Satara News : महापुरात उद्‍ध्वस्त विद्यालयासाठी मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alumni student initiative Help school destroyed in flood satara

Satara News : महापुरात उद्‍ध्वस्त विद्यालयासाठी मदत

ढेबेवाडी : महापुरात उद्‍ध्वस्त झालेले मालदन (ता. पाटण) येथील श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल सावरण्यासाठी विविध समाज घटकांसह माजी विद्यार्थीही पुढे सरसावले आहेत. पुणे येथील ओरालिकोंन बालझर्स कोटिंग इंडिया प्रा. लि. कंपनीत कार्यरत असलेले या विद्यालयाचे माजी विद्यार्थी विजयकांत मोरे यांच्या, तसेच जयवंत मोरे यांच्या प्रयत्नातून विद्यालयाची गरज ओळखून कंपनीने दहा लाख ६५ हजार रुपये खर्चून बांधलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे उद्‍घाटन नुकतेच झाले.

मालदन येथे वांग नदीच्या काठावरील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यालयाला गेल्या वर्षी २३ जुलैला महापुराचा फटका बसला. विद्यालय पुरात बुडाल्याने इमारत जमीनदोस्त झाली. संगणक लॅबसह ग्रंथालय व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले.

महसूलच्या पंचनाम्यातून ६४ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. विद्यालय उभारणीसाठी मुंबईला कार्यरत मोरे व बाटे वस्तीतील विद्यार्थ्यांनी ४५ हजार, नितीन काळेंनी ५० हजार, शामराव काळेंनी ३५ हजार, राजेश साळुंखेंनी ३३ हजार रुपये सुविधांसाठी मदत दिली. पुणे येथील ओरलिकोंन बालझर्स कोटिंग इंडिया कंपनीत कार्यरत विद्यालयाचे माजी विद्यार्थी विजयकांत मोरे, जयवंत मोरे यांच्या प्रयत्नातून कंपनीने दहा लाख ६५ हजार रुपये खर्चून विद्यालयात स्वच्छतागृह बांधले. त्याचे उद्‍घाटन नुकतेच झाले.

आर. के. भोसले, एस. के. कुंभार, नचिकेत कणसे, विजयकांत मोरे, मुख्याध्यापक माने, पाचूपते, जयवंत मोरे, सुभेदार मोरे, अनिल बाटे, शामराव काळे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. जे. वाघ यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा मंडले, रचना कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी गायकवाड यांनी आभार मानले.

इतरांनीही घ्यावा आदर्श...

भावी पिढीला घडवण्याचे काम शाळा माऊली करते. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात शाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो, संस्कारित झालो, त्या शाळेचे आपल्यावर नेहमीच ऋण असतात. त्यामुळे शाळेच्या ऋणातून उतराई होणे, कोणालाच शक्य होत नाही. मात्र, आपल्या पुढच्या पिढीला आपण शिकलेल्या शाळेतून अधिकाधिक सुविधा देण्यासाठी आपला पुढाकार हवा. मालदनच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी केलेली मदत भावी पिढीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्याचा सर्वांनीच आदर्श घेण्याची गरज आहे.