मंदिरं बंद ठेवल्याने पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ; गुरव समाज आक्रमक

उमेश बांबरे
Thursday, 1 October 2020

कोरोना काळात गुरव समाजाला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यासाठी गुरव समाजाने आझाद मैदानावर तीन वेळा आंदोलन केले. अनेकदा निवेदनेही दिली. मात्र, कोणत्याही सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जीव धोक्‍यात घालून रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही.

सातारा : कोरोना महामारीत मंदिरे बंद ठेवल्याने पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गुरव समाजाला अर्थसहाय्य करावे, इनाम वर्ग तीनच्या जमिनीवर पीक कर्ज मिळावे, अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृहासाठी जागा व निधी मिळावा आदी मागण्यांसाठी अखिल गुरव समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मागण्या मान्य केल्या तरच आम्ही सरकारच्या पाठीशी राहू, असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी साखरे यांनी दिला आहे. 

गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी साखरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यानिवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात गुरव समाजाला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यासाठी गुरव समाजाने आझाद मैदानावर तीन वेळा आंदोलन केले. अनेकदा निवेदनेही दिली. मात्र, कोणत्याही सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जीव धोक्‍यात घालून रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही. 

ग्राहकांकडून सक्तीने कर्ज वसुली केल्यास कारवाई : जिल्हाधिकारी शेखर सिंह

कोरोनाच्या काळात मंदिरे बंद असल्याने पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शासनाने राज्यातील गुरव समाजाला अर्थसहाय्य करावे. तसेच इनाम वर्ग तीन जमिनी कसणाऱ्यांना अतिवष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या जमिनीवर पीक कर्ज मिळावे, इनाम वर्ग तीन खालसा करून बेकायदेशीर हस्तांतरण व कुळ कायदा काढून मूळ सनद धारकांना द्यावी, परंपरागत पूजा व उत्पन्नाचा हक्क कायम ठेवावा, समाजातील युवक-युवती व महिलांना उद्योग उभारणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृहासाठी जागा व निधी उपलब्ध करून द्यावे. सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये गुरव समाजाला 50 टक्के प्रतिनिधीत्व मिळावे. गुरव समाजाच्या संरक्षणासाठी ऍट्रासिटी ऍक्‍ट सारखा कायदा लागू करावा. 60 वर्षे वयोगटावरील पुजाऱ्यांना निर्वाह भत्ता मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या तरच गुरव समाज आपल्या पाठीशी राहिल, असा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation In Front Of The District Collector's Office Of Gurav Samaj Sanghatana At Satara