
Ajit Pawar : अजित पवारांच्या कार्यक्रमाला हजार लोकही नव्हते, नैराश्यातून...; शंभूराज देसाईंची टीका
सातारा : पालकमंत्र्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी आज त्यांच्या निवासस्थानी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण सतत बदलत ठेवल्याने प्रसारमाध्यमांनी नाराजी व्यक्त केली.
वारंवार बदललेल्या वेळेतही पत्रकार परिषद न झाल्याने सर्व माध्यमांतील पत्रकारांना ताटकळत थांबावे लागले. सायंकाळी पाच वाजताची पत्रकार परिषद साडेसहानंतर सुरू झाली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या रुबाबापुढे पत्रकारांची मात्र चांगलीच पळापळ झाली.
याबाबत झाले असे की, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह काही आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने मंत्री देसाईंचे नाव खासदार राऊत यांनी घेतल्याने शिंदे गटात खळबळ उडाली.
याशिवाय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आज गुढेफाटा (ता. पाटण) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शंभूराज देसाईंवर सडकून टीका केली. त्या टीकेला आणि खासदार राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी मंत्री देसाई यांनी आज सायंकाळी पाच वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
बराच वेळ त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी वाट पाहिल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पाच वाजता पत्रकार परिषद होईल, असा निरोप देण्यात आला. मात्र, तेथेही पत्रकारांना सुमारे पाऊण तास ताटकळतच थांबावे लागले. शासकीय विश्रामगृहातदेखील पाऊण तास थांबल्यानंतर सव्वासहा ते साडेसहा यादरम्यान पत्रकार परिषद सुरू झाली.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे. त्यामुळे राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाही तर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
सुरतला गेलो तेव्हापासूनच मातोश्रीची दारे बंद केल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ‘अजित पवारांचे भाषण हे नैराश्यातून केले आहे.
अजित पवार यांच्या पाटण तालुक्याच्या दौऱ्यामध्ये स्वागतासाठी एखादं-दुसरं बॅनर दिसलं. तर पाटणमध्ये एकच स्वागत कमान दिसून आली. सभागृहातही हजारांपेक्षा अधिक माणसे यांचे भाषण ऐकण्यासाठी नव्हती.
मागील सहा महिन्यांत तर सत्यजित पाटणकरांचे दोन मोठे पराभव केलेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि पाटणकर गटही गलितगात्र झालाय. अजित पवारांचे भाषण हे दर्जा घसरलेले असेच होते. तरीही त्यांची आणि माझी मैत्री आहे. ते असेच बोलत राहिले तर मी यापेक्षा अधिक बोलणार,’ असा इशाराही देसाईंनी यावेळी दिला.