वाळूच्या दंडापोटी जमीन होणार सरकारजमा; कऱ्हाड तहसील कार्यालयाची धडक कारवाई

हेमंत पवार
Saturday, 12 December 2020

कऱ्हाड तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. तो करताना अनेकदा अवैधरीत्या करण्यात येत असल्याचेही यापूर्वी करण्यात आलेल्या कारवायातून स्पष्ट झाले आहे. अशा अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या, साठा करणाऱ्या आणि अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांना तहसील कार्यालयाने दंड केला होता. अनेकांनी तो दंड भरलाच नाही.

कऱ्हाड (जि. सातारा) : अवैध वाळू उत्खनन, अवैधरीत्या वाळूचा साठा करणे आणि अवैधरीत्या वाळूची वाहतूक या प्रकरणी तालुक्‍यातील 18 जणांना 3 कोटी 13 लाखांचा दंड करण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो न भरल्याने आता संबंधितांच्या सातबारावर बोजा चढवण्यात आला. त्यानंतरही दंड न भरल्याने आता ती बोजा चढवलेली जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित हवालदिल झाले आहेत. 

कऱ्हाड तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. तो करताना अनेकदा अवैधरीत्या करण्यात येत असल्याचेही यापूर्वी करण्यात आलेल्या कारवायातून स्पष्ट झाले आहे. अशा अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या, साठा करणाऱ्या आणि अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांना तहसील कार्यालयाने दंड केला होता. अनेकांनी तो दंड भरलाच नाही. त्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजाही चढवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांच्या सातबारावर संबंधित दंडाचा बोजा चढवल्यानंतरही त्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यांना आता ती जमीन सरकारजमा करण्याची नोटीस पाठवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्‍यातील पोतले, ओंड, ओंडोशी, कार्वे, शिरवडे येथील नऊ, मालखेड, नडशी येथील तीन, तर वारुंजी येथील एक अशा 18 जणांना 3 कोटी 13 लाख 68 हजार 912 रुपयांच्या वसुलीच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्यांनी दिलेल्या मुदतीत त्याची कार्यवाही न केल्यास संबंधितांच्या सातबारावरील बोजा कायम ठेऊन त्या जमिनी सरकारजमा करण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. 

साखर कारखान्यांना नोटीस बजावणार; जिल्हाधिकारी आक्रमक

कऱ्हाड तालुक्‍यातील 18 जणांना वाळूच्या दंडापोटी भरायच्या रकमेच्या नोटिसा पाठवल्या आहेत. संबंधितांनी मुदतीत कार्यवाही न केल्यास त्यांची जमीन सरकार जमा होणार आहे. संबंधितांनी त्याची नोंद घेऊन मुदतीत दंड भरावा. 
-अमरदीप वाकडे, तहसीलदार, कऱ्हाड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action Taken By Karad Tehsildar Office Against Sand Thieves Satara News