अभिनेते सयाजी शिंदे साताऱ्यात साकारणार पर्यावरणीय उद्यान

प्रशांत घाडगे
Tuesday, 26 January 2021

यामध्ये शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेत किती झाडांची लागवड केली, किती झाडे कशा प्रकारे जगवली आदींची माहिती घेऊन पुरस्कार देणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले. 

सातारा : शहरालगत असणाऱ्या पोलिस दलाच्या 30 एकर जागेवर सह्याद्री देवराई व पोलिस दलातर्फे "बायोडायव्हर्सिटी प्रकल्प' उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात जैवविविधता उद्यान, दुर्मिळ वनस्पती, शेततळी व इतर प्रेक्षणीय स्थळे साकारली जाणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, विजय निंबाळकर, बाळासाहेब ठक्कर आदी उपस्थित होते."पोलिस दलाच्या जागेवर पर्यावरणीय उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानात हर्बल गार्डन, बटरफ्लाय गार्डन, देशी वनस्पतींची लागवड, विविध राज्यांचे वृक्ष, दुर्मिळ वनस्पतींची लागवड, 35 गवतांच्या विविध प्रजाती, शेततळी, दगडी बंधारे, पाझर तलाव बांधण्यात येणार आहेत. याचबरोबर सातारा परिसरात आढळणाऱ्या बहुतांश वनस्पतींची लागवड करत विशेष प्रकल्प साकारणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या हेतूने उद्यानाची निर्मिती केली जाणार असून, देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प उभा करणार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात क्रेडाई संस्थेचेही सहकार्य मिळणार आहे. येत्या सहा महिन्यांत जागेची प्रक्रिया पूर्ण होऊन उद्यानाचे काम सुरू होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषाने दुमदुमला मालवणचा किनारा
 
श्री. पाटील म्हणाले,"" सातारा जिल्हा निसर्गसंपन्न व वैविध्यपूर्ण संपन्नतेने नटलेला आहे. पोलिस दलाच्या वतीने झाडांचे रोपण आणि संवर्धन करण्यात येणार आहे. तसेच पोलिस दलाची मैदाने हरित केली जाणार आहेत.'' 

दुसरे वृक्ष संमेलन साताऱ्यात 

पर्यावरणाचे संर्वधन करणारे समविचारी लोक एकाच व्यासपीठावर येऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्यासाठी ऑक्‍टोबर महिन्यात साताऱ्यात दुसरे वृक्ष संमेलन होणार आहे. या माध्यमातून दहा निसर्ग राजा आणि दहा निसर्ग राणी पुरस्कारांची निवड होणार असून, पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेत किती झाडांची लागवड केली, किती झाडे कशा प्रकारे जगवली आदींची माहिती घेऊन पुरस्कार देणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sayaji Shinde Decleares Biodiversity Project In Satara Trending News