मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे हस्तांतरण रखडले; साता-यातील प्रवेशप्रक्रिया लांबणीवर

उमेश बांबरे
Friday, 30 October 2020

कोरोना काळात राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पडल्याने आता सातारा मेडिकल कॉलेजच्या प्रश्‍नाकडे थोडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार या अडखळलेल्या प्रक्रियेला पुन्हा गती देण्यासाठी कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा : मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटलेला असला आणि जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात मिळालेली असूनही या जागेवरील पाटबंधारे विभागाची कार्यालये दुसऱ्या जागेत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया अडखळली आहे. त्यासाठी 70 कोटींचा निधी आवश्‍यक असून, त्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आलेली आहे. सध्या कोविडमुळे निधीची कमतरता असल्यामुळे ही कार्यालये शासनाच्या दुसऱ्या जागेत स्थलांतरित करण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुढील वर्षी मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षीची प्रवेशप्रक्रिया तूर्तास तरी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. 

सातारा मेडिकल कॉलेजसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतर प्रक्रिया वेगाने सुरू झाली. 800 कोटींचा आराखडा तयार झाला. त्यामुळे नवीन वर्षात सातारा मेडिकल कॉलेजची पहिल्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया होईल, अशी आशा सातारकरांना होती. पण, आता या प्रक्रियेला "ब्रेक" लागला आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात समन्वयाचा अभाव दिसू लागला असून, कृष्णा खोऱ्याची 60 एकर जागा हस्तांतरित केल्यानंतर या जागेवरील कृष्णा खोऱ्याची विविध कार्यालये व इतर वास्तूंचे दुसऱ्या शासकीय जागेत स्थलांतरण करून पाटबंधारे विभागाला हवे आहे. त्यासाठी तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी वैद्यकीय शिक्षण विभागाने देऊन त्यावर पाटबंधारे विभागाची सध्याच्या जागेतील कार्यालये नवीन जागेत तयार करून द्यायची आहेत. त्यासाठी या दोन्ही विभागात समन्वयाचा अभाव जाणवू लागला आहे. प्रत्येक बैठकीत शासकीय घोडे नाचविले जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जागा ताब्यात मिळूनही पुढची प्रक्रिया आता अडखळल्याचे चित्र आहे.

सातारकरांना खुशखबर! व्यायामशाळा, खासगी इन्स्टिट्यूटला परवानगी 

सातारा जिल्ह्यावर खासदार शरद पवार यांचे प्रेम आहे. त्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही तितकेच प्रेम आहे. यातूनच त्यांनी बारामतीच्या धर्तीवर साताऱ्यात सुमारे 800 कोटींचा आराखडा असलेले मेडिकल कॉलेज मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 60 एकर जागा हस्तांतरित झाली. आता या जागेवरील पाटबंधारे विभागाच्या विविध कार्यालयांचे स्थलांतरण करून त्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यामुळे या जागेवरील बांधकामे अद्याप हटविलेली नाहीत. जागा मोकळी करून दिल्यानंतर बांधकाम विभागाकडून या जागेसह इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाईल. त्यामध्ये चांगल्या इमारती वैद्यकीय शिक्षण विभाग विविध कारणांसाठी वापरू शकणार आहे. उर्वरित इमारती पाडून जागा मोकळी केली जाईल. त्यानंतर मेडिकल कॉलेजची मुख्य इमारत, वसतिगृह, लेक्‍चर हॉल, प्रयोगशाळा आदींची प्लॅनप्रमाणे आखणी होणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला कालावधी लागणार असल्याने पुढील वर्षी सातारा मेडिकल कॉलेजची प्रवेशप्रक्रिया होण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. याला कोरोनाचीही झालर असल्याचे दिसत आहे. 

अजित पवार देणार गती? 

कोरोना काळात राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पडल्याने आता सातारा मेडिकल कॉलेजच्या प्रश्‍नाकडे थोडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार या अडखळलेल्या प्रक्रियेला पुन्हा गती देण्यासाठी कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महसूल, पाटबंधारे व वैद्यकीय शिक्षण विभागातील समन्वयचा अभाव दूर करून मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या प्रवेशाची प्रक्रिया करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission Process Stuck Of Medical College From Academic Year 2021-2022 Satara News