

What Do Young People Read
esakal
प्रणव सखदेव- sakhadeopranav@gmail.com
आजचे तरुण काय वाचतात? या प्रश्नाचं तत्काळ दिलेलं माझं उत्तर आहे – आजचे तरुण पाहतात. तंत्रज्ञान क्रांती, माहितीची विस्फोट आणि मोबाइल क्रांती झाल्यानंतरच्या काळात तरुणांची ही पिढी सिनेमे, व्हिडिओ, वेबसिरीज पाहते तशीच कोणत्याही फॉरमॅटमधली पुस्तकंही ‘पाहते’च.
नमस्कार, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्यानिमित्ताने वाचन प्रेरणा दिन असतो बघा. म्हणून आम्ही आमच्या कॉलेजात एक परिसंवाद ठेवलाय. विषय आहे, आजचे तरुण काय वाचतात? तुम्ही सहभागी व्हावं अशी इच्छा आहे,’ फोनवरून एका प्राध्यापकाने विचारलं.
विविध साहित्य संमेलनं, साहित्यिक उत्सव इत्यादींत एक ‘टोकन’ म्हणून एखादा तरी असा कार्यक्रम असतो. (आता जेन झी चलतीत आहे). मी तत्काळ उत्तरलो, ‘अहो, मी चाळिशीला आलो आता!’
तसे प्राध्यापक म्हणाले, ‘म्हणजे तरुणच की तुम्ही!’ मी मनातल्या मनात म्हटलं, मराठी साहित्याचं सरासरी वय काढलं तर ते साधारण सत्तर भरेल! मग बरोबरच!
…तर असा प्रश्न कुठेही आला किंवा दिसला की मला आठवतं, मी आठवीत असताना मला कविता, साहित्य वगैरेची गोडी लागली. मी लिहू लागलो, तेव्हा मला माझ्या मामाने, राजीव जोशींनी कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या काही शे वर्षं जुन्या वास्तूत नेलं होतं. मी कितीतरी वेळ अवाक होऊन पाहतच राहिलो. इतका प्रचंड पुस्तक-साठा तिथे होता, आहे. आयुष्यात प्रथमच इतकी पुस्तकं पाहत असल्याने मी अचंबित झालो होतो. आणि नंतर तिथे नियमित जाणं सुरू झालं. कविता लिहीत असल्याने मी सुरुवात कवितासंग्रहापासून केली, त्यात पहिले वाचले मर्ढेकर! नंतर थोडं गद्य वाचायची गोडी लागली ती प्रवीण दवणे यांच्या वृत्तपत्रीय सदरामुळे. ते मला तेव्हा फार रिलेट झालं आणि इंग्रजीचं दोनशे पानी पुस्तक वाचायचा आत्मविश्वास दिला तो चेतन भगतने. नंतर तो आवडेनासा, पटेनासा झाला, पण इंग्रजी साहित्याचं प्रचंड जग त्याच्यामुळे खुलं झालं याचं श्रेय मी त्यालाच देतो.