
सातारा : मराठी साम्राज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला हा मानबिंदू आहे. हा मानबिंदू संवर्धन आणि संगोपनाचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले असून, यासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार येथील किल्ला आणि परिसराचे सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी ११० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, उपलब्ध निधीतून किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याचे पालिकेच्या मार्फतीने नुकतेच मजबुतीकरण करण्यात आले. या कामादरम्यान रस्त्याकडेला तयार केलेल्या संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण आगामी काळात पालिकेकडून होणार आहे. या कामादरम्यान संपूर्ण संरक्षक भिंतीवर विविध प्रकारची चित्रे रेखाटण्यात येणार असून, यासाठीची तांत्रिक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामुळे येथून जाताना नागरिक, पर्यटकांना वेगळी अनुभूती अनुभवयास मिळणार आहे.