"बेड फुल्ल' आहेत हेच लोकांना ऐकावे लागत आहे; सातारकरांसाठी आशादायक चित्र निर्माण करा

प्रवीण जाधव
Sunday, 13 September 2020

जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही कोरोना पुढे हतबल होत चालल्याचे चित्र नक्कीच चांगले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनावरील रोष वाढत चालला आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी आशादायक चित्र त्यांना निर्माण करावेच लागेल. त्यासाठी लागेल ती पावले तातडीने उचलली पाहिजेत.
 

सातारा : कारणे काहीही असोत; पण जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना आवश्‍यक त्या वेळी ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर्सचे बेड उपलब्ध करण्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरताना दिसत आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे दररोज होणारे मृत्यू हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता आश्‍वासने नकोत, बेड पाहिजेत, अशी आर्त हाक सर्वसामान्य नागरिकांकडून दिली जात आहे.
 
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने हा हा म्हणता 22 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दररोज 800 ते 900 नागरिक कोरोनाबाधित येत आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह व किडनेचे आजार असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने बाधितांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडची आवश्‍यकता भासत आहे; परंतु सध्याच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांना आवश्‍यकता असलेल्या सर्व सोयींनीयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करण्यात अपयशी ठरत आहेत. कोरोना संसर्गाची सुरवात झाल्यापासून म्हणजे अगदी लॉकडाउनच्या कालावधीपासून जिल्हाधिकारी कोरोनाबाधितांची सर्व प्रकारची यंत्रणा उभी करत असल्याचे सांगत आहेत. कोरोना केअर सेंटर, शासकीय रुग्णालये व महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या बेडच्या आकडेचे आकडे जाहीर केले जात आहेत. आणखी किती रुग्णांसाठी सुविधा निर्माण करणार हेही जाहीर केले जात आहे; परंतु प्रत्यक्षात बाधितांची संख्या व उपलब्ध बेड याचे गणित जुळवणे प्रशासनाला अद्याप जमलेले नाही. किंबहूना बाधितांना आवश्‍यक त्या सुविधेचे बेड उपलब्धच होत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

मुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
 
खटाव तालुक्‍यातील वडूजमधील एका पत्रकार मित्राच्या आईला व्हेंटिलेटर बेडची आवश्‍यकता होती. दोन दिवस अनेक जण प्रयत्न करत होते. अगदी आमदार, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक या सर्वांपर्यंत संपर्क करण्यात आले; परंतु दोन दिवसांत व्हेंटिलेटरचा एक बेड उपलब्ध करून देणे प्रशासकीय यंत्रणेला जमले नाही. तशीच अवस्था जिल्हा रुग्णालयाबाहेरही दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री जिल्हा रुग्णालयाबाहेर एक रुग्ण तीन तास प्रवेशासाठी वाट पाहात होता. ऑक्‍सिजन लेव्हल 70 च्या खाली गेली होती. त्यांनी अनेकांना फोन करून पाहिला; परंतु काही उपयोग होत नव्हता. 

अखेर एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धावपळ करून "आवाज' उठवला तेव्हा कुठे संबंधिताला बेड मिळाला; परंतु गरज असतानाही ऑक्‍सिजनची सुविधा त्याला उपलब्ध होऊ शकली नाही. आज त्या रुग्णाचा मृत्यू झाला. अशा अनेक करूण कहाण्या अवतिभवती ऐकायला मिळत आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयातील योजनेतील "बेड फुल्ल' आहेत हेच लोकांना ऐकावे लागत आहे. खासगी रुग्णालयातील खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. त्यामुळे ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर्स बेडच्या उपलब्धतेअभावी नागरिकांना जीव सोडावा लागत आहे. त्यामुळे उपचाराअभावी होणारे मृत्यू हे कोरोनाचे "एन्काउंटर'च म्हणायचे का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. 

हे शल्य जीवाला लावे घोर... 

जन्माला येणारा कधी तरी जाणार हे सनातन सत्य आहे. तरीही आपल्या घरातला माणूस गेल्याचे दुःख प्रत्येकाला होतेच; परंतु त्याला आवश्‍यक ते उपचार देण्यात आपण कमी पडलो हे शल्य हृदयाला बोचणी लावणारे ठरते. हे शल्य पुढचे सारे आयुष्य बरोबर घेऊन जगणे किती कठीण असते, याची कल्पनाच न केलेली बरे. ज्याचं जळतं, त्यालाच कळतं, अशी भावना आज जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांतील कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांची आहे. 

पारंपरिकतेला तिलांजली; उत्तरकार्याचा खर्च दिला मुख्यमंत्री निधीला

आशादायक चित्र निर्माण करावेच लागेल

जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही कोरोना पुढे हतबल होत चालल्याचे चित्र नक्कीच चांगले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनावरील रोष वाढत चालला आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी आशादायक चित्र त्यांना निर्माण करावेच लागेल. त्यासाठी लागेल ती पावले तातडीने उचलली पाहिजेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Availability Of Oxygen Bed Is Necessary For Covid Patient In Satara