शरीफ 'संपलेले' नाहीत....

गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

शरीफ यांना आता पंतप्रधान बनणे शक्‍य नसले; तरी शरीफ कुटूंबाचा राजकीय प्रभाव इतक्‍या सहजासहजी संपणारा नाही. शरीफ यांच्याविरोधातील या निकालाचे कारण पक्षाकडून "मुलकी प्रशासनाचे लष्करावर वर्चस्व रहावे, यासाठी शरीफ यांनी केलेले प्रयत्न,' असे देण्यात आले आहे. शरीफ व पाकिस्तानी लष्करात गेल्या दोन-तीन वर्षांत वारंवार उद्‌भविलेल्या संघर्षाकडे पाहता या दाव्यात तथ्य आहे, असेच म्हणावे लागेल

पाकिस्तानमधील राजकीयदृष्टया सर्वांत प्रभावशाली कुटूंब असलेल्या शरीफ कुटूंबाचे कुटूंबप्रमुख व पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पनामा गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्यायालयाने एकमताने "अपात्र' ठरविल्याने यामुळे शरीफ यांची थेट राजकीय कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शरीफ यांना तिसऱ्यांदा कार्यकाळ पूर्न करण्यात अपयश आले आहे. पाकिस्तानमध्ये आता 2018 च्या मध्यावधीस निवडणुका होणार आहेत. यामुळे शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षास शरीफ यांच्याजागी अन्य अंतरिम पंतप्रधान निवडण्याची संधी आहे. अर्थात या निकालामुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची दाट शक्‍यता आहे. न्यायालयाच्या या एकमताने देण्यात आलेल्या निर्णयास पाकिस्तानमधील प्रभावशाली सैन्य "लॉबी'चा पाठिंबा असण्याची शक्‍यता आहेच; शिवाय सैन्यासहितच शरीफ विरोधकांपैकी मुख्य नेते असलेल्या इम्रान खान यांनीही या निकालाचे स्वागत केले आहे. 

शरीफ यांनी 2013 मध्ये देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून खान यांनी त्यांच्याविरोधात मोठी मोहिम चालविली होती. जन आंदोलन व न्यायालयांमधील खटले अशा दोन्ही मार्गांनी खान यांनी शरीफ यांच्याविरोधात जनमत तयार करण्यात मोठी भूमिका बजावली होती. या पार्श्‍वभूमीवर शरीफ यांना दोषी ठरविण्यामधून खान यांच्या राजकीय वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा येऊन ठेपला आहे. यामुळेच या निकालानंतर प्रतिक्रिया देताना खान यांना झालेला आनंद स्पष्टपणे निदर्शनास आला! किंबहुना, शरीफ यांनी 2013 मधील निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करत खान समर्थकांनी 2014 मध्ये संसद व इतर सरकारी इमारतींना घेराओ आंदोलन केले होते. तसेच 2016 मध्ये पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादला वेढा घालण्याचा प्रयत्नही इम्रान यांच्याकडून करण्यात आला. हा प्रयत्न तांत्रिकदृष्टया अयशस्वी झाला; तरी यामुळे न्यायालयास शरीफ यांच्याविरोधातील पनामा पेपर्स प्रकरणी सुनावणीसाठी घ्यावे लागले, हे विसरुन चालणार नाही. किंबहुना गेल्या 21 जुलैस सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपर्ससंदर्भातील निकाल राखून ठेवला असता खान यांनी हा निकाल तत्काळ जाहीर करण्याची मागणीही केली. काही वर्षांच्या संघर्षानंतर काही दिवसांची प्रतीक्षाही इम्रान यांना सहन होईना झाली होती. तेव्हा इम्रान यांच्यासाठी हा मोठा राजकीय व नैतिक विजय आहे, यात काहीही शंका नाहीच. शरीफ यांच्यासंदर्भातील या निकालाचा इम्रान यांना पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा फायदा होईल, हेदेखील स्पष्टच आहे. अर्थात, निव्वळ या निकालामुळे इम्रान यांचा मार्ग खऱ्या अर्थी प्रशस्त होणार नाही. शरीफ यांचा गड मानला जात असलेल्या पंजाब प्रांतात प्रभाव वाढविण्यात इम्रान यांना कितपत यश येते, यावरच त्यांच्या भावी राजकीय वाटचालीचे खरे यश अवलंबून असेल. देशातील सर्वाधिक लोकसंख्या व सर्वांत समृद्ध असलेल्या पंजाब प्रांताचा कौल हीच पाकिस्तानच्या राजकीय सत्तेची (लोकशाही मार्गाने मिळविण्यात येत असलेल्या!) खरी चावी आहे. 

शरीफ यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून असलेला तिसरा कार्यकाळ त्यांच्यासाठी संमिश्र यशापयशाचा ठरला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरीफ यांचे भारतासंदर्भातील धोरण पाकिस्तानमध्ये वादग्रस्त ठरले. भारतासंदर्भात शरीफ यांचे अधिक खुलेपणाचे (तुलनात्मकदृष्टया!) धोरण पाकिस्तानी लष्कराशी संबंध अधिक तणावग्रस्त करणारा एक महत्त्वाचा घटक ठरला. भारतासंदर्भातील धोरणाबरोबरच देशातील "इस्लामिस्ट' घटकांसंदर्भातील शरीफ व पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकांमध्ये असलेला भेद, हेदेखील हे संबंध तणावग्रस्त ठरण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. शरीफ प्रशासनामधील मुलकी अधिकाऱ्यांनी इस्लामी दहशतवादी गटांविरोधात कडक कारवाई न करण्याबद्दल पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांना विचारलेला जाब हे पाकिस्तानमधील मोठे, वादग्रस्त प्रकरण ठरले होते. त्यावेळी शरीफ यांना संतप्त सैन्याच्या दबावाखाली त्यांच्या माहिती प्रसारण मंत्र्यास व दोन निकटवर्तीयांना हटविणे भाग पडले होते. मात्र हा संघर्ष सुप्तावस्थेत राहिलाच. यामुळे शरीफ यांच्यासंदर्भातील हा निकाल सैन्याच्या दृष्टिकोनामधूनही चांगली बातमी मानावयास हरकत नाही. 

शरीफ यांचा हा कार्यकाळ पाकिस्तानसाठी तुलनात्मकदृष्टया आर्थिक स्थिरतेचा राहिला; पाकिस्तानला या काळात काही मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यात यश आले. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानमधील जुनी समस्या असलेल्या वीजेच्या तुटवड्यावर काही अंशी उपाययोजना करण्यात आल्याचेही आढळून आले. परंतु भ्रष्टाचाराच्या या मुद्याने नवाझ व एकंदरच शरीफ कुटूंबाची प्रतिमा अत्यंत मलिन झाली आहे. भ्रष्टाचार हे शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या जनमताचे मुख्य कारण आहेच. मात्र या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शरीफ यांच्याविरोधातील असंतोष वाढविणाऱ्या अन्य घटकाचा विचारही करावयास हवा. शरीफ व पाकिस्तानी सैन्यामधील संबंध तणावग्रस्त असतानाच भारताकडून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक घडविण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे पडसाद उमतलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे शरीफ यांच्याबरोबरच देशात पाक सैन्याचीही नाचक्की झाली. याचबरोबर, गेल्या दोन-तीन वर्षांत, शरीफ यांच्या कार्यकाळामध्येच भारतास पाकिस्तानविरोधात मोठे राजनैतिक विजय मिळविण्यात यश आले आहे. उदाहरणार्थ, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये पाकिस्तानचा झालेला थेट नामोल्लेख ; वा पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने एकतर्फी फाशीची शिक्षा सुनाविलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल असो, भारताकडून पंतप्रधान शरीफ यांच्या या कार्यकाळात पाकिस्तानवर विविध मार्गांनी निर्माण करण्यात आलेला राजनैतिक दबाव हे शरीफ यांच्याविरोधातील असंतोष वाढविणारे महत्त्वाचे कारण आहे. 

या निकालाचा पाकिस्तानच्या राजकीय वातावरणावर नेमका कसा परिणाम होईल, हे सांगणे कठीण आहे. शरीफ यांना आता पंतप्रधान बनणे शक्‍य नसले; तरी शरीफ कुटूंबाचा राजकीय प्रभाव इतक्‍या सहजासहजी संपणारा नाही. यामुळेच पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत शरीफ यांच्या राजकीय पक्षाने थेट यश मिळविल्यास आश्‍चर्य वाटण्याचेही फारसे कारण नाही! अर्थात, पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता हे आव्हान पर्वतप्राय असेल. शरीफ यांच्याविरोधातील या निकालाचे कारण पक्षाकडून "मुलकी प्रशासनाचे लष्करावर वर्चस्व रहावे, यासाठी शरीफ यांनी केलेले प्रयत्न,' असे देण्यात आले आहे. शरीफ व पाकिस्तानी लष्करात गेल्या दोन-तीन वर्षांत वारंवार उद्‌भविलेल्या संघर्षाकडे पाहता या दाव्यात तथ्य आहे, असेच म्हणावे लागेल. परंतु, पक्षावर शरीफ यांची चांगलीच पकड असल्याने या निकालामुळे पक्ष एकदम कोसळून बेदिली माजणार नाही. पाकिस्तानच्या रक्तरंजित राजकारणात शरीफ कुटूंबाने गेली 35 वर्षे या ना त्या मार्गाचा अंवलंब करत यशस्वी तग धरला आहे. पंजाबमधील स्थानिक राजकारणात या प्रभावशाली कुटूंबाची पाळेमुळे पसरली आहेत. यामुळेच शरीफ यांना बसलेल्या एकाच फटक्‍याने पाकिस्तानमध्ये अचानक अस्थिरता उत्पन्न होईल, अशी परिस्थिती नाही. 

पाकिस्तानमध्ये या निकालामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. पाकिस्तानी लष्कराची भूमिका, देशातील अस्थिर राजकारण, जागतिक राजकारणातील पाकिस्तानचे संवेदनशील स्थान, दहशतवाद व पाकमधील इस्लामिस्टसअशा अनेक घटकांमुळे पाकचे देशांतर्गत राजकारण जटिल झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर "गॉडफादर' शरीफ यांना न्यायलयाच्या निकालाचा हा फटका बसला आहे. मात्र शरीफ यांचे आत्तापर्यंतचे राजकारण पाहता ते या निकालामुळे "संपतील' अशी कोणतीही शक्‍यता नाही. शरीफ हे अर्थातच कसलेले राजकारणी आहेत. यामुळेच देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याचा शर्थीचा प्रयत्न ते करतील, यातही काहीही शंका नाही. आणि भारताच्या दृष्टिकोनामधूनही शरीफ हे पाकच्या राजकारणात सक्रिय असणे, महत्त्वाचे आहे... 

(साप्ताहिक सकाळच्या सौजन्याने) 

Web Title: yogesh parale nawaz sharif pakistan politics