माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करा : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम

रुपेश कदम
Tuesday, 20 October 2020

पीक कर्जाबाबत असलेल्या तक्रारीबाबत श्री. कदम यांनी कुठलाही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहता कामा नये. कर्जमाफीमध्ये असो नसो, असे स्पष्ट निर्देश सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.

दहिवडी (जि. सातारा) : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत चार ते पाच दिवसांत पंचनामे संपवा. माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करावेत. पंचनाम्याबद्दल एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्य सरकार कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासाही त्यांनी दिला.
 
राज्यमंत्री कदम यांनी माणमधील देवापूर, पळसावडे येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. माण-खटाव तालुक्‍यांचा एकत्रित आढावा दहिवडी येथील तहसील कार्यालयात घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रशेखर सानप, प्रभारी तहसीलदार श्रीकांत शिर्के, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, नगराध्यक्ष धनाजी जाधव, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, मनोज पोळ, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री कदम म्हणाले, ""पंचनामे करताना शासनाच्या निर्देशाचे पालन झाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालीच पाहिजे.'' पीक कर्जाबाबत असलेल्या तक्रारीबाबत श्री. कदम यांनी कुठलाही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहता कामा नये. कर्जमाफीमध्ये असो नसो, असे स्पष्ट निर्देश सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.

कार्यकर्तृत्वाचे सीमोल्लंघन : घरी शिवणकाम करणाऱ्या महिलेने उभारली स्वतःची टेक्स्टाईल फॅक्टरी
 
आमदार गोरे म्हणाले, ""ऊस आडवा पडला आहे. कांदा वर चांगला दिसत असला तरी तो खालून संपला आहे. त्यामुळे पिकांचे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. विमा कंपन्यांचे नियम किचकट आहेत. 72 तासांत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.'' 
प्रभाकर देशमुख म्हणाले, ""विम्याची कागदपत्रे संबंधित ठिकाणी पोचली, की नाही याची खात्री करा. अनेक ठिकाणी पिकं गेलीत; पण जमिनीही वाहून गेल्या आहेत, याची पंचनामे करताना दखल घ्यावी.'' प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी माण व खटाव तालुक्‍यांचा आढावा दिला. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agirculture Minister Vishwajeet Kadam Visit Farms Satara News