रिक्षांचे वय आता 21 वर्षे; रिक्षा मालकांना मोठा दिलासा

उमेश बांबरे
Tuesday, 20 October 2020

प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा सातारा जिल्ह्यात 16 वर्षे होती. ही वयोमर्यादा पूर्ण केलेल्या ऍटोरिक्षा स्क्रॅप करण्यात येत होत्या. त्यानुसार सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या दोन वर्षांत 789 ऍटोरिक्षा स्क्रॅप केल्या आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाऱ्या जुन्या नियमानुसार जिल्ह्यातील 800 ते एक हजार रिक्षा आगामी कालावधीत स्क्रॅप होणार होत्या; पण प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाने रिक्षांच्या वयोमर्यादा सर्व राज्यात सारखी असावी, असा निर्णय घेतला आहे.

सातारा : प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऍटोरिक्षांची वयोमर्यादा 16 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी वयोमर्यादा असल्याने यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षांची वयोमर्यादा सर्व राज्यात सारखी केली आहे. त्यानुसार ऑगस्ट 2021 पर्यंत ऍटोरिक्षांची वयोमर्यादा 21 वर्षे असणार आहे. 16 वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा आता 2021 पर्यंत स्क्रॅप होणार नाहीत. यामुळे अशा रिक्षा मालकांना दिलासा मिळाला आहे.
 
प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा सातारा जिल्ह्यात 16 वर्षे होती. ही वयोमर्यादा पूर्ण केलेल्या ऍटोरिक्षा स्क्रॅप करण्यात येत होत्या. त्यानुसार सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या दोन वर्षांत 789 ऍटोरिक्षा स्क्रॅप केल्या आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाऱ्या जुन्या नियमानुसार जिल्ह्यातील 800 ते एक हजार रिक्षा आगामी कालावधीत स्क्रॅप होणार होत्या; पण प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाने रिक्षांच्या वयोमर्यादा सर्व राज्यात सारखी असावी, असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एक ऑगस्ट 2021 पर्यंत रिक्षांची मुदत 21 वर्षे असेल. त्यानंतर प्रत्येक वर्षी ही वयोमर्यादा कमी होत जाणार आहे. यामध्ये ऑगस्ट 2022 ला 18 वर्षे, ऑगस्ट 2023 ला 16 वर्षे, तर ऑगस्ट 2024 पासून ऍटोरिक्षाची वयोमर्यादा 15 वर्षे असेल. तोपर्यंत जिल्ह्यातील 16 ते 21 वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा चालू शकणार आहेत.

पर्यटनाचा घ्या मनसोक्त आनंद! महाबळेश्‍वर, पांचगणीतील पॉईंट खुले

रिक्षा व्यावसायिकांना प्रत्येक वर्षी रिक्षाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी (पासिंग) करून घ्यावे लागते. ऍटोरिक्षाची कमाल वयोमर्यादा पूर्वी 16 वर्षे होती. 16 वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्क्रॅप केल्या जातात. सप्टेंबर 2020 अखेर जिल्ह्यात सहा हजार 465 ऍटोरिक्षांची नोंद झालेली आहे. प्रत्येक वर्षी 16 वर्षे पूर्ण झालेल्या साधारण तीनेश ते साडेतीनशे रिक्षा स्क्रॅप केल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात तेथील परिवहन प्राधिकरण रिक्षाची वयोमर्यादा ठरविते. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांत ऍटोरिक्षांची वयोमर्यादा वेगवेगळी असल्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी राज्यात सर्वत्र ऍटोरिक्षांसाठी एकच कमाल मर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 16 वर्षांवरून रिक्षाची वयोमर्यादा 21 वर्षे झाली आहे; पण ती केवळ ऑगस्ट 2021 पर्यंतच राहणार आहे. तोपर्यंत 16 वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा प्रवाशी वाहतूक करू शकणार आहेत. या निर्णयामुळे रिक्षामालक व चालकांना दिलासा मिळाला आहे; पण 2024 पासून मात्र, ऍटोरिक्षाची वयोमर्यादा 15 वर्षे होणार आहे. 

ग्रामपंचायत आमच्या हक्काचीच.. दरेकरांचा नारा

जिल्ह्यातील स्थिती... 

- जिल्ह्यातील ऍटोरिक्षा : 6465 
- 16 वर्षे पूर्ण स्क्रॅप रिक्षा : 789 
- प्रत्येक वर्षी स्क्रॅप होणाऱ्या रिक्षा : 300 ते 350 
- पुढील तीन वर्षात स्क्रॅप होणाऱ्या रिक्षा : 700 ते 1000 

नवा नियम कऱ्हाड व सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत 14 ऑक्‍टोबरपासून लागू करण्यात आला आहे. याची रिक्षामालक व चालक यांनी नोंद घ्यावी.'' 

-संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Autorickshaws Are Now 21 Years Old Satara News