वाजंत्री 'वाजवा रे वाजवा' आदेशाच्या प्रतीक्षेत; लग्नसराईच्या बेगमीसाठी बॅंड पथकांची जुळवाजुळव

गिरीश चव्हाण
Saturday, 21 November 2020

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउन पुकारण्यात आला. लॉकडाउन अंशत: शिथिल करत त्यासाठीची नियमावली केंद्र व राज्य शासनाने जारी केली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मर्यादित उपस्थितीच्या निकषावर लग्न व इतर धार्मिक विधी सुरू झाले. हे विधी सुरू करतानाच लग्नावेळी बॅंड वादनास परवानगी नाकारण्यात आली होती.

सातारा : कोरोनामुळे अडचणीत आलेली बाजारपेठ पूर्वपदावर येत असल्याने दिवाळीनंतर सुरू होणारा लग्नसराईचा हंगाम "कॅश' करण्यासाठी बॅंड आणि बेंजो पथकांची धांदल सुरू झाली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील 700 च्या आसपास असणाऱ्या बॅंडपथकांनी मनुष्यबळाची जुळवाजुळव सुरू केली आहे. यंदाच्या लग्नसराईत बॅंड वादनास लिखित परवानगी मिळेल, अशी त्यांना आशा आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउन पुकारण्यात आला. लॉकडाउन अंशत: शिथिल करत त्यासाठीची नियमावली केंद्र व राज्य शासनाने जारी केली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मर्यादित उपस्थितीच्या निकषावर लग्न व इतर धार्मिक विधी सुरू झाले. हे विधी सुरू करतानाच लग्नावेळी बॅंड वादनास परवानगी नाकारण्यात आली होती. यामुळे बॅंड पथकातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. आठ महिने हातावर हात धरून बसलेल्या बॅंड व्यावसायिकांनी, तसेच कलाकारांनी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र, बॅंड व्यावसायिकांचा प्रश्‍न निकाली निघाला नाही. लॉकडाउनच्या काळातील लग्नसराईचा हंगाम न झाल्याने बॅंड व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले.

फलटणचे मराठी साहित्य संमेलन कोरोनामुळे रद्द 

या नुकसानीची झळ सोसून जिल्ह्यातील बॅंड व्यावसायिकांनी दिवाळीनंतर सुरू होत असलेला लग्नसराईच्या हंगामासाठीची जुळवाजुळव सुरू केली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात 700 च्या आसपास बॅंड आणि बेंजो पथके आहेत. यापूर्वीच्या काळात लग्नात बॅंड आणि बेंजो वाजविण्यास परवानगी मिळण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात अर्ज करावा लागत होता. या अर्जाची छाननी करून लग्नावेळी वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात येत असे. लॉकडाउन आणि त्यानंतरच्या अनलॉक प्रक्रियेदरम्यान बॅंड पथकांना सर्रास परवानगी नाकारण्यात येऊ लागली. यामुळे बॅंड आणि बेंजो व्यावसायिकांचे कंबरडे पुरते मोडले. अनलॉकच्या प्रक्रियेत इतर सर्व व्यवसाय पूर्वपदावर येत असताना आमच्यावरच का अन्याय, असा सवाल जिल्ह्यातील बॅंड आणि बेंजो व्यावसायिक विचारत आहेत. 

गोंदवल्यात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

परवानगीची गरज नाही 

लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने प्रत्येक पोलिस ठाण्यात त्यासाठीची परवानगी मागणारे अर्ज दाखल होऊ लागले आहेत. हे अर्ज निकाली काढत आवश्‍यक त्या परवानग्या तत्काळ देण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हे आदेश देत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत वाद्य वाजवू शकता, त्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्‍यकता नाही, असा आदेश तोंडी स्वरूपात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. तोंडी आदेशाचे लिखित स्वरूपात कधी रूपांतर होते, याकडे बॅंड, बेंजो व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

नारदमुनींच्या रुपात सिध्दनाथाचा अवतार; आकर्षक पूजेने वेधले लक्ष

जिल्ह्यात 20 हजार जणांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न 

जिल्ह्यात बॅंड आणि बेंजो व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या सुमारे 20 हजारांच्या घरात आहे. लॉकडाउनच्या काळात या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची उपासमार झाली. याबाबत आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, तोडगा निघाला नाही. यामुळे आम्ही थेट राज्यसरकारला बॅंड वादनास परवानगी मिळावी, यासाठी साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया साताऱ्यातील बॅंड व्यावसायिक अशोक जाधव यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artists Demand Permission To Play Band Satara News