प्रशासन म्हणे, अभिजित बिचुकलेंची मतदार नाेंदणीच नव्हती

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 2 December 2020

मतदारयादीतून नावेच गायब होत असतील तर योग्य नाही. निवडणूक झाल्यानंतर मी ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे असे अभिजित बिचुकलेंनी नमूद केले हाेते.
 

सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज साताऱ्यातील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले अपक्ष उमेदवार "बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले यांचे मतदार यादीत नावच नसल्याने त्यांना मतदानापासून अधिकाऱ्यांनी रोखले. त्यामुळे संतप्त होत त्यांनी जिल्हा प्रशासनासह पक्षांवर ताशेरे ओढले; पण जिल्हा प्रशासनाने मतदार यादीची पडताळणी केली असता बिचुकलेंनी मतदार नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले आहे.
 
साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले हे पत्नी अलंकृता बिचुकले यांच्यासोबत आले होते. ते पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत; पण त्यांचे मतदार यादीत नावच नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी जिल्हा प्रशासनासह सत्ताधारी व विरोधी भाजपच्या नेत्यांवर ताशेरे ओढले. 

ते म्हणाले, ""गेली 36 वर्षे ज्यांच्याकडे हा मतदारसंघ होता, त्यांनीच माझे नाव मतदार यादीतून गायब केले आहे. मी उमेदवार असून, उमेदवारांच्या यादीत 14 व्या क्रमांकावर माझे नाव आहे; पण मतदारयादीत नाव नाही. यामध्ये कोणाचे तरी षड्‌यंत्र असू शकते.'' मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाविरोधात तुम्ही निवडणूक लढली आहे. त्यामुळे शिवसेनेला तुमच्या उमेदवारीची भीती वाटली काय, या प्रश्नावर ते म्हणाले, ""शिवसेनेचा उमेदवार नाही. त्यांची युती आहे. ते सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांना मलई खायची आहे, म्हणून ते एकत्र आले आहेत. मतदारयादीतून नावेच गायब होत असतील तर योग्य नाही. निवडणूक झाल्यानंतर मी ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे.''

कोयना धरणावरील महाकाय अजगराचा युवकांनी वाचविला जीव
 
याबाबतचा बिचुकलेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साताऱ्याच्या तहसीलदारांनी तातडीने दखल घेत पडताळणी केली. मतदार यादी 30 डिसेंबर 2019 ला प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच पुरवणी यादीही प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये नाव नसल्याबाबत बिचुकले यांनी कोणतीच हरकत घेतलेली नाही. मतदानाच्या दिवसापर्यंत बिचुकलेंनी मतदार यादीत त्यांचे नाव नसल्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या दुर्लक्षामुळेच मराठा समाजाचे नुकसान; मराठा महासंघाचा आराेप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijeet Bichukale Not Registered Name In Voter List Pune Graduate Election Satara News