Satara : थॅलेसिमियाच्या औषधांसाठी परवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

Satara : थॅलेसिमियाच्या औषधांसाठी परवड

सातारा : येथील जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून औषधांचा पुरवठा नसल्यामुळे पाच ते सहा जिल्ह्यांतील थॅलेसिमिया आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची परवड सुरू आहे. जिल्ह्याबरोबरच बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांचा हेलपाटा होत असून शासनाच्या दुर्लक्षामुळे या रुग्णांच्या पालकांना बाहेरून औषधे खरेदी करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

थॅलेसिमिया आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना जगवण्यासाठी वारंवार रक्त चढवावे लागते. त्यामुळे दरवेळचे रक्त भरण्यासाठी या रुग्णांची आधीच ससेहोलपट होत आहे. या रुग्णांना चढविण्यात येणाऱ्या रक्ताचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. परंतु, औषधांचा प्रश्न गेल्या काही महिन्यांत गंभीर बनला आहे. या रुग्णांना बाहेर रक्त चढवावे लागते. परंतु, या रक्तामुळे जसे या रुग्णांना जीवन मिळते, तसेच काही समस्याही निर्माण होत असतात.

या बाहेरून चढवलेल्या रक्तातील लोह थॅलेसिमिया आजाराने ग्रासलेल्या रुग्णाच्या शरीरात वाढत असते. हे लोह जास्त प्रमाणात वाढल्यास संबंधित रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हा लोह वाढल्यामुळे निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी या रुग्णांना Desirox, Defrijet ही औषधे रोज न चुकता घ्यावीच लागतात. त्यामुळे लोहाचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते.

या रुग्णांच्या पालकांची परिस्‍थिती व सातत्यपूर्ण रक्त व औषधांसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करून शासनाकडून या रुग्णांना ही औषधे मोफत देण्यात येतात. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील थॅलेसिमियाची औषधे संपली आहेत. सातारा हे आसपासच्या जिल्ह्यातील थॅलेसिमिया आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी एक महत्त्‍वाचे केंद्र आहे. त्यामुळे फक्त साताराच नव्हे, तर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेळगाव, निपाणी आदी ठिकाणचे शेकडो थॅलेसिमिया आजाराने ग्रासलेले रुग्ण औषधे घेण्यासाठी येथील जिल्हा रुग्णालयात येतात. परंतु, औषधे संपल्यामुळे या रुग्णांना हेलपाटा मारावा लागत आहे.

त्याचबरोबर रुग्णांच्या पालकांना ही औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. Defrijet ५०० mg. च्या एका गोळीची किंमत ४० रुपये आहे. रुग्णाचे वय व शरीरातील लोह प्रमाणानुसार या गोळ्यांचा ५००, १०००, २००० mg. असे डोस ठरवलेले असतात. त्यामुळे एखाद्या रुग्णाला १००० mg. औषधाचा डोस असेल, तर पालकांना रुग्णाची औषधे विकत आणण्यासाठी दोन हजार ४०० रुपये खर्च करावे लागत आहेत. याबाबत संघटनांच्या माध्यमातून अनेकदा आवाज उठविण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाकडूनही अनेकदा शासनाकडे औषधांसदर्भात पत्रव्यवहार केला आहे. परंतु, शासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे थॅलेसिमिया रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना यातना सोसाव्या लागत आहेत.

शंभूराज देसाई लक्ष घालतील?

जिल्हा रुग्णालयातील थॅलेसिमिया आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची औषधे संपल्यामुळे केवळ साताराच नाहीत तर, लगतच्या जिल्ह्याबरोबरच मुंबईतील रुग्णांचीही परवड होत आहे. नागरिकांच्या अडचणी सोडविणे, हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे. त्यातही आरोग्याच्या समस्येवर वेळेत मार्ग निघणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या रुग्णांचा हा त्रास थांबविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वैयक्‍तिक लक्ष घालून तातडीने मार्ग काढणे आवश्यक आहे.

टॅग्स :SataraHospital