"कॉटेज'ला बाबा देणार एक कोटी, कोविड मान्यता काढल्याने नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

आता आरोग्य विभागासह जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपजिल्हा रुग्णालयात काय सुविधा अपेक्षित आहेत, त्याचा प्रस्ताव तातडीने आमदार चव्हाण यांच्याकडे देण्याची गरज आहे. तो येताच त्वरित त्या प्रस्तावानुसार राज्य शासनाकडून एक कोटींचा निधी आणण्याची जबाबदारी आमदार चव्हाण घेणार आहेत. 

कऱ्हाड (जि. सातारा)  : कोरोनासारख्या महाभयंकर स्थितीत कऱ्हाडच्या सौ. वेणूताई उपजिल्हा रुग्णालय अर्थात कॉटेज हॉस्पिटलचे काम अत्यंत निराशाजनक झाले. रुग्णालयाची कोविड हॉस्पिटलची मान्यताही काढून घेण्याची नामुष्की ओढवली. त्याची अनेक कारणे आहेत. मात्र, या कारणांना पाठीवर टाकून उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा अद्ययावत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणाला एक कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सोय नसतानाही उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण ठेवले गेले. परिणामी शहरात फैलाव सुरू झाला होता. मात्र, सुदैवाने तो थांबला. रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही. वॉर्डात स्वच्छतेचा अभाव आहे. रुग्णांकडे नीट लक्ष न दिल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार होताना दिसत नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे त्या काळात झाल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन आमदार चव्हाण यांनी पुन्हा उपजिल्हा रुग्णालयाला अद्ययावत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कोटींचा निधी शासनाकडून आणण्याचे जाहीरपणे मान्य केले आहे. आमदार चव्हाण म्हणाले, ""कोविड हॉस्पिटलची मान्यता जाणे योग्य नाही. तेथे अनेक अद्ययावत सुविधा आहेत. मात्र, तेवढे असूनही त्या रुग्णालयाची कोविडची मान्यता रद्द होत असेल तर कठीण स्थिती आहे. त्यामुळे त्या हॉस्पिटलला पुन्हा एकदा अद्ययावत करण्याचा आराखडा हाती घेत आहे. त्यासाठी एक कोटींचा निधी देऊ; मात्र त्यासाठी प्रसासकीय पातळीवर त्याचा प्रस्ताव आला पाहिजे.'' 

आता आरोग्य विभागासह जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपजिल्हा रुग्णालयात काय सुविधा अपेक्षित आहेत, त्याचा प्रस्ताव तातडीने आमदार चव्हाण यांच्याकडे देण्याची गरज आहे. तो येताच त्वरित त्या प्रस्तावानुसार राज्य शासनाकडून एक कोटींचा निधी आणण्याची जबाबदारी आमदार चव्हाण घेणार आहेत. 

""उपजिल्हा रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी शासनाकडून एक कोटींपर्यंतचा निधी देण्याचा माझा शब्द आहे. त्यामुळे त्या हॉस्पिटलला अधिक अद्ययावत करता येईल. निधी मिळावा यासाठी तेथे काय काय सुविधा देणार, याचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर आला पाहिजे. त्यानंतर लगेच हालचाली करून तो निधी वर्ग करता येऊ शकतो.'' 

-पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Will Give 1 Crore To Cottage Hospital