साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी गडचिरोलीचे अजयकुमार बन्सल

गिरीश चव्हाण
Wednesday, 7 October 2020

गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या बदलीच्या चर्चांना वेग आला होता. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच तेजस्वी सातपुते यांची बुधवारी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली, तर त्यांच्या जागी अजयकुमार बन्सल यांची नव्याने नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सातारा : सातारा पोलिस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची तर सातारा पोलिस अधीक्षकपदी कार्यरत असणाऱ्या तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीण येथे बुधवारी बदली करण्यात आली. याबाबतचे आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी जाहीर केले आहेत. 

सातारा पोलिस दलाच्या अधीक्षकपदाची सूत्रे सुमारे दिड वर्षांपूर्वी तेजस्वी सातपुते यांनी स्वीकारली होती. पदभार स्वीकारल्यानंतर तेजस्वी सातपुते यांनी पोलिस दलासह कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाचा आराखडा तयार केला. यानुसार त्यांनी सातारा पोलिस दलाचा नावलौकिक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले. मीरा बोरवण्णकर यांच्यानंतर सातारा पोलिस दलाची सूत्रे स्वीकारणाऱ्या तेजस्वी सातपुते या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. अधीक्षकपदी कार्यरत असताना सातपुते यांनी उंब्रज आणि पाटण पोलिस ठाण्याचे विभाजन केले. 

विनय गौडांनी स्वीकारली सीईओपदाची सूत्रे

या विभाजनामुळे पाटण तालुक्‍यात मल्हार पेठ हे नवीन पोलिस ठाणे अस्तित्वात आले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाउनमध्ये सातारा पोलिसांच्या मदतीने तेजस्वी सातपुते यांनी विविध उपक्रम राबवले. या काळात महामार्गावर अडकलेल्या हजारो ट्रकचालकांनी त्यांनी महामार्गावरील पोलिस ठाण्यांच्या मदतीने काही दिवस जेवण पुरविले होते. त्यांच्या या उपक्रमाची राज्यभरात चर्चा झाली होती. पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त करताना कोरोनाबाधित होवू लागल्यानंतर तेजस्वी सातपुते यांनी पोलीस परेड ग्राउंड येथे पोलिस दलासाठीचे स्वतंत्र हॉस्पिटल अल्पावधीत उभारले. त्यांच्या या कामाची दाखल सुध्दा राज्य शासनाने घेतली होती. 

पृथ्वीराज चव्हाणांचे मोदी सरकारला खुले आव्हान!

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीच्या चर्चांना वेग आला होता. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच तेजस्वी सातपुते यांनी बुधवारी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली. त्यांच्या जागी आलेले अजयकुमार बन्सल यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. बन्सल हे यापूर्वी गडचिरोली येथे कार्यरत होते. याठिकाणाहून बदली झाल्यानंतर नवीन नियुक्‍तीसाठी बन्सल हे प्रतिक्षायादीवर होते. त्यांची प्रतीक्षा संपवत गृहविभागाने त्यांच्याकडे सातारा पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajaykumar Bansal Appointed As Superintendent Of Police Satara