esakal | पाच महिन्यांपासून ‘आशा’ पगाराविना
sakal

बोलून बातमी शोधा

aasha workers

पाच महिन्यांपासून ‘आशा’ पगाराविना

sakal_logo
By
हेमंत पवार-सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोना काळात आशा स्वयंसेविकांनी स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता जीव धोक्यात घालून काम केले. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाचे काम बघून ७२ वेगवेगळ्या प्रकारची कामेही मार्गी लावली आहेत. त्यासाठी त्यांना केवळ सरकारकडून दोन हजारांचे मानधन दिले जाते. मात्र, ते मानधनही गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना मिळाले नाही.

त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणावारात त्यांच्यावर उसने-पासने करून घरखर्च भागवायची वेळ आली आहे.

हेही वाचा: Power Crisis: कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयानं स्थापन केला 'आपत्ती गट'

आरोग्य विभागाच्या कामकाजात हातभार लागावा, यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांची पदे निर्माण केली. त्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाशी संबंधित ७२ प्रकारची वेगवेगळी कामे केली जातात. त्याबदल्यात महिनाकाठी त्यांना दोन ते अडीच हजारांचे मानधन मिळते. त्यावर त्या कुटुंब चालवतात. दोन वर्षांपासून आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात मात्र, आशांच्या कामांची गरज अधोरेखित झाली. सातारा जिल्ह्यातील दोन हजार ७५०आशा व १३३ गटप्रवर्तकांनी कोरोना महामारीचे संकट सुरू झाल्यापासून आजअखेर पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन सर्व्हेचे काम चोखपणे बजावले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोरोना संशयितांची माहिती जमा करणे, त्यांना उपचारासाठी पाठवणे आदी कामेही त्यांनी केली.

आशांकडून सुरू असलेल्या या सर्व्हेमुळे आरोग्य विभागाला संबंधित रुग्णांची माहिती तत्काळ मिळण्यास मोठी मदत झाली आहे. त्या आकडेवारीवरचं प्रशासनाकडून आवश्यक त्या पुढील उपाययोजना करणे सोपे झाले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांचे निदान तातडीने होण्यासाठी संसर्गाची लक्षणे दिसल्यास संबंधितांना तातडीने स्वॅब देण्यासाठी रुग्णालयात पाठवावे, असे आदेश दिले. त्यानुसार आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन सर्व्हे करून रुग्णांना स्वॅबसाठी रुग्णालयात पाठवले. त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. महामारीच्या संकटात जिवावर उदार होऊन आशा, गटप्रवर्तकांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. मात्र त्यांनाच शासनाकडून गेली पाच महिने मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोडावर आलेल्या सणावारात पैसेच नसल्याने त्यांच्यावर उसने पैसे घेऊन चरितार्थ चालवण्याची वेळ आली आहे.

वाढीव मानधनही कागदावरच

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशांना एक हजार आणि गटप्रवर्तकांना १७०० रुपयांची मानधनवाढ जाहीर केली होती. त्याला तीन महिन्यांचा कालावधी होत आला तरीही ते पैसे अजूनही आशा, गटप्रवर्तकांना मिळालेले नाहीत. त्यामुळे तीही वाढ कागदावरच राहिली आहे.

loading image
go to top