस यांच्यातल्या लढती पूर्वीपासून अतिशय लोकप्रिय आहेत. त्या राजे-रजवाड्यांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्येही सारख्याच प्रिय आहेत. रोमन साम्राज्यात माणूस आणि प्राणी यांच्यातल्या लढती मुद्दाम आयोजित केल्या जात. सगळ्या जगातून जंगली जनावरं रोममध्ये आणली जात आणि त्यांची माणसांबरोबर झुंज लावली जात असे. त्या झुंजी अतिशय निर्दयपणे लढल्या जात आणि त्यात रक्तपातही खूप होत असे. जिंकणारा हीरो बनत असे. रक्त आणि शस्त्र यांचं लोकांना एक वेगळंच अप्रूप असतं.
आज अशी द्वंद्वं किंवा झुंजी होत नाहीत; पण आपल्या सभोवतालचा हिंसाचार सुरूच आहे. बॉम्बस्फोट होत आहेत, बेछूट गोळीबार होतोच आहे, सार्वजनिक मालमत्तेची राखरांगोळी केली जात आहे, एखाद्या ओलिसाचे अवयव तोडणं किंवा लोकांच्या समोर त्याचं डोकं धडावेगळं करणं असे प्रकार सर्रास केले जातात. एवढंच नव्हे तर, निर्लज्जपणे त्याचं चित्रीकरणही केलं जातं. एवढं क्रौर्य माणसात येतं कुठून? ते आपल्या मनातूनच येतं का? आणि ते आपल्याला आकर्षित का करतं? रस्त्यावर एखादा अपघात होतो, तेव्हा बघ्यांची गर्दी का जमते? आपल्याला वृत्तपत्रातल्या हिंसाचाराच्या बातम्या वाचायला का आवडतात? केवळ हिंसाचाराच्याच नव्हे, तर खुनाच्या कथांमध्ये आपल्याला एवढा रस का असतो? या वेळी आठवतो तो डोस्टोव्हस्कीच्या ‘क्राईम अँड पनिशमेंट’ या कादंबरीतला तो खुनाचा प्रसंग. त्या प्रसंगात रास्कोल्निकॉव्ह सावकाराच्या खोलीत कुऱ्हाड घेऊन जातो. त्याला पैशांची गरज असते; पण तिथं असलेली स्त्री त्याला जगण्याच्या दृष्टीनं निरुपयोगी वाटते. तो त्याची कुऱ्हाड गरागरा फिरवतो आणि यांत्रिकपणे, अत्यंत निर्दयतेनं तिचं शिर धडावेगळं करतो. हे कृत्य करताना तो स्वतःची शक्ती वापरत नाही असं वाटतं; पण तिचं मुंडकं उडवून तो त्याची कुऱ्हाड खाली घेतो, तेव्हा त्याची शक्ती त्याला पुन्हा प्राप्त होते. अनेक पिढ्यांनी हा परिच्छेद पुनःपुन्हा वाचला आहे. तो वाचताना त्यांच्या अंगावर काटा आला आहे; पण त्या खुनाचा एक असुरी आनंदही त्यांना वाटला आहे. का? कशामुळं? प्रायोगिक शरीरशास्रात याचं उत्तर मिळतं. शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलंय, की उंदीर आणि इतर प्राणी एकमेकांबरोबरच्या लढाईकडं खेचले जातात. यात उंदराच्या मेंदूचा संबंध होता, हे आतापर्यंत ज्ञात नव्हतं. आता अभ्यासातून हे स्पष्ट झालंय, की उंदराचा मेंदू हा माणसाच्या मेंदूसारखाच असतो. असं मानलं जातं की उंदराचा मेंदू हा आक्रमक वृत्तीला भूषण मानतो. हिंसाचार घडवणं किंवा तो पाहणं अथवा त्यात भाग घेणं यातून मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं किंवा गमावलेली गोष्ट परत मिळवल्याचा आनंद मिळतो. या काहीतरी मिळवल्याच्या समाधानाच्या भावनेपोटीच उंदीर लढाईला उद्युक्त होत असतो. उंदीर आणि माणसात याबाबतीत साम्य आहे. माणूससुद्धा या भावनेपोटीच आक्रमक होत असतो. माणसाच्या मनातलं हिंसाचाराचं आकर्षण, क्रूर क्रीडाप्रकार किंवा रस्त्यावरच्या किंवा बारमधल्या हाणामाऱ्या या भावनेची सणक मेंदूत कशी जाते, हेच दर्शवतात. असं झालं की मेंदूत डोपामाईन (एक प्रकारचं हार्मोन्स) निर्माण होतं आणि त्यातून समाधानाची भावना निर्माण होते. विज्ञान असं सांगतं की माणसाला भुकेची किंवा शरीरसुखाची जशी गरज निर्माण होते, तशीच त्याच्या मनात हिंसेचीही गरज निर्माण होते. मात्र, संशोधकांच्या मते, आधुनिक जागात आक्रमकतेचं आकर्षण फायद्याचं नसून नुकसानकारक आहे.

