'शिवविचार' खरंच आपण अंमलात आणतो का? : अश्विनी महांगडे

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 10 September 2020

समाजात तळागाळात जाऊन काम करीत असताना बहुतांश महिला "कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ नियम २००६" या कायद्याबद्दल अनभिज्ञ असल्याचे आढळून येतेय. या संरक्षण कायद्याची परिपूर्ण माहिती देणेकामी प्रतिष्ठानने आजवर अनेक शिबिरांचे आयोजन ही केले आहे. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे सदस्य हे पत्र त्यांच्या जवळच्या पोलीस स्थानकात देत असल्याचे अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितले.

सातारा : 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान' हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून सातत्याने महिलांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी, माहवारी शाप की वरदान, सॅनिटरी नॅपकिनबद्दल माहिती पुरवणे, तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याबद्दल महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज व महिला बचत गटांसाठी प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी शिबिरांचे देखील आयोजन केले जात असल्याचे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

अभिनेत्री महांगडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून सुरक्षितता देणे, त्यांना घरात सुरक्षितता लाभावी व त्यांना बेघर केले जाऊ नये, तसेच महिलांच्या अधिकारांची कडक अंमलबजावणी व्हावी, ही काही महत्वाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठान काम करत आहे. पीडित महिला या आपल्या तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात जात असतात. अशा पीडित महिलांना मदतीचा हात देणे कामी समोपदेशन करण्यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सहकार्याने जिल्ह्यामधील प्रत्येक पोलीस ठाण्यात हे निवेदन देऊन प्रत्येक पीडित महिलेपर्यंत पोहचण्याचा मानस प्रतिष्ठानचा प्रयत्न असेल. 

प्राथमिक शिक्षकांच्या बदलीत गैरव्यवहार?; जिल्हा परिषदेत सभेत गदाराेळ

अधीक्षक सातपुते यांनीही प्रतिष्ठानच्या वतीने हे सुरू असलेल्या कामाबद्दल कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असते. मात्र, शिवविचार खरंच आपल्या रोजच्या जीवनात आपण अंमलात आणतो का?, हा प्रश्नच आहे. स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कारच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असून त्याची आठवण सर्वांनी ठेवली पाहिजे. महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा पीडित महिलांना या हिंसाचाराविरोधात लढण्याकामी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान वेळोवेळी मदत करीत आहेत व करीत राहीलच. 

उदयनराजेंचंच श्रेय, शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कार्यकर्त्यांचा दावा!

समाजात तळागाळात जाऊन काम करीत असताना बहुतांश महिला "कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ नियम २००६" या कायद्याबद्दल अनभिज्ञ असल्याचे आढळून येतेय. या संरक्षण कायद्याची परिपूर्ण माहिती देणेकामी प्रतिष्ठानने आजवर अनेक शिबिरांचे आयोजन ही केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा ते करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे सदस्य हे पत्र त्यांच्या जवळच्या पोलीस स्थानकात देत आहेत. महिलांना प्रतिष्ठानच्या वतीने करत असलेल्या या उपक्रमाचा फायदा होईल, अशी अशा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी पत्रकाव्दारे व्यक्त केली. दरम्यान, याबाबत सातारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांची भेट घेऊन पत्र देऊन विनंती केली असल्याचेही अभिनेत्री महांगडे यांनी शेवटी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Ashwini Mahangade meets Superintendent Of Police Tejaswi Satpute Satara news