बन्सल साहेब! ग्रामपंचायत निवडणुका आल्यात, पोलिसिंगची विस्कटलेली घडी सावरा

बन्सल साहेब! ग्रामपंचायत निवडणुका आल्यात, पोलिसिंगची विस्कटलेली घडी सावरा
Updated on

सातारा : कोरोना संसर्गाच्या लढाईतून जिल्हा सावरत असताना दररोज घडणाऱ्या खून व चोऱ्यांच्या प्रकारामुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला तडे जात आहेत. सर्रास सुरू झालेल्या खुनी हल्ल्यांच्या प्रकारांमुळे गुन्हे करणाऱ्यांना जिल्ह्यात कायद्याचा धाक वाटतो की नाही, असा प्रश्‍न त्यामुळे निर्माण होत आहे. जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचा वचक निर्माण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पोलिस दलाच्या एकंदर कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
 
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये मार्चपासून लॉकडाउन जाहीर झाले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मूळ प्रश्‍न हाताळणारी पोलिस यंत्रणा वेगळ्याच कामात गुंतली गेली. नागरिकांना रस्त्यावर फिरू न देणे, जिल्हा बंदीमध्ये विनापरवाना प्रवास करणाऱ्यांवर अंकुश बसवणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणाऱ्यांवर कारवाई करणे, जिल्हाधिकाऱ्यांनी नेमूण दिलेल्या वेळे व्यतिरिक्त आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करणे, मास्क न लावता फिरणाऱ्यांना दंड करणे या कामातच गेल्या आठ महिन्यांत पोलिस यंत्रणा गुंतली होती. कोरोनाचा संसर्ग नागरिकांना होऊ नये, त्याचबरोबर स्वत:चीही काळजी घ्यायची या दुहेरी भूमिकेत पोलिसिंगच्या मूळ कामाकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे. 
कोरोना संसर्गाच्या सुरवातीच्या काळामध्ये नागरिकांवरही बंधणे होती. संसर्गाची भीतीही होती. त्यामुळे लोकांचे बाहेर पडण्याबरोबर बऱ्याच गोष्टींची प्राथमिकता बदलली होती. त्यामुळे या कालावधीत गुन्हेगारीचा दरही कमी झाला होता. चोऱ्या, मारामाऱ्या किरकोळ प्रमाणात होत होत्या. मात्र, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत चालल्याने प्रशासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर जनजीवन पूर्ववत होण्यास सुरवात झाली आहे. त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात झाली. जिल्ह्यातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या तालुक्‍यात दररोज चोऱ्या होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेची हानी होत आहे. चेन स्नॅचिंगचे प्रकारही पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामध्ये महिलेला धक्का देण्याचे प्रकारही समोर आले. त्यामुळे चोऱ्यांचे हे प्रकार नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांत हे प्रकार अधिक तीव्र होत चालले आहेत. जिल्ह्यातील खून सत्र व त्यातील भयानकतेने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण केली आहे.

गोंदवलेकर पुण्यतिथी घरीच करा; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर समाधी मंदिर समितीचे आवाहन
 
कोरोना संसर्गाच्या कालावधीत पोलिसिंग शिथिल झाले आहे हे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मान्यच करावे लागणार आहे. त्यातच त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याही महिनाभर लांबल्या. या सर्वांचा परिणाम पोलिसांच्या जनमानसात आवश्‍यक असलेल्या भीतीवर झालेला दिसत आहे. त्यामुळे एखाद्याचा खून करायला अगदी अल्पवयीन मुलेही भीती नसल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्याच्या एकंदर कायदा व सुव्यवस्थेसाठी सध्या समोर येत असलेले प्रकार नक्कीच भीतीदायक आहेत. त्यामुळे कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेला तडा जात आहे. 

आता ग्रामपंचायत निवडणुकांचे घुमशान 

दरम्यान, आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने गावागावांतही घुमशान होणार आहे. अशा परिस्थितीत पोलिसांना अधिक जबाबादारीने आपले काम पार पाडावे लागणार आहे. पोलिसिंगची विस्कटलेली घडी सावरण्याचे आव्हान पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासमोर आहे. त्यासाठी त्यांना प्रभारी अधिकाऱ्यांसह सर्वांना कामाला लावावे लागणार आहे.

पालकांनाे! शिक्षणाधिकारी म्हणतात, प्राथमिक शाळा सुरु करण्याचा आदेशच नाही

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com