मग यावर उपाय काय आहे?
इतिहासात इसवीसनपूर्व 261 मध्ये राजा अशोकानं कलिंगवर मोठ्या सैन्यानिशी आक्रमण केलं. कलिंग साम्राज्यातल्या स्वातंत्र्यप्रेमी लोकांनी मौर्यांच्या सैन्याला तीव्र विरोध केला; पण मगधांच्या शक्तिशाली सैन्यापुढं त्यांचं काही चालू शकलं नाही. या लढाईत कलिंग देशाचे एक लाख सैनिक ठार झाले, तर मगधाचेही तेवढेच सैनिक ठार झाले. या लढाईबद्दलची दुसरीही एक कथा ऐकायला मिळते. लढाईनंतर कलिंगच्या पराभूत राजपुत्राला शरणागतीचा उपचार म्हणून मौर्यांच्या सम्राटाला वाकून नमस्कार करण्यास सांगण्यात आलं. त्यानं त्याला स्पष्ट नकार दिला. त्यावर सम्राट अशोकानं त्याचं डोकं उडवण्याची आज्ञा दिली. त्यावर तो राजपुत्र त्याला हसून म्हणाला ः "हे सम्राटा, माझ्या इच्छेविरुद्ध माझी मान वाकवता येत नाही म्हणून माझं डोकं उडवण्याइतका तू दुबळा बनला आहेस का?' असं म्हणतात की, ते उत्तर ऐकून अशोकाला धक्का बसला. तो परतला तेव्हा त्याला एक नवाच धडा मिळाला होता. जी गोष्ट बळजबरीनं नव्हे, तर प्रेमातून स्वीकारली जाते तिलाच ती "आज्ञापालन' असं म्हणतात.

ही गोष्ट खरी की खोटी ते माहीत नाही; पण एक गोष्ट मात्र खरी आहे, की कलिंगाच्या युद्धानंतर सम्राट अशोकामध्ये खूप बदल झाला. बौद्ध धर्मगुरू आचार्य उपगुप्त यांच्या अनुग्रहानं क्रूर चंदअशोकाचा प्रियदर्शन झाला. एक सम्राट शांततेचा पुजारी आणि प्रेमाचा दूत बनला. सम्राट अशोक हा एक अपवाद आहे, असं म्हणता येईल; पण मग महात्मा गांधींचं काय? -मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनिअर) यांचं आणि नेल्सन मंडेला यांचं काय? ते सगळेजण जरी अपवाद असले, तरी एक गोष्ट कुणालाच नाकारता येणार नाही. क्रूरता आणि अमानुषता या गोष्टींना समाजाची आणि रूढींची कितीही जरी मान्यता असली, तरी या गोष्टी जास्त काळ टिकू शकत नाहीत. कितीही विरोध झाला तरी जगात शेवटी मानवता आणि प्रेम यांचाच विजय होतो. गांधीजींनी हे अतिशय चांगल्या शब्दात सांगितलंय. त्यांनी म्हटलंय, की मी जेव्हा जेव्हा निराश होतो, तेव्हा तेव्हा मला आठवतं, की इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेम यांचाच विजय झाला आहे. इतिहासात जुलमी आणि खुनी राजे झाले असले आणि अनेक वेळा ते अजिंक्‍य आहेत असं वाटत असलं, तरी शेवटी ते पराभूत होतातच. याचा प्रत्येकानं नेहमीच विचार केला पाहिजे.

Web Title: yashwant thorat write article in saptarang