
एफआरपीनुसार होणारी संपूर्ण रक्कम वेळेत देणारा अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे. मागील वर्षीसुद्धा एफआरपीनुसार कारखान्याने संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली होती. त्यामुळे राज्याच्या साखर आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे कारखान्याचे कौतुक केले होते.
सातारा : शेतकऱ्याने पिकवलेल्या ऊसाला उच्चतम दर देतानाच कोरोनासारख्या महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना धावला आहे. या हंगामातील तिसरा हप्ता प्रतिटन 140 रुपये प्रमाणे आज शेतकरी सभासदांच्या खात्यावर जमा केले आहेत. काटकसर, सुयोग्य आर्थिक नियोजनामुळे कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाची एफआरपीनुसार सर्व रक्कम अदा केली आहे. संपूर्ण एफआरपी देणारा अजिंक्यतारा कारखाना सातारा जिल्ह्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.
अजिंक्यतारा कारखान्याने या हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला 2790 रुपये प्रतिटन ऊसदर दिला आहे. कारखान्याने या हंगामात सहा लाख 12 हजार 917 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 12.84 टक्के अशा विक्रमी साखर उताऱ्याने सात लाख 70 हजार 450 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
गाळपास आलेल्या उसाला 2500 रुपये प्रतिटन पहिला आणि त्यानंतर 150 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता वेळेत अदा केला. कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम केले. आता पावसाळा सुरु झाला असून शेतीची कामे सुरु झाली आहेत. मशागत, बी-बियाणे, खते, औषधे आदी खरेदीसाठी शेतकरी नेहमीच कारखान्याच्या बिलावर अवलंबून असतो. एकीकडे कोरोनाचे संकट आणि त्यामुळे झालेली आर्थिक मंदी या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला अजिंक्यतारा कारखान्याने सावरण्याचे काम केले आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई आणि संचालक मंडळाने योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून गाळपास आलेल्या सहा लाख 12 हजार 917 मेट्रिक टन उसाची एफआरपीतील उर्वरित रक्कम म्हणजेच 140 रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण आठ कोटी 58 लाख आठ हजार 621 रुपये रक्कम आज संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे.
या हंगामाची एफआरपीनुसार होणारी संपूर्ण रक्कम वेळेत देणारा अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे. मागील वर्षीसुद्धा एफआरपीनुसार कारखान्याने संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली होती. त्यामुळे राज्याच्या साखर आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे कारखान्याचे कौतुक केले होते. यंदाही कारखान्याने वेळेत संपूर्ण पेमेंट अदा करण्याची परंपरा कायम राखली आहे. कारखान्याने सभासदांचे कोरोना पासून रक्षण व्हावे यासाठी सवलतीच्या दरात हॅन्ड सॅनिटायझर पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनापासून स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन, शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.