आनंदरावांच्या कष्टाचे झाले चीज; शेणोलीत 26 गुंठ्यांत 72 टन उसाचे उत्पादन

आनंदरावांच्या कष्टाचे झाले चीज; शेणोलीत 26 गुंठ्यांत 72 टन उसाचे उत्पादन

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : शेणोली (ता. कऱ्हाड) येथील आनंदराव विलासराव खुडे यांनी अथक मेहनतीतून उत्पादनातील सांशकतेला छेद देत ऊस शेतीत विक्रम नोंदवला आहे. केलेल्या खर्चाच्या बरोबरीपेक्षाही तिपटीने उत्पादन घेत शेतीत जणू त्यांनी सोनेच पिकवण्याची किमया साधली आहे. 26 गुंठ्यांत तब्बल 72 टनांचे उत्पादन घेत आनंदरावांनी कृष्णाकाठी विक्रम रचला आहे. 

श्री. खुडे हे सहा वर्षांपूर्वी उसाचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी शेतीत विक्रमी उत्पादन घेण्याचा इरादा मनात पक्का करत काटेकोर ऊस शेतीचे तंत्र अवलंबण्यास सुरुवात केली. याकामी उरुण-इस्लामपूर येथील कृषी पदवीधर विजय जाधव यांचे मार्गदर्शन त्यांना मोलाचे ठरू लागले. त्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर ते आजमितीस शेतीत नवा विक्रम उभा करू शकले. प्रति 30 गुंठे क्षेत्राचे तीन प्लॉट करत त्यात दरवर्षी एक आडसाली लागण व खोडवा तसेच पुढील वर्षी जाणारी आडसाली लागण अशा स्वरूपात ऊस पीकपद्धत अवलंबली. आडसाली लागणीतील सुमारे चार ते पाच गुंठे क्षेत्र ऊस बियाण्यासाठी विकतात. पारंपरिक पद्धतीने पीकपूर्व मशागत करत असताना 30 गुंठ्यांच्या प्लॉटमध्ये आडसाली ऊस लागणीसाठी शेतीपूरक दुग्ध व्यवसायातील उत्पादित नऊ ते दहा ट्रेलर शेणखताचा वापर करतात. साडेचार फूट सरीवर उसाची लागवड होते. खताचा बेसल डोस, वेळेवर आळवणी, औषध फवारणी, बाळभरणी, प्रमाणबद्ध खत व पाटपाणी व्यवस्थापन या काटेकोर व्यवस्थापनामध्ये त्यांनी गेल्या सहा वर्षांत सातत्य ठेवले आहे. परिणामी गतवर्षी उत्पादन वाढण्यास सुरुवात झाली. गेल्यावर्षी त्यांना 25 गुंठ्यांत 71 टन उत्पादन मिळाले. 

या यशामुळे त्यांना बळ मिळाले. यातून त्यांनी गेले वर्षभर अथक परिश्रम घेतल्याने उत्पादनात आघाडी घेतली आहे. नुकतीच 26 गुंठे क्षेत्रातील उसाची येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने तोड केली. संपूर्ण उसाची काढणी केल्यानंतर 26 गुंठ्यांत 72 टन उत्पादन मिळाले. एका उसाला सुमारे 50 कांड्या होत्या. 26 गुंठ्यांत विक्रमी उत्पादन पाहून अनेकांनी श्री. खुडे यांचे कौतुक केले.

पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com