सप्लिमेंटरी परीक्षा तुम्ही समर्थपणे देऊ शकता

exam.
exam.

मागच्या परीक्षेत जी चूक केली होती, तीच चूक याही परीक्षेत केली. खूप उशिरा अभ्यास सुरू केला. त्यामुळे सर्व विषय निघतील याची खात्री वाटत नाही. परीक्षा जवळ आली तरी अभ्यासच करावासा वाटत नाही. अशा तक्रारी घेऊन अनेक विद्यार्थी मला भेटतात. त्यांचा कॉन्फिडन्स निघून गेलेला असतो. नैराश्‍य आलेले असते. अभ्यासात मन लागत नाही. आता काय करायचे याचे कन्फ्युजन मनात असते. पण, जर ठरवले तर यातून बाहेर पडणे सहज शक्‍य आहे.
सर्वांत प्रथम आपल्या मनात सकारात्मक विचार पेरा. मी अभ्यास करू शकतो. जे मी वाचतो आहे, ते सर्व माझ्या लक्षात राहू शकते. हिंदी सिनेमा जसा लक्षात राहतो, तसाच अभ्यासदेखील लक्षात राहील. माझी स्मरणशक्ती चांगली आहे, यासारखे सकारात्मक विचार स्वतःच्या मनात पेरलेत तर हिंमत वाढेल. काही करण्याची जिद्द मनात तयार होईल.
त्यानंतर एक कागद आणि पेन घेऊन आपले अभ्यासाचे प्लॅनिंग तयार करा. पेपर्स कोणत्या तारखांना आहेत. प्रत्येक विषयाच्या अभ्यासाला किती दिवस मिळतात ते लिहून काढा. समजा एका पेपरसाठी तुम्हाला सात दिवसांची गॅप मिळाली व तुम्हाला पाच युनिट्‌सचा अभ्यास करायचा आहे तर प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे पाच दिवसांत पाच युनिट्‌स पूर्ण करण्याचे टार्गेट ठरवा. उरलेल्या दोन दिवसांत रिव्हिजन करा व जुने पेपर्स हाती घेऊन त्यातल्या प्रश्नांची उत्तरे आठवून बघा. जे आठवते, त्याचा प्रश्नच नाही. पण जे आठवत नाही, त्या गोष्टी पुन्हा एकदा अभ्यासा.
पाठ करणे ही पद्धत इतक्‍या घाईत काहीच उपयोगाची नसते. त्याऐवजी समजून घेण्यावर जास्त भर द्या. एकदा नीट समजून घेतले की परीक्षेच्या वेळेवर सहज आठवते. नियमित दिवसातून दोनदा रिलॅक्‍सेशन करा. ते कसे करायचे माहिती नसेल तर पाच मिनिटे डोळे बंद करून बसा व स्वतःच्या श्‍वासावर लक्ष केंद्रित करा. ही पद्धत वापरून तुम्ही आपली एकाग्रता, स्टॅमिना, ग्रास्पिंग पॉवर वाढवू शकता. त्यामुळे दीर्घकाळ अभ्यास करू शकता.
ज्यावेळी तुम्ही अभ्यास करीत नसाल, त्यावेळी, उदा. जेवताना, अंघोळ करताना, झोपताना, आपण दिवसभरात काय वाचले, ते मनातल्या मनात आठवून बघा. या पद्धतीची रिव्हिजन खूप फायद्याची असते.
दोन, तीन मित्र एकत्र बसून अभ्यास करा. त्यामध्ये एकमेकांच्या अडीअडचणी सोडवण्यास खूप चांगली मदत मिळते. एकमेकांना जास्त चांगला अभ्यास करण्यासाठी मोटिव्हेट करता येते. जास्त वेळ बसून अभ्यास करण्याचा उत्साह वाढतो. एकमेकांना हिंमत देता येते.
सकारात्मक विचार, प्लॅनिंग, रिलॅक्‍सेशन रिव्हिजन व ग्रुप स्टडी या पद्धती वापरून कमी वेळात आपला परफॉर्मन्स आपल्याला खूप चांगला वाढवता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